‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीच्या प्रक्रियेस सुरुवात

16 Sep 2021 13:24:52

नमामी गोदा_1  H
 
 
 
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्यावतीने ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ’नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाची मान्यतादेखील मिळाली आहे. आता यासंदर्भात महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी विविध संस्थांकडून स्वारस्य देकार मागविण्यात आले आहेत.
 
महापालिका क्षेत्रातून वाहणार्‍या गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा आणि पुनरुज्जीवनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पटलावर गाजत आहे. यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी अंदाजे अठराशे कोटी रुपये खर्च लागणार आहे.
 
केंद्र सरकारच्यावतीने या प्रकल्पासाठी निधी प्राप्त होण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासह केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली होती. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी मलनिस्सारण केंद्रांचे अत्याधुनिकीकरण, भूमिगत गटारी तसेच ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीतून नाशिकमध्ये परतत नाही, तोच केंद्राकडून या योजनेसंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार महानगरपालिकेने स्वारस्य देकार मागविले आहे.
 
असा आहे प्रकल्प!
 
गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंचे सुशोभीकरण, सध्या अस्तित्वात असलेल्या ‘सीवरेज पाईपलाईन’चे संवर्धन, नूतनीकरण, दुरुस्ती आणि पुनर्वसन, अडथळा आणि नाल्यांचे वळण, मखमलाबाद आणि कामठवाडा येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सीवरेज नेटवर्क’चे बांधकाम, नाले व उपनद्यांचे जलप्रदूषण कमी करणे, गोदावरी नदीवरील विविध घाटांचे सुशोभीकरण, घाटांचे नूतनीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, मनपाच्या हद्दीतील उद्योगांमधून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी मलनिस्सारण केंद्राची उभारणी आदी कामांचा या प्रकल्पात समावेश आहे.
 
Powered By Sangraha 9.0