‘कोविड’सेनानी....

    दिनांक  14-Sep-2021 21:16:25
|

Naik  _1  H x W


एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग नवी मुंबईत सुरू झाला. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या महामारीचे गांभीर्य वेळीच ओळखून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. जेव्हा कुणीच आसपास नव्हते, त्यावेळी साहेब धावून आले आणि सुरू झाला अव्याहत लोकसेवेचा, रुग्णसेवेचा महायज्ञ जो आजतागायत सुरूच आहे!!

 
 
 
नवी मुंबई महानगराने साधलेल्या आजवरच्या लखलखीत विकासात मागील २५ वर्षे या शहराचे सत्ताधारी म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक साहेब यांच्या दूरदर्शी ध्येय धोरणांचा निर्विवाद मोठा वाटा आहे. प्रगतीच्या बाबतीत या शहराला महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही नकाशावर मानाचे पान साहेबांनी प्राप्त करून दिले. साहेब आणि नवी मुंबईकरांचं नातं एका प्रचंड विश्वासावर आधारलेलं आणि द़ृढ होत असताना या शहरावर येणारं प्रत्येक संकट साहेब दूर करण्याची पराकाष्टा करणारच, हाच तो विश्वास. कोरोना महामारीच्या संकटकाळात आधाररूपी विश्वास प्रत्येक नवी मुंबईकराच्या प्रत्ययास आला. कुणीतरी आपली काळजी घेणारं आहे, याची जाणीव नवी मुंबईकरांना झाली.
 
 
 
बैठकांमधून कोरोना नियंत्रण सूचना
 
नवी मुंबई महापालिकेसह ‘सिडको’, ‘एमआयडीसी’, ‘महावितरण’, ‘एमपीसीबी’, पोलीस सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग यासह विविध सरकारी, निमसरकारी आस्थापना, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींबरोबर बैठका घेतल्या. ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना या आस्थापनांना वेळोवेळी केल्या. कोरोना नियंत्रणामध्ये त्यांच्या चांगल्या कामांचे कौतुक करीत असताना कुठे कमतरता राहिल्या असतील, तर त्याही दाखवून दिल्या.
 
मदतीचा ओघ
 
लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संकट काळात नवी मुंबईत मोठे मदतकार्य उभे राहिले. या महामारीची भयानकता जेवढी मोठी, तेवढीच मोठी मानवताही उभी राहिलेली दिसली. साहेबांच्या माध्यमातून १,२०० टन धान्यांचे वाटप नवी मुंबईतील सर्व विभागात करण्यात आले. तीन लाख फेसमास्कचे वितरण करण्यात आले. झोपडपट्टी, गावठाण, शहरी भाग, एमआयडीसी, खासगी सोसायट्या सर्वच भागात सॅनिटायझेन मशीनचे व सॅनिटायझरचे वाटप झाले. रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे प्रत्येक एकूण १११ प्रभागांत वाटप झाले. रोज कमवून खाणारे हजारो बिगारी, खाण कामगार, मजूर कारागीर, निराधार, परप्रांतीय यांच्यासाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले. ‘लॉकडाऊन’च्या काळात आपल्या मूळगावी जाण्यास निघालेल्या हजारो परप्रांतीय मजुरांना तयार अन्न, औषधे, प्रवासासाठी मदत करून त्यांना दिलासा दिला.
 
रेशनिंगवर सर्वांना मिळू लागले धान्य
 
 
कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असताना, रेशनिंग दुकानांवरील धान्य त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतो. मात्र, रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळवण्यासाठी रेशनिंग कार्ड आधार लिंक असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेकडो नागरिकांचे रेशन कार्ड अद्याप आधार लिंक झालेले नाही, त्यामुळे या नागरिकांना रेशनिंग दुकानांवर शिधा मिळत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना दि. १५ एप्रिल, २०२० रोजी पत्र पाठवून रेशन कार्ड आधार लिंक असो किंवा नसो, सर्वांना रेशनिंग पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आधार कार्ड रेशन कार्डबरोबर लिंक नाही, त्यांनाही रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळू लागले.
 
 
‘एपीएमसी’मधील संसर्ग थांबला
 
 
‘एपीएमसी’ मार्केट व ‘एमआयडीसी’ विभागातून कोरोना वाढत असताना, ‘एपीएमसी’ बंद करण्याची सूचना सर्वप्रथम लोकनेते गणेश नाईक यांनीच केली. त्यानंतर काही काळ ‘एपीएमसी’ बंद ठेवण्यात आल्यावर नवी मुंबईतील कोरोना आकडा आटोक्यात आला होता. ‘अ‍ॅन्टिजन टेस्ट सेंटर’, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजना ‘एपीएमसी’ प्रशासनाने सुरू केल्या. ‘एमआयडीसी’ भागात पालिकेने ‘अ‍ॅन्टिजन टेस्ट सेंटर्स’ सुरू केली.
 
 
‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा केला
 
 
‘कोविड-१९’च्या रुग्णांसाठी जीवरक्षक असणारे ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा आवश्यक साठा करण्याची सूचना लोकनेते नाईक यांनी केली. त्यानुसार आवश्यक तेवढा साठा पालिकेने करून ठेवला. खासगी रुग्णालयांतूनही हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी होणारी परवड थांबली.
 
 
आयुक्तांबरोबरील बैठकांमधून ‘कोविड’ नियंत्रणास गती
 
 
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर एप्रिल २०२०पासून लोकनेते आमदार गणेश नाईक यांची जवळपास ३० पेक्षा अधिक कोरोना नियंत्रण आढावा बैठका नियमितपणे घेतल्या आहेत. ‘कोविड’ रुग्णालये आणि कोरोना सेंटरना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. या सर्वांचा परिपाक म्हणजे नवी मुंबईत कोरोनावर प्रभावीपणे आळा घालण्यात यश आले आहे. दिघासारख्या नोडमध्ये अनेक वेळा एकही नवीन रुग्ण आढळत नाही. कोरोनाचे आकडे ६०च्या खाली आले आहेत. कोरोना काळात थांबलेली नागरी सुविधांची कामेदेखील मार्गी लागली आहेत. कित्येक कामे झाली, काही पूर्ण होत आहेत, तर उर्वरित कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे. या बैठकांमधून कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. प्रत्यक्षात उपाय करण्यात आले. कोरोना सेंटर व ‘कोविड’ चाचण्यांची संख्या नवी मुंबईत वाढविण्यात आली.
 
 
१,१०० खाटांचे ‘कोविड सेंटर’
 
 
सिडको प्रदर्शनी केंद्रात १,१०० खाटांचे नवे ‘कोविड सेंटर’ उभे राहिले. बेडची संख्या वाढविण्याबरोबरच ‘ऑक्सिजन’, ‘व्हेंटिलेटर बेड’च्या संख्येत वृद्धी करण्यात आली़़ महापालिकेकडे ४४३ ‘आयसीयु बेड’ होते, त्यामध्ये आणखी २०० बेडची भर घालण्यात येते आहे.
 
 
रुग्णवाहिका, फिवर क्लिनिक, कोरोना चाचणी केंद्रे
 
 
कोरोना उपचारात जीवरक्षक असलेले ‘रेमडेसिवीर’ व इतर इंजेक्शन्सची उपलब्धता वाढली. प्रत्येक प्रभागात निर्जंतुकीकरणाच्या फेर्‍या वाढल्या. फिवर क्लिनिक, कोरोना चाचण्यांची केंद्रे विभागवार स्थापित करण्यात आली. पेशंटना वेळेवर ‘कोविड’ रुग्णालयात उपचारासाठी पोहोचता यावे, यासाठी विभागवार रुग्णवाहिका सुरू झाल्या.
 
 
स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा
 
 
कोरोनाचे लवकर निदान होऊन रुग्णांवर लवकर उपचार झाले तर रोग बळावण्याचा किंवा जीव जाण्याचा धोका कमी होतो. साहेबांनी नवी मुंबई पालिकेकडे मागणी करून दररोज एक हजार कोरोना नमुने चाचणीची क्षमता असणारी प्रयोगशाळा नेरुळ येथे स्थापित करून घेतली.
 
 
‘कोविड’व्यतिरिक्त रुग्णांना उपचारासाठी दिलासा
 
 
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली असता सर्वसामान्यांना सर्व प्रकारच्या उपचारांसाठी आधार असलेले वाशी येथील पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय ‘नॉनकोविड’ झाले आहे. पूर्वी हे रुग्णालय केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने आरक्षित केले होते. आता या ठिकाणी सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार होणार आहेत, त्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला.
 
 
 
 
‘व्हेंटिलेटर’, सुरक्षा साधनांसाठी ५० लाखांचा निधी
 
 
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी ‘व्हेंटिलेटर’ आणि कोरोना सुरक्षा साधनांची खरेदी करण्यासाठी स्वत:च्या आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. 
 
 
कोरोना लस मोफत द्यावी
 
 
कोरोनाची लस ही संजीवनी नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांसाठी स्वखर्चाने मोफत द्यावी, अशी सूचना लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. १५ लाख लोकसंख्येसाठी १५० कोटींचा खर्च पालिकेला उचलावा लागेल. मात्र, हा खर्च पालिकेने उचलावा. पालिका त्यासाठी सक्षम आहे. एखाद्याच्या घरात चार ते पाच सदस्य असल्यास त्यांना प्रत्येक एक हजार लसीचा खर्च कोरोनाच्या या संकटकाळात परवडण्यासारखा नाही. आर्थिक हलाखीमुळे एकही नवी मुंबईकर कोरोना लसीपासून वंचित राहता कामा नये.
 
 
पालिका शाळांमधून ‘ऑनलाईन’ शिक्षण सुरू
 
 
कोरोनामुळे नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ शिक्षण थांबले होते. खासगी शाळांप्रमाणेच पालिका शाळांमध्येही हे शिक्षण सुरू करावे. अशा मागण्या लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केल्या होत्या. त्यानुसार पालिकेने ‘ऑनलाईन’ शिक्षण सुरू केले.
 
 

नऊ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
 
 
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांच्या आरोग्याचा नेहमीच प्राधान्याने विचार केला आहे. नवी मुंबईत आधुनिक उपचारांची व्यवस्था त्यांनी पालिकेच्या माध्यमातून निर्माण केली आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक आणि ‘गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून नऊ रुग्णवाहिकांचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेला या रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोना व अन्य रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यास या रुग्णवाहिकांमुळे मदत मिळणार आहे.
 
 
१९८५ साली लोकवर्गणीतून ठाणे जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका गणेश नाईक साहेबांनी दिल्या होत्या. त्याची आठवण या रुग्णवाहिकांच्या लोकार्पणप्रसंगी झाली. रुग्णवाहिका लोकार्पणाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी पालिका ग्रंथालयांना पुस्तके व पालिकेच्या विरंगुळा केंद्रातील ज्येष्ठांना विरंगुळा साहित्याचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले. लोकार्पण करण्यात आलेल्या आठ रुग्णवाहिका या नवी मुंबई महापालिकेच्या दिघा, रबाळे, खैरणे, पावणे, घणसोली, तुर्भे आणि जुहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असणार आहेत. आधुनिक जीवरक्षक प्रणाली असणारी रुग्णवाहिका पालिका रुग्णालयाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत असणार आहे.
 
 
‘गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’ची रुग्णवाहिका संपूर्ण नवी मुंबईत सेवेत उपलब्ध असणार आहे. नवी मुंबईतून ‘एमपीएससी’ आणि ‘युपीएससी’ परीक्षा देणार्‍यांचा टक्का वाढतो आहे. या उमेदवारांना या परीक्षांमधून यश मिळावे, यासाठी या परीक्षांच्या अभ्यासासाठी पुस्तके आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुस्तकांचे संच पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले. ज्येष्ठांसाठी काही क्षण आनंदाचे जावेत, यासाठी त्यांच्याकरिता विरंगुळा केंद्रांची संकल्पना सर्वप्रथम नवी मुंबईत राबविण्यात आली. ज्येष्ठांचा विरंगुळा केंद्रातील वेळ आणखी सुखकारक जावा, यासाठी या केंद्रांसाठी विरंगुळा साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
 
 
शिष्यवृत्तीचे झाले वाटप
 
 
कोरोनाकाळात ‘लॉकडाऊन’मुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. पालिकेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर वितरित करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी लोकनेेते गणेश नाईक यांनी केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशीपची रक्कम जमा झाली. पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
 
 
कल्याणकारी योजनांचे काम झाले सुरू
 
 
कोरोनाकाळात नागरिकांचे आर्थिक आरोग्य बिघडले. महापालिकेच्या वतीने दरवर्षी कल्याणकारी योजनांमधून विविध गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे नवी मुंबई पालिकेने या योजनांंतर्गत मदत करण्याचे काम आरंभले आहे.
 
खासगी डॉक्टरांना सुरक्षा कवच प्रदान करा
 
 
कोरोनाकाळात नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे खासगी डॉक्टर हेदेखील कोरोना योद्धे आहेत, महापालिकेने आवाहन केल्यानंतर खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले होते. नवी मुंबईतील तीन डॉक्टरांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेमार्फत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि आणि खासगी डॉक्टरांनाही विम्याचे सुरक्षाकवच मिळायला पाहिजे, अशी आग्रही मागणी लोकनेते गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली.
 
 

‘कोविड सेंटर’ची संख्या वाढली
 
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, नवीन कोरोना सेंटर उभारण्यासाठी आमदार गणेश नाईक सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरुळ या ठिकाणी नवीन ‘कोविड सेंटर’ची निर्मिती करण्यात आली.
 
 
शैक्षणिक शुल्कवसुलीसाठी तगादा लावणार्‍या शाळांना लगाम
 
 
‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. अशा परिस्थितीत फीवाढीसाठी जबरदस्ती करणार्‍या शाळांवर महापालिकेने कारवाई करावी, शाळांनी केवळ शैक्षणिक शुल्कच वसूल करावे, अन्य कोणतेही शुल्क आकारू नये. शैक्षणिक शुल्कदेखील टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत पालकांना द्यावी, अशा सूचना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली होती. त्यानुसार पालिकेने परिपत्रक काढून अशा शाळांना केवळ शैक्षणिक शुल्क आकारण्याचे निर्देश दिले. नवी मुंबईत कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत कोरोना शून्यावर येत नाही, तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढा सुरूच राहील, असा लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केलेला निर्धार म्हणजे नवी मुंबईवरील त्यांची आत्मीयता आणि प्रेेम दर्शवितं.
 
 
गेली २५ वर्षे नवी मुंबईची एकहाती सत्ता नवी मुंबईकरांनी लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपवली. या विश्वासाला पात्र ठरतं त्यांनी या शहराच्या विकासाला आकार आणि उकार दिला. देशातील राहण्यायोग्य आघाडीचे शहर, दळणवळणाच्या सक्षम सुविधा, मोरबे धरणामुळे पाणीपुरवठ्यात स्वयंपूर्ण, आधुनिक डम्पिंग ग्राऊंड, मलनिस्सारण केंद्रे, पर्यावरणपूरक परिवहन सेवा, थीम पार्क, उद्यानांची हिरवाई... नवी मुंबई विकासाच्या बाबतीत इतर शहरांच्या तुलनेत उजवी राहिली आहे. मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात चार हजार शहरांमधून नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला. यंदा पहिल्या क्रमांकाच्या दिशेने या शहराची वाटचाल सुरू आहे.
 
 
कुणीतरी आहे काळजी घेणारे
 
 
कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या आपल्या रुग्णावर आपुलकीचे योग्य ते उपचार मिळतील तो बरा होऊन घरी परतेल, अशी आशा त्याच्या नातेवाइकांना असते. परंतु, अनेक वेळा कोरोना सेंटरमधून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर लोकनेते आ. गणेश नाईक यांनी कोरोना रुग्णांना सातत्याने नजरेखाली ठेवण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: ‘हायरिस्क’वर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र मॉनिटरिंग व्यवस्था असायलाच हवी, असा आग्रह त्यांनी धरला. तसा सल्ला पालिका प्रशासनाला दिला. त्यांच्या सूचनेनुसार कोरोना रुग्णांच्या तब्येतीची दररोज माहिती घेण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी पालिकेने कॉलसेंटर सुरू केले. उपलब्ध खाटांची माहिती मिळण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले. हेल्पलाईन नंबर सुरू केले.
 
 
कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी ‘कोविड’ सेनानी म्हणून गणेश नाईक साहेब यांचा लढा आजही सुरू आहे. कोणी नसले तरी संकटात नवी मुंबईकरांच्या सोबत गणेश नाईक साहेब हे असतातच. नवी मुंबईकरांनी हे अनुभवलं आहे. साहेबांच्या कोरोना कार्यामुळे दिलासा मिळालेले हजारो नागरिक त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देत आहेत.
 
 

- दीपक सोनावणे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.