सरंजामी डौलाची माघार

    दिनांक  13-Sep-2021 21:57:43
|

Ford_1  H x W:
 
 
फोर्ड मोटार कंपनीच्या भारतातून पळ काढण्याला कंपनी स्वतःच जबाबदार आहे, अन्य कोणीही नाही. कारण, भारतातील वाहन उद्योग नजीकच्या काळात चांगलाच भरभराटीला आल्याचे दिसते.
 
 
 
पुलं कोकणात आपल्या सासुरवाडीला पोहोचतात तेव्हा अंतु बर्वा त्यांना म्हणतो, “सासऱ्यांकडे मागा चांगली फोर्ड गाडी! स्वातंत्र्यपूर्वकाळापासून भारतीयांच्या मनात फोर्ड गाडी बसली आहे ती अशी.” मात्र, नुकतीच ‘फोर्ड’ मोटार कंपनीने भारतातील दोन वाहन उत्पादन प्रकल्प बंद करण्याची घोषणा केली अन् सदान्कदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नावाने शंख करणाऱ्या मंडळींनी ‘फोर्ड’च्या माघारीच्या बातम्यांवरुन एकच बोंबाबोंब सुरू केली. नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांमुळेच ‘फोर्ड’ला भारतातून गाशा गुंडाळावा लागला, असे आरोप त्यांच्याकडून सुरू झाले. मात्र, यातल्या एकानेही ‘फोर्ड’ कंपनीचा भारतीय वाहन बाजारपेठेतला वाटा नेमका किती, याची माहिती घेतली नाही. ११८ वर्षांपूर्वी १९०३ साली हेन्री फोर्ड यांनी अमेरिकेत ‘फोर्ड’ मोटार कंपनीची स्थापना केली आणि तिने वाहननिर्मिती सुरु केली. तेव्हापासूनच जगभरच्या ग्राहकांची ‘फोर्ड’ मोटार कंपनीच्या वाहनांना पसंती मिळाली. विसाव्या शतकात ‘फोर्ड’ मोटार कंपनीच्या वाहनांची लोकप्रियता ती कार्यरत असलेल्या बहुतांश देशांत उत्तम होती. ‘फोर्ड’ मोटार कंपनीने याच शतकाच्या अखेरच्या दशकात १९९६ साली भारतात वाहन उत्पादन प्रकल्प सुरु केला. तोपर्यंत ‘फोर्ड’ मोटार कंपनीच्या वाहनांचे उत्पादन भारतात होत नव्हते. तेव्हापासून २०२१ सालातील सप्टेंबर महिना येईपर्यंत ‘फोर्ड’ मोटार कंपनी भारतातील उत्पादन प्रकल्पांतून वाहनांचे उत्पादन करत होती. पण, सप्टेंबरच्याच दुसऱ्या आठवड्यात कंपनीने भारतातील वाहन उत्पादन प्रकल्प बंद करत असल्याचे जाहीर केले आणि त्याविषयीच्या चर्चांना उधाण आले. मोदीविरोधकांनी यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले, पण ‘फोर्ड’ मोटार कंपनीच्या भारतातून पळ काढण्याला कंपनी स्वतःच जबाबदार आहे, अन्य कोणीही नाही. कारण, भारतातील वाहन उद्योग नजीकच्या काळात चांगलाच भरभराटीला आल्याचे दिसते.
 
 
देशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या तीन कोटींपेक्षा अधिक लोकांना भारतीय वाहन उद्योगातून रोजगार मिळतो व देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाहन उद्योगाचा वाटा ७.१ टक्के इतका आहे. भारतात आज जगातील जवळपास सर्वच प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपन्या कार्यरत असून नवनव्या कंपन्या प्रवेश करत आहेत. स्वातंत्र्यानंतर परदेशातून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या वाहन उत्पादक कंपन्या व प्रीमियर अशा दोनच कंपन्यांची वाहने मिळत असत. वाहनासाठी नोंदणी केल्यानंतर ती तत्काळ मिळत नसे, तर त्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत असे. मात्र, काळ बदलला. ‘मारुती’ उद्योग लिमिटेड कंपनी अवतरली, ‘महिंद्रा’, ‘टाटा’, ‘अशोक लेलॅण्ड’ अशा विविध वाहन उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी भारतीय ग्राहकवर्ग निर्माण केला. ‘महिंद्रा’ व ‘टाटा’सारख्या वाहन उत्पादकांनी भारतातच नव्हे, तर परदेशातही आपला विस्तार केला. जागतिकीकरणाच्या परिणामी वाहनांची नवनवीन ‘मॉडेल्स’, ‘डिझाईन्स’, तंत्रज्ञान, इंधन बचत क्षमता, कमीत कमी प्रदूषण करणारी इंजिन्स हे सर्व हळूहळू उपलब्ध झाले. परदेशी वाहन उत्पादकांशी टक्कर असल्याने भारतीय वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांचा दर्जा जागतिक मानदंडांनुरुप निर्माण केला. त्याचवेळी भारतात तयार झालेल्या मध्यमवर्गाच्या वाढलेल्या वाहनांच्या गरजा व त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. ‘नॅनो’पासून ‘इंडिका’, ‘सफारी’, ‘टियागो’, ‘बोलेरो’, ‘स्कॉर्पिओ’, ‘अल्टो’, ‘बलेनो’, ‘सेलेरियो’, ‘स्विफ्ट’र्यंत अशा वेगवेगळ्या वाहनांचे पर्याय समोर आले. इतकेच नव्हे तर ‘ह्युंदाई’, ‘होंडा’, ‘टोयोटा’, ‘फोक्सवॅगन’ आदी परदेशी कंपन्यांची वाहनेही पसंत केली जाऊ लागली. म्हणजेच भारतीय ग्राहकांपुढे भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांची आणि परदेशी कंपन्यांचीही विविध आकारांची, श्रेणीची, क्षमतेची वाहने उपलब्ध झाली. पण या सगळ्यात ‘फोर्ड’ मात्र आपल्या सरंजामी डौलातच मश्गुल राहिली. प्रारंभी ज्यांनी ‘फोर्ड’ची वाहने खरेदी केली त्यांना त्या वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चच अव्वाच्या सव्वा असल्याचे लक्षात येऊ लागले. सोबतच, अन्य वाहन उत्पादक कंपन्या दरवर्षी सण-उत्सव वा विशिष्ट दिवशी आपल्या वाहनांची नवनवी मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतरवत असताना ‘फोर्ड’ मात्र आपल्या त्याच त्याच जुन्या-पुराण्या मॉडेल्ससह ग्राहकांपुढे जात राहिली. अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी म्हणून जगभरात ‘फोर्ड’ मोटार कंपनी नावाजलेली आहे, पण म्हणून तिने ग्राहकांच्या गरजा, आकांक्षा वा अपेक्षेनुरुप काम न करता काहीही समोर वाढले तर ते खरेदी करण्याइतका दर्जाहीन भारतीय ग्राहक नाही. त्याला नाव कोणतेही असो, पाहिजे ते दर्जेदारच आणि तेच नेमके ‘फोर्ड’ने केले नाही. परिणामी, २०२० साली ६६ हजार आणि २०२१ साली केवळ ४८ हजार वाहनांची विक्री ‘फोर्ड’ला भारतात करता आली व घटत्या विक्रीने ‘फोर्ड’ला भारतातून माघार घ्यावी लागली.
 
 
 
नव्या भारताच्या लहान वाहनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘मारुती-सुझुकी’, ‘टाटा’ आणि ‘ह्युंदाई’सारख्य्स्स परदेशी कंपन्याही परिश्रम करत आहेत. चार वर्षांपूर्वी भारतात प्रवेश केलेल्या ‘किया मोटर्स’ कंपनीच्या वाहनांचीही इथे चांगली विक्री होत आहे. पण ‘फोर्ड’ मोटार कंपनीचे धोरण मात्र यात पूर्णपणे फसले. तंत्रज्ञानातील नावीन्य, कमावत्या तरुण वयोगटाला आकर्षित करतील अशी मॉडेल्स, छोट्या कुटुंबासह दूर अंतरावरही किफायतशीर प्रवास करता येईल, अशी वाहने अन्य कंपन्यांनी तयार केली. ‘फोर्ड’ मोटार कंपनी ग्राहकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरली. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात यंदाच्या वर्षीच्या एप्रिल-जून या तिमाहीत २० टक्क्यांनी वाढ झाली, तर एप्रिल-जुलै या चार महिन्यांत भारताने तब्बल १३१ अब्जांची निर्यात केली. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था नवनव्या विक्रमाला गवसणी घालत असल्याचे यावरुन दिसते. त्यामुळेच ‘फोर्ड’ मोटार कंपनीच्या भारतातून परत जाण्याच्या निर्णयाला मोदी सरकार जबाबदार ठरत नाही, तर त्या कंपनीचे धोरणच जबाबदार ठरते. अर्थात, ‘फोर्ड’ मोटार कंपनीकडे निधी व तंत्रज्ञानाची कमतरता नाही. त्यामुळे तिने कात टाकली तर त्या कंपनीला पुन्हा भारतात प्रवेश करताही येईल, नाही असे नाही. पण, हेन्री फोर्ड यांनी उभारलेली कंपनी, हेन्री फोर्ड यांच्या पावलावर पाऊल ठेवत तयार केलेली वाहने, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथनेही ‘फोर्ड’ची वाहने वापरली, असे म्हणत ‘फोर्ड’ मोटार कंपनी राहिली, तर मात्र तिची वाट मुश्किल आहे. कारण, हेन्री फोर्डही गेले, ब्रिटनच्या राणीनेही ‘फोर्ड’ची वाहने वापरणे बंद केले, त्यामुळे त्या मोठेपणात नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याकडेच कंपनीने लक्ष दिले तर ठीक.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.