पुरोगामी दुटप्पीपणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2021
Total Views |

time_1  H x W:
 
 
हिंदू धार्मिकतेला असहिष्णू व इस्लामी धर्मांधतेला सहिष्णू ठरवण्याचे काम जगभरातील सर्वच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी करतात, या समीकरणानुसारच ‘टाईम’ पाक्षिकाची आताची कृती आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कट्टर, तर तालिबानचा सहसंस्थापक, दहशत-हिंसाचाराने सत्तेवर आलेला मुल्ला बरादर मवाळ वा उदारमतवादीच असणार.
 
 
‘टाईम’ पाक्षिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध जागतिक नेत्यांची नावे व त्यांच्याविषयीची माहिती आहे. मात्र, त्यातील तालिबानचा सहसंस्थापक आणि अफगाणिस्तान सरकारचा विद्यमान उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादरचे नाव ‘टाईम’ पाक्षिकासाठी नसले, तरी सर्वसामान्य व्यक्तींसाठी इतर सर्वांहून आश्चर्यकारक म्हटले पाहिजे. कारण, नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने, लोकशाही पद्धतीने भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेले व्यक्तिमत्त्व आहेत, तर मुल्ला अब्दुल घनी बरादर दहशतीच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या सत्तेवर आलेला आहे. ‘टाईम’ पाक्षिकाने आपल्या एका लेखातून नरेंद्र मोदींना ‘कट्टर’ ठरवले आहे, तर अन्य एका लेखातून मुल्ला बरादरला ‘मवाळ’ वा ‘उदारमतवादी’ म्हटले आहे. अर्थात, ते धक्कादायक नाहीच. कारण, हिंदू धार्मिकतेला असहिष्णू म्हणत, त्यावर आगपाखड करणे आणि इस्लामी धर्मांधतेला सहिष्णू म्हणत त्यावर पांघरूण घालणे म्हणजे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी पत्रकारिता, असे समीकरणच देश-विदेशात तयार झालेले. ‘टाईम’ पाक्षिकाची ओळखही जागतिक पातळीवरील पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी माध्यम अशी आहे व त्यातून तयार झालेल्या समीकरणाला अनुसरूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुल्ला बरादरविषयी मत व्यक्त केले. मात्र, दोघांच्याही प्रत्यक्षातील व्यक्तिमत्त्वात, कार्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे, जो ‘टाईम’ पाक्षिकाने नाकारल्याचे, दुर्लक्षिल्याचे स्पष्ट होते. अर्थात, त्यामागेही ‘टाईम’ पाक्षिकाचे निश्चित असे हित, स्वार्थ आहे, त्याशिवाय असे होऊ शकत नाही.
 
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्रवादाकडे नेले. अल्पसंख्याकांचे (मुस्लिमांचे) अधिकार संपवतानाच, मोदी सरकारने विरोधातील पत्रकारांना अटक केली, त्यांना घाबरवले, धमकावले,” असा आरोप ‘टाईम’ पाक्षिकाने आपल्या लेखातून केला आहे. मात्र, ‘टाईम’ पाक्षिकाने आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत वा घटना, प्रसंगही सांगितलेले नाहीत. त्याची कारणे दोन, एक तर ‘टाईम’ पाक्षिकासारख्या प्रख्यात माध्यमाकडे नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्व व कार्याची वास्तव माहिती देणारा स्रोत बहुधा नसावा किंवा दुसरे म्हणजे ‘टाईम’ पाक्षिकाकडे तसा स्रोत असला, तरी नरेंद्र मोदींविषयी अवास्तव माहिती देऊन संभ्रम निर्माण करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. येत्या आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरून सर्व सदस्य देशांना संबोधित करणार आहेत व त्याचीच वेळ साधून ‘टाईम’ पाक्षिकाने त्यांच्याविषयी अपप्रचार करणारा लेख प्रकाशित केला आहे. सप्टेंबर 2019मध्येही नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते व त्यावेळीही ‘टाईम’ पाक्षिकाने त्यांना ‘इंडियाज डिव्हायडर इन चिफ’ म्हटले होते. त्यावरूनही त्यावेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता व आताही तसेच व्हावे, असे ‘टाईम’ पाक्षिकाचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या सात वर्षांतील कार्याचा आढावा घेतल्यास त्यांच्या सरकारने अल्पसंख्याक वा मुस्लिमांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यांचा मतदानाचा, नागरिकत्वाचा, स्वातंत्र्याचा अधिकार हिरावलेला नाही वा त्यांच्याविरोधात एखादी प्रकल्प-योजनाही राबवलेली नाही. उलट ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्राच्या आधारे काम करताना, अल्पसंख्याक वा मुस्लिमांचे सर्व अधिकार अबाधित ठेवताना विकासाचे प्रकल्प असो वा गरीब कल्याणाच्या योजना त्यांचा फायदा जात-धर्मविरहित देशातील प्रत्येक नागरिकाला मिळावा, यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले. तथापि, नरेंद्र मोदींचे पूर्वसुरी काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असलेल्या सरकारच्या काळात अल्पसंख्याकांचे व विशेषतः मुस्लिमांचे लाड करण्याचे जोरदार प्रयत्न झाले, ते आता बंद झाले आणि म्हणून मोदी सरकारविरोधात बडबडण्याचे उद्योग सुरू आहेत, ‘टाईम’ पाक्षिकही त्यात सामील झालेले आहेच. तसेच मोदी सरकारने आपल्याविरोधात व्यक्त होणाऱ्या पत्रकारांवर कारवाई केली असती, तर विरोधी विचारांची वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, संकेतस्थळे या सगळ्यांनाच टाळे लागले असते. पण, त्यांचे संचालन अव्याहत सुरू आहे व आजही त्यांच्याकडून नरेंद्र मोदींविरोधात अगदी विखारी शब्दांत टीकाही होताना दिसते. पण, ‘टाईम’ पाक्षिकाला ते समजून घ्यायचे नाही, तर नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यावेळी विविध ठिकाणच्या मंदिरात जातात, देवी-देवतांचा जयजयकार करतात, अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन करतात, यावरून त्यांना कट्टर ठरवायचे आहे. इतकेच नव्हे तर ‘टाईम’ पाक्षिकाने नरेंद्र मोदींसमवेत भारतातील राजकीय नेत्या-ममता बॅनर्जींचाही यादीत समावेश केलेला आहे. पण, यंदाच्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी, निवडणुकीदरम्यान व नंतरही त्या राज्यात तृणमूल काँग्रेसकडून भाजप कार्यकर्त्यांविरोधात बेफाम हिंसाचार माजवला गेला. ते प्रकरण न्यायालयात आहे व ‘सीबीआय’मार्फत त्याची चौकशी होत आहे. त्यातून ममता बॅनर्जींच्या पक्षाच्या हिंसक कारवायांची भयावह उदाहरण समोर येत आहेत. पण, ‘टाईम’ पाक्षिकाने त्याचा एका शब्दानेही उल्लेख केलेला नाही, तर ममता बॅनर्जींचे कौतुकच केलेले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. अर्थात, हिंदू धार्मिकतेला असहिष्णू व इस्लामी धर्मांधतेला सहिष्णू ठरवण्याचे काम जगभरातील सर्वच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी करतात, या समीकरणानुसारच ‘टाईम’ पाक्षिकाची ही कृती आहे, त्यात मोदी कट्टर, ममता बॅनर्जी कौतुक करण्याजोग्या तर मुल्ला बरादर मवाळ वा उदारमतवादीच असणार.
 
 
दरम्यान, आपल्या जिहादी उद्दिष्टपूर्तीसाठी तीन दशकांहून अधिक काळ रक्ताचा सडा शिंपणारा, हजारो निष्पापांचा जीव घेणारा आणि आता हिंसाचाराच्या साहाय्याने अफगाणिस्तानचा उपपंतप्रधान झालेल्या मुल्ला अब्दुल घनी बरादरचे व्यक्तिमत्त्व व कार्य मात्र ‘टाईम’ पाक्षिकाला शांत आणि मवाळ वा उदारमतवादी वाटते. प्रत्यक्षात मात्र, जगातील अतिशय अमानुष, धोकादायक दहशतवादी म्हणून मुल्ला अब्दुल घनी बरादरला ओळखले जाते. तो इस्लामी धर्मांध संघटना तालिबानचा सहसंस्थापक असून, त्यांनी अफगाणिस्तान, अमेरिकेसह अन्य देशांत घातलेला धुडगूस सर्वांसमोर आहे. तर मुल्ला अब्दुल घनी बरादरचे ध्येय जगात इस्लामी राजवट स्थापन करण्याचे आहे व आता अफगाणिस्तानातील तालिबानी राज्य इस्लामी राजवट म्हणजे काय याची झलक दाखवून देणारी आहे. आम्ही म्हणू तोच इस्लाम, देशभरात ‘शरिया’ कायद्याची अंमलबजावणी, इस्लामबाहेरील अन्यधर्मियांना जीवन जगण्याचा अधिकार नाही, स्त्रियांनी तर मुले पैदा करण्याशिवाय दुसरे कुठलेही काम करू नये, असा सगळा प्रकार अफगाणिस्तानात सुरू आहे आणि त्याचा एक कर्ता करविता मुल्ला अब्दुल घनी बरादरही आहे. तरीही ‘टाईम’ पाक्षिकाला तो कट्टर वाटत नाही, तर मवाळ वा उदारमतवादी वाटतो. पुरोगामी दुटप्पीपणा, दांभिकता यालाच म्हणतात. अमेरिकेत आयोजित केल्या गेलेल्या ‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषदे’च्या कर्त्याधर्त्यांची व ‘टाईम’ पाक्षिकाची मानसिकता एकच. त्यांना जगासमोरचा खराखुरा धोका समजून घ्यायचा नाही, तर त्याला कुरवाळायचे, गोंजारायचे आहे. हिंदू धार्मिकतेला असहिष्णू ठरवताना इस्लामी धर्मांधतेला सहिष्णू ठरवायचे आहे. पण, या समीकरणाला बुद्धीचे अजीर्ण झालेले निवडक विचारवंत वगळता कोणीही मान्यता देणार नाही, सर्वसामान्य जनता भारतात मोदींच्या पाठीशीच खंबीरपणे उभी ठाकेल आणि ‘टाईम’सारख्यांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी मुल्ला अब्दुल घनी बरादरच्या धर्मांध तालिबानी राजवटीचा खराखुरा चेहराही वेळोवेळी उघडा पडतच राहील.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@