गणेश नाईक : अनेकांचा हक्काचा आधार

    दिनांक  14-Sep-2021 21:03:37
|

Ganesh Naik and Fadanvis
माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. गणेश नाईक हे आज १५ सप्टेंबर रोजी ७१ वर्षे पूर्ण करीत आहेत. मी त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी दीर्घायुरारोग्य चिंतितो.
 
 
काही व्यक्तित्त्वांची ऊर्जाच अशी असते की, ज्यामुळे कित्येकांची आयुष्ये उजळून निघतात. माजी मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वात हा विलक्षण गुण आहे. ज्यामुळे जीव ओतून काम करणारी पिढी ते घडवू शकले. कार्यकर्त्यांची मोठी आणि मजबूत फळी त्यांच्यामुळे निर्माण झाली. राजकारण असो की समाजकारण, या दोन्ही क्षेत्रात खंबीर आणि जीवलग कार्यकर्ते असावे लागतात. नाईकजींच्या विश्वासाने ते तयार झाले. परिसस्पर्श या खरेतर काल्पनिक असलेल्या; पण मनाची उमेद जागवणार्‍या या स्पर्शाचे वास्तवात येणारं पूर्णत्व म्हणजे गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना मोठे करणे होय. ‘कामगारनेता ते दमदार राजकीय नेते’ असा त्यांचा प्रवास कष्टमय आणि झुंझार असा आहे.
 
 
नाईकजींची राजकारणातील कारकिर्द त्यांच्या ठायी असणारी दूरदृष्टी आणि माणसे ओळखण्याचे कौशल्य यामुळे नेहमीच प्रभावी राहिली आहे. सामान्य जनतेचे प्रश्न आणि असंख्य समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जव्हार, मोखाडा, पालघर, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई, विक्रमगड, ठाणे या ठिकाणी जनता दरबार भरवून जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
 
 
ते कामगारमंत्री असताना गिरणी कामगारांना न्याय, बालकामगारमुक्त महाराष्ट्र, कंत्राटी कामगारांना न्याय, असंघटित कामगारांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. याशिवाय अनेक समाजहितैषी उपक्रम ते चालवत असतात. गेली अनेक वर्षे ते जनतेच्या लहान-मोठ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देतात. कोरोनाच्या संकटातही गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली; त्यावेळी ते कुटुंबप्रमुखासारखे धावून आले.
 
 
नवी मुंबई म्हणजे नाईक मुंबई, असा उपरोधिक स्वर काही वेळेस निघत असला, तरीही राजकीय वाटचालीसोबत विकासात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते पुढे जात राहिले आहेत, हे त्यांचे मोठेपण आहे. नाईक आणि कुटुंबीय विकासाचे राजकारण करतात, हेच सत्य या उपरोधातून प्रस्थापित होते. राजकीय व्यक्तीची दखल समाज नक्की घेत असतो. धडाडी, समर्पण आणि लोकभिमुखतेबाबत मूल्यमापन समाज करत असतो. त्यांच्या आजवरच्या कार्यावरून मला असे जाणवते की, नाईकजी कर्मसिद्धान्तांचे उपासक आहेत.
 
 
शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांवर काम करणारे नेते म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. मुळात एक आक्रमक कामगार नेते म्हणून त्यांचा राजकारणात उदय झाला. नवी मुंबईच्या विकासाप्रति असलेली त्यांची तळमळ आणि प्रतिबद्धता ही वादातीत आहे. राजकारणात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले. पण, नवी मुंबईकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वत: पुढाकार घेत, निरनिराळ्या संस्थांच्या मदतीने नवी मुंबईच्या विकासाला एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला आणि आजही ते त्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना दीर्घ, निरामय आयुष्य लाभावे, ही शुभकामना व्यक्त करतो. त्यांच्या हातून समाजसेवा, देशसेवा अशीच अविरत सुरू राहो, अशा शुभेच्छा देतो.
 
 

- देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते, विधानसभा, महाराष्ट्र


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.