नवी मुंबईचे शिल्पकार आ. गणेश नाईक

    दिनांक  14-Sep-2021 21:01:42
|

Ganesh Naik  _1 &nbs


देशाची आर्थिक राजधानी, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणजे मुंबई. याच मुंबई शेजारील सर्वात प्रगत आणि देशातील पहिली ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावारुपाला आलेले शहर म्हणजे नवी मुंबई. मुंबई वसवण्यात परकीयांचा बराच वाटा होता. मात्र, नवी मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजनबद्ध शहर हे भारतीय व्यक्तींच्या दूरदृष्टीतून साकारलेले आहे. नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासात आ. गणेश नाईक यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या नेतृत्वात गेली तीन दशके नवी मुंबईत विकासाची पताका फडकावली जात आहे. गणेश नाईक यांच्या कार्यातून नवी मुंबईचा चौफेर विकास साकारला आहे. गणेश नाईक यांची ओळख शून्यातून जग निर्माण करण्याची किमया साधणारे नवी मुंबईचे शिल्पकार अशी असून त्यांचे जीवनचरित्र तमाम जनतेला स्फूर्ती देणारे आहे.
 
 
गणेश नाईक यांचा जन्म दि. १५ सप्टेंबर, १९५० रोजी झाला. त्यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. इतरांच्या मदतीला धावून जाणार्‍या आणि मनमिळावू स्वभावामुळे ते अल्पावधीत सर्वांमध्ये लोकप्रिय झाले. जिद्द, कामाची चिकाटी, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि काम करण्याची प्रचंड ऊर्जा यामुळे त्यांनी शून्यातून गरुडझेप घेतली. बोनकोडे, कोपरखैरणे या छोट्यांशा गावातून आमदार, कार्यक्षम कॅबिनेट मंत्री, कार्यक्षम पालकमंत्री आदी पदांपर्यंतची त्यांची वाटचाल निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारी आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीला सुवर्णसंधी समजून त्यांनी संधीचे सोने केले. जे काही करायचे, ते उत्तम दर्जेदार आणि भव्य दिव्य करायचे ही गणेश नाईक यांची कामाची ‘स्टाईल’ आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नवी मुंबईकरांच्या प्रेमाने, सहकार्याने गणेश नाईक सार्वजनिक जीवनात मोठ्या विश्वासाने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील कोणतीही गोष्ट असो ती नंबर एकच होणार, हे नवी मुंबईकर पाहत आले आहेत. गणेश नाईक यांच्या नेतृत्वातील नवी मुंबई महानगरपालिकेने चांगल्या कामगिरीने देशातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले आहेत.
 
 
गणेश नाईक यांचे आदर्श, ‘व्हिजन’ घेऊन वाटचाल करणार्‍या नवी मुंबईची ओळख ‘विकसित नगरी’ म्हणून देशाला आहे. नवी मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शहराच्या परिपूर्ण विकासासाठी लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नवी मुंबईला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आजपर्यंत दोन हजारांहून अधिक ‘जनता दरबार’ भरवून सामान्य नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्याचे काम गणेश नाईक यांनी केले आहे. हाच जनता दरबार सर्वसामान्य जनतेचा आधार ठरला आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या रहिवाशांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अपारंपरिक ऊर्जा विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग या दोन विभागांचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना गणेश नाईक यांनी या खात्यांचा कारभार गतिमान आणि गुणवत्तापूर्ण करून लोकाभिमुख केला.
 
 
गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पायाभूत सोयीसुविधा नवी मुंबईत मिळाल्यामुळे शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमातून नवी मुंबईच्या हिरवाईत भर घातली आहे. नवी मुंबई शहर महाराष्ट्राचे एक शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आले आहे. महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील गुणवत्ता वाढावी म्हणून बोर्डाच्या धर्तीवर ‘एसएससी सराव परीक्षे’चे दरवर्षी आयोजन केले जाते. यात १२ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५० हून अधिक शाळांचा सहभाग असतो. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन दरवर्षी केले जाते. विद्यार्थ्यांना मोफत दाखले वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या करिअरला गणेश नाईक यांनी साथ दिली आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध कंपन्यांना एकाच मंचावर आणून त्यांनी भव्य ‘रोजगार मेळाव्या’चे आयोजन केले. नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून जगभरात नावाजले आहे. या लौकिकाप्रमाणेच शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ‘मिनी ऑलिम्पिक’ दर्जाचा ‘नवी मुंबई क्रीडा महोत्सव’ २० वर्षांपासून दरवर्षी आयोजित केला जातो. नवी मुंबईचे सांस्कृतिक वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
 
 
नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांनी आपल्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम पायाभूत सोयी-सुविधा देऊन नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवले आहे. त्यातील काही ठळक कामे म्हणजे, पुढील ५० वर्षांचा विचार करून नवी मुंबईला अत्यावश्यक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी मोरबे धरण घेतले. मुंबईच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील धरणानंतर स्वतःच्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. आशिया खंडातील पहिल्या हरित महानगरपालिका भवनची निर्मिती, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात २२५ फूट उंचीच्या आणि २४ तास सदैव फडकणार्‍या राष्ट्रध्वजाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. नवी मुंबईचे ‘लॅण्ड मार्क’ म्हणून ओळख ठरलेल्या ‘वंडर्स पार्क’ची निर्मिती केली. नवी मुंबईमध्ये २०० हून अधिक उद्याने असून ‘उद्यानांचे शहर’ म्हणून ओळख निर्माण झाली.
 
 
सांडपाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणारी ‘सी-टेक’ ही अत्याधुनिक तंत्र राबवणारी अग्रगण्य महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिका ओळखली जाते. त्यासाठी सहा मलनिस्सारण व्यवस्थापन केंद्रे उभारली आहेत. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान, महाराष्ट्र शासनाने सुरू केल्यावर राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाला. घनकचरा व्यवस्थापन उत्तम दर्जाचे केले जाते. अत्याधुनिक पद्धतीने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. रस्ते हा शहराचा आरसा समजून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. नवी मुंबईचा ‘क्वीन्स नेकलेस’ अशी ओळख असणार्‍या ‘पाम बीच मार्गा’वर सौंदर्यात भर घातली. सीबीडी बेलापूर येथील सेक्टर १५ मध्ये आकर्षक रस्ते साकारले आहेत. बेलापूर येथे ‘कम्युनिटी सेंटर’ उभारले. महापे जंक्शन एलिव्हेटेड मार्ग पूर्ण केला आहे. ‘बेलापूर सी शोअर’, ‘एसटीपी केंद्र’, शहरात प्रशस्त मैदाने साकारली आहेत. एनएमएमटीमध्ये ‘व्होल्वो बस’, ‘ब्रांटो स्कायलिफ्ट कार’, ‘एपीएमसी केंद्र’, ‘डम्पिंग ग्राऊंड’, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, प्रशस्त ठाणे-बेलापूर मार्ग, शहर सुरक्षेच्या द़ृष्टीने तत्पर आणि कार्यक्षम अग्निशमन दल आदी कामे करुन नवी मुंबईकरांचे जीवनमान उंचावले आहे.
 
 
गणेश नाईक यांचे नवी मुंबईसाठी भविष्यकालीन ‘व्हिजन’ म्हणजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते रुंदीकरण, बगीच्यांचा विकास, ‘मल्टिलेव्हल पार्किंग’, ‘आयकॉनिक’ प्रवेशद्वारे, बस आगारांचा विकास, वाहतूक व्यवस्थापन, ‘डिजिटल सिटी इन्फॉर्मेशन’, सार्वजनिक ठिकाणांचे व्यवस्थापन, पर्यावरणपूरक शहरांची निर्मिती, मनोरंजनाच्या सोयी, पर्यटन स्थळे आणि क्रीडा सुविधांचा विकास, शाळांची पुनर्बांधणी, घाऊक बाजारांचे आधुनिकीकरण, महामार्गाचा विकास आणि मोरबे धरण परिसरातील ‘सोलर पार्क’ असा नवी मुंबईच्या एकत्रित नियोजन आणि विकासाचा पारदर्शी प्रकल्प आहे. आज त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...
 
 
नाईक साहेबांचे योगदान अतुलनीय आदरणीय गणेश नाईक साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! नाईक साहेबांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभले आहे, जी खर्‍या अर्थाने जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.निश्चितपणे मागील अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे. नवी मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. जरी मी आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत असलो, तरी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मला काम करता आले. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. बर्‍याच गोष्टींमध्ये काम करण्यासाठी मला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली. येणार्‍या काळामध्ये त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी, यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो...!
 
 
- कपिल पाटील, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री, भारत सरकार
 
गणेश नाईक : महाराष्ट्राला लाभलेलं एक उमदं नेतृत्व
 
 
१९७०-८० पर्यंत मुंबई हीच खर्‍या अर्थाने औद्योगिक नगरी होती. त्यानंतरच्या काळात ठाणे आणि नवी मुंबईत उद्योगांचा विस्तार झाला. या उद्योग विस्ताराने नवी मुंबईकरांना, विशेषतः कोळी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, पण त्याबरोबरच नवी मुंबईतल्या खैरणे-बोनकोडे गावात जन्मलेल्या गणेश नाईक यांच्या रूपाने एक उमदे नेतृत्वही महाराष्ट्राला मिळाले. ‘रिलायन्स’ कंपनीत कामगार नेता म्हणून सार्वजनिक कामाला सुरुवात केलेल्या मा. गणेश नाईक यांच्या भोवती आजपर्यंत ठाणे जिल्ह्याचे समाजकारण आणि राजकारण फिरत राहिले. मा. गणेश नाईक यांना स्थानिकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे, निष्ठावान लाखो कार्यकर्त्यांचा संच त्यांनी बांधला आहे, विकासाची दृष्टी, प्रशासनाकडून विकास कामे करून घेण्याचे कौशल्य आणि आक्रमक शैली ही त्यांची बलस्थाने आहेत. कायम लोकांमध्ये रमणारे आणि आपलेसे वाटणारे त्यांचे व्यक्तिमत्व असल्यामुळेच गेली ४१ वर्षे नाईक साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच प्रशासकीय आणि संसदीय कामाचा गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विधानसभा सदस्य, कामगार, पर्यावरण, उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मा. गणेश नाईक यांचे मी वाढदिवसाप्रीत्यर्थ अभीष्टचिंतन करतो आणि भविष्यातील सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी त्यांना बळ प्राप्त होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
 
 
- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता, विधान परिषदआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.