बायडन आले म्हणून नाचणारे?

    दिनांक  14-Sep-2021 20:36:06   
|

Biden _1  H x W


जो बायडन यांची लोकप्रियता ५० टक्क्यांनी कमी झाली आहे, असे खुद्द अमेरिकेचेच सर्वेक्षण आहे. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना धोबीपछाड देत बायडन अलगद अमेरिकेच्या सत्तासिंहासनावर विराजमान झाले. त्यावेळी जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आपल्या भारतात तर तथाकथित पुरोगामी डाव्या वगैरेंना तर आनंदाचे भरते आले होते. कारण, ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांचे राजकीय आणि वैयक्तिक संबंधही चांगले होते. केवळ नरेंद्र मोदींशी सौख्य असलेले अमेरिकन राष्ट्रपती गेले म्हणून त्यावेळी या लोकांना हर्षवायू झाला होता. अमेरिकेत ट्रम्प असो की बायडन भारतीय जीवनात त्यामुळे काय फरक पडणार होता? अमेरिकेत सध्या बायडन यांची लोकप्रियता सरळ ५० टक्क्यांनी खाली घसरली आहे. त्यांची लोकप्रियता घटण्याचे कारण काय?
 
 
 
तर अफगाणिस्तानात तालिबान्यांचे परतणे. अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या विरोधात ठाकलेल्या अमेरिकन सैन्याला बायडन यांनी अफगाणिस्तानातून बाहेर काढले. त्यानंतर जे झाले ते जगाने पाहिले. अमेरिकन नागरिकांच्या मते जगाला भेडसावणार्‍या समस्यांतून जगाला वाचवण्यासाठी अमेरिका पालकत्वाची भूमिका घेतो. अफगाणिस्तानातून सैन्य बाहेर काढणे या निर्णयामुळे अमेरिकेच्या पालकत्वाच्या प्रतिमेला तडा गेला आहे.
 
 
अमेरिकेची प्रतिमा पळपुटे किंवा तालिबान्यांना घाबरणारे, अशी झाली आहे आणि त्याला कारणीभूत बायडन आहेत, असेही मत अमेरिकचे नागरिक मांडत आहेत. बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीतील महत्त्वाचे नेतेही बायडन यांच्यावर नाराज आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, २०२४ साली पुन्हा सत्तेत येण्यासाठी ट्रम्प किंवा त्यांच्या रिपब्लिकन पक्षाकडे काहीच मुद्दा नव्हता. मात्र, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांना जीवदान मिळाले आहे. तसेच अफगाणिस्तानातील सैन्य हटवण्याआधी तेथील सर्वच अमेरिकन नागरिकांना अमेरिकेत आणण्याची खात्री बायडन यांनी दिली होेती. मात्र, प्रत्यक्षात अफगाणिस्तानात शेकडो अमेरिकन नागरिक आजही अडकलेले आहेत. त्यामुळेही बायडन यांच्या विरोधात जनमत गेले आहे.
 
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अमेरिकेत दीड लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाने संक्रमित झाली. दीड हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बायडन हे कोरोना काळात देशाला वाचवण्यास असमर्थ आहे, असा संदेश लोकांना गेला आहे. अमेरिकेत पाणीबाणीही लोक अनुभवत आहेत. अमेरिकेच्या काही राज्यांत पाण्याची समस्या उद्भवली आहे. कित्येक शहरात पाणीकपातीचे सत्र सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात पाण्याच्या कमतरतेमुळे मंदीसुद्धा आली आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम अमेरिकेच्या समाजजीवनावर झाला आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी आणि छुपा वर्णवाद बोकाळला आहे. या सगळ्यांना हाताळताना बायडन अयशस्वी ठरत आहेत, असे चित्र सध्या अमेरिकेत आहेत.
 
अशातच अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीत अफगाण जनतेला अन्नधान्याच्या कमतरेतला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकन प्रशासनाने मानवी संवेदनशीलतेतून ४७० कोटी रुपये अफगाणिस्तानला मदत करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे तर अमेरिकन जनतेचा संताप झाला आहे. या सगळ्या घडामोडीत बायडन यांच्या लोकप्रियतेच्या घसरणीचे हे बिंदू वाढतच आहेत. बायडन यांना पुन्हा जनसमर्थन मिळवण्यासाठी तालिबान आणि समर्थकांना विरोध दर्शवत ठोस पावले उचलावीच लागतील. त्याची चुणूक नुकतीच दिसली.


अमेरिकच्या संसदेने आता पाकिस्तानला ‘नाटो’च्या सहयोगी देशातून वगळण्याची मागणी केली आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांना वाढवण्यास पाकिस्तानच कारणीभूत आहे, असे संसदेचे म्हणणे आहे. यापुढे बायडन यांना जनमत मिळवण्यासाठी तालिबान आणि दहशतवादाविरोधात ठोस भूमिका घ्यावी लागेल हे नक्की. त्यासाठी दहशतवादाविरोधातील प्रमुख देश म्हणून भारताशी नव्याने सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल, हे नक्की. आता ट्रम्प गेल्यावर बायडन आले म्हणून नाचणारे काय करतील?


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.