‘ग्लोबल हिंदुत्वा’चे उच्चाटन करा, असे आवाहन करणारी आणि हिंदुत्वाला कोणत्या तरी मार्गाने उखडून टाकण्याची गरज आहे, अशी गरळ ओकणार्या ‘डिस्मँटलिंग हिंदुत्व’ परिषदेचा निषेध करावा तितका कमीच! तेव्हा, या परिषदेचा दुसरा दिवस स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील जागतिक धर्म संसद परिषदेच्या महान भाषणाशी सुसंगत असल्याने विवेकानंदांच्या त्या ऐतिहासिक भाषणाच्या आधारे मांडलेले हिंदुत्वाविषयी विचार...
स्वामी विवेकानंदांनी वर्णन केले की, “मला अशा धर्माचा अभिमान आहे, ज्याने जगाला सहिष्णुता आणि सार्वत्रिक स्वीकृती दोन्ही शिकवले आहे. आम्ही केवळ सार्वत्रिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही, तर आम्ही सर्व धर्मांचा खर्या अर्थाने स्वीकार करतो. मला अशा राष्ट्राशी संबंधित असल्याचा अभिमान आहे, ज्याने सर्व धर्मांतील आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतील शोषितांना आणि निर्वासितांना आश्रय दिला आहे. मला तुम्हाला सांगण्यात अभिमान वाटतो की, आम्ही आमच्या हृदयात इस्रायली लोकांचा शुद्ध अंतःकरणाने स्वीकार केला आहे, जे दक्षिण भारतात आले आणि त्याच वर्षी जेव्हा त्यांच्या पवित्र मंदिराचे रोमन अत्याचाराने तुकडे केले गेले, तेव्हा त्यांनी आमच्याकडे आश्रय घेतला. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे, ज्याने आश्रय दिला आहे आणि अजूनही भव्य ‘झोरास्ट्रियन’ राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रतिबद्ध आहे. बंधूंनो, मी तुम्हाला लहानपणापासून आठवत असलेल्या एका स्तोत्रातील काही ओळी उद्धृत करेन, ज्याची लाखो मानवांनी दररोज पुनरावृत्ती केली पाहिजे. जसे विविध प्रवाहांचे स्रोत वेगवेगळ्या मार्गात वाहत असतात, काही लोक स्वीकारतात, काहींची प्रवृत्ती वेगवेगळी, काही कुटिल किंवा सरळ, सर्वांचा मार्ग शेवटी एकच तो म्हणजे परमेश्वर.”
तेव्हा हिंदुत्वविरोधी अशा फाल्तू परिषदा घेणार्या आयोजकांनी सर्वप्रथम हिंदुत्वाचा अभ्यास करणे आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुत्वाकडे पाहण्याची त्यांची धारणा बदलणे आवश्यक आहे. भारतातील सध्याचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे आणि मोदी राजकारणात येण्यापूर्वी संघाचे स्वयंसेवक होते. वर्ष २०१४ मध्ये त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासून, ८० हजारांहून अधिक लोकांना जगाच्या वेगवेगळ्या भागांतून त्यांनी सुखरूप परत आणले आहे. हे काम बिल्कूल सोपे नव्हते आणि तेसुद्धा कोणत्याही व्यक्तीच्या धर्माकडे न पाहता, भारताच्या विविध धर्मांचे लोकच नव्हे, तर अमेरिकेसह युद्धग्रस्त प्रदेशातील अशा 26 देशांचे नागरिक. हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आणखी एक उदाहरण. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या दरम्यान मोदी सरकारने सर्व देशांना आपला स्वार्थ न बघता, विनंतीशिवाय आवश्यक औषधे देऊ केली. लसीकरणातही अनेक देशांना मदत केल्याबद्दल घरी टीका सहन करावी लागली. ही सर्व कृती नेमके काय दर्शवते? तर हिंदू धर्माचे सिद्धांत किती खोलवर आपल्या पंतप्रधानांनी आत्मसात केले गेले आहेत आणि त्याचे पालनही त्यांचे सरकार काटेकोरपणे करताना दिसून येते.
हिंदू धर्म केवळ ‘वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण जग माझे कुटुंब आहे) आणि ‘लोका समस्ता सुखिनो भवन्तु’ (सर्व सजीव शांती, आनंदी आणि सौहार्दाने राहो) वर नुसता विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष तशा कृतीवरदेखील विश्वास ठेवतो.
मला यानिमित्ताने जगाच्या विविध भागांतील बुद्धिवंतांना विचारायचे आहे की, जगभरात अनेक भारतीय आध्यात्मिक आणि सामाजिक संस्था कार्यरत आहेत. ते अशा काही घटनांवर प्रकाश टाकू शकतात, ज्यात एखाद्या व्यक्तीला हिंदू धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. या संस्था फक्त हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पालन करत आहेत आणि सद्भावना वाढवण्यासाठी, सामंजस्य आणण्यासाठी आणि पृथ्वीवरील सर्वांचे चांगले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. मग काही लोक किंवा काही संघटनांना हिंदुत्व का संपवायचे आहे? भारताने कधीही सत्ता, जमीन आणि संसाधने बळकावण्यासाठी कोणत्याही देशावर हल्ला केला नाही, उलट पूर्वी पाकिस्तान आणि चीनने भारताच्या प्रदेशांवर कब्जा केला आहे.
भारतातील इतर धर्मियांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. साधी गोष्ट अशी आहे की, हिंदू धर्माने सर्वांना स्वीकारले आहे, म्हणून हे स्वातंत्र्य इतर धर्मांना कोणत्याही भीतीशिवाय वाढण्यास मदत करत आहे. तथापि, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये जे काही घडत आहे, अल्पसंख्याक लोकसंख्या (हिंदू, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, शीख आणि जैन) त्या देशांमध्ये गेल्या ७५ वर्षांत का कमी झाली? यावर एक तरी अमेरिकन विद्यापीठ खोल अभ्यास करण्याचा आणि अहवाल सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करेल का?
‘न्यूयॉर्क हेराल्ड’ने स्वामीजींच्या भाषणानंतर लिहिले - “विवेकानंद निःसंशयपणे धर्म संसदेत सर्वात महान व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे ऐकल्यानंतर आम्हाला वाटते की, या शिकलेल्या राष्ट्रामध्ये मिशनरी पाठवणे किती मूर्खपणाचे आहे. मी विद्यापीठांना विनंती करेन की, त्यांनी पुढे येऊन अभ्यास करावा की, भारतात किती मिशनरी प्रत्यक्ष काम करत आहेत? ते इतर धार्मिक पद्धतींचा खरंच आदर करत आहेत आणि ते भारतातील गरीब लोकांना काय शिकवत आहेत?”
स्वामी विवेकानंद पुढे म्हणाले, “जर धर्म संसदेने जगाला काहीही दाखवले असेल तर ते असे : हे जगाला सिद्ध झाले आहे की, पवित्रता आणि दान हे जगातील कोणत्याही चर्चची विशेष मालमत्ता नाही आणि प्रत्येकाच्या धर्मात या गोष्टी आहेत. हिंदू धर्माने उच्चवर्ण असलेल्या पुरुष आणि स्त्रियांची निर्मिती आणि आदर केला आहे, तसेच बाकी धर्मांनीही. या पुराव्याच्या तोंडावर, जर एखाद्याने स्वतःच्या धर्माच्या अनन्य अस्तित्वाचे आणि इतरांच्या विनाशाचे स्वप्न पाहिले तर मला माझ्या हृदयाच्या तळापासून दया वाटते आणि हे सूचित करते की, प्रत्येक धर्माचे बॅनर लवकरच लिहिले जातील- ‘मदत करा आणि लढू नका’, ‘आत्मसात करा आणि नष्ट करू नका’, ‘सामंजस्य आणि शांतता ठेवा आणि वाद नाही.’
भारताच्या समृद्ध वारशाने व संस्कृतीने कोणालाही नाकारलेले नाही, जरी एखाद्याचा वाईट हेतू असला तरीही! भारताने आपल्या सद्भावना आणि सामंजस्यपूर्ण वर्तनामुळे, २०० हून अधिक हल्ल्यांसोबत अनेक संकटांना तोंड दिले आहे. कोणत्याही देशाने अशा संकटांचा सामना केलेला नाही, तरीही हिंदू धर्माचा हा महान वारसा जतन केला गेला आहे आणि पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या भल्यासाठी काम करत आहे. हिंदू धर्म केवळ माणसाच्या सद्भावनांवर विश्वास ठेवत नाही, तर पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठीदेखील कार्य करतो. त्यामुळे ना हिंदू धर्म उखडला जाईल आणि ना तो पृथ्वीवरील कोणत्याही चांगल्या गोष्टीचा नाश होऊ देणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधात बोलायचे झाल्यास, संघाने कधीही इतर धर्मांचा नाश करण्याचे काम केले नाही किंवा तशा बाबींवर विश्वास ठेवला नाही, तर या देशातील प्रत्येक नागरिकाने देशाच्या उत्थानासाठी एकजुटीने काम करावे आणि आपल्या देशाला सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पुन्हा महान बनवावे, अशीच संघाची इच्छा आहे व त्यादृष्टीने गेल्या 90 वर्षांहून अधिक काळ संघाची वाटचालही सुरु आहे. जर कोणी विचार करत असेल की, रा. स्व. संघ कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे, तर तो ‘अखंड भारता’साठी का काम करत आहे, ज्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानदेखील समाविष्ट आहेत? कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत किंवा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटांमध्ये संघाने मदतीसाठी कोणाच्याही धर्माकडे न पाहता, सर्वांची मनापासून सेवा केली आणि संघाचे स्वयंसेवक ते आजही करत आहेत. मग सांगा की, हिंदू धर्मासाठी बोलणे आणि काम करणे चुकीचे आहे का, तेही सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि समाजाला एकत्र करून राष्ट्राच्या गतवैभवाच्या पुन:प्राप्तीसाठी? त्यामुळे काही संघटनांनी संघाभोवती तयार केलेल्या बनावट सिद्धांताचा अभ्यास आणि विश्लेषण करण्याची आज गरज आहे. म्हणूनच सांगावेसे वाटते की, अमेरिकन विद्यापीठांतील मंडळींनी भारताला आवर्जून भेट द्यावी. रा. स्व. संघ स्वयंसेवकांसोबत वेळ घालवावा. रा. स्व. संघ किंवा हिंदुत्वाविषयीच्या खोट्या प्रचाराला अजिबात बळी न पडता खोलवर अभ्यास करून आपले मतप्रदर्शन करावे. विविध विद्यापीठांतील तज्ज्ञांनी पुढे येऊन वेद आणि भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची आज वेळ आली आहे, जेणेकरून त्यांना हिंदू धर्माचे ज्ञान होईल आणि आपण सर्वजण हे जग कसे सुधारू शकतो आणि प्रत्येक धर्माचा आदर करू शकतो, या विचारमार्गावर पुढे जाता येईल.
म्हणूनच हिंदू धर्माचे उच्चाटन करण्याऐवजी हिंदू धर्माच्या विशाल ज्ञानाचा वापर करून जगाला जोडणे आणि एकत्र करणे, या विषयावर अधिवेशना, परिषदा यांचे आज प्रामुख्याने आयोजन करण्याची गरज अधोरेखित करावीशी वाटते.
(संदर्भ : स्वामी विवेकानंदांचे विधान - History Flame )
- पंकज जयस्वाल