भारत – ऑस्ट्रेलियादरम्यान अफगाणिस्तानवर चर्चा; प्रथमच ‘२+२’ मंत्रिस्तरीय चर्चेचे आयोजन

    दिनांक  11-Sep-2021 18:10:54
|
two_1  H x W: 0

हिंद - प्रशांत महासागर क्षेत्राच्या विकासासाठी दोन्ही राष्ट्र कटिबद्ध
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान प्रथमच आयोजन करण्यात आलेल्या ‘२+२’ मंत्रिस्तरीय बैठकीमध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अफगाणिस्तानच्या परिस्थितीविषयी शनिवारी चर्चा झाली. यावेळी हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रात भारत – ऑस्ट्रेलिया सहकार्य महत्वाचे असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
 
 
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान प्रथमच २+२’ मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर ड्यूटन आणि परराष्ट्र मंत्री मारीस पायने हे भारतात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीत भाग घेतला.
 
 
बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याची माहिती दिली. ते म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचे व्यापक सहकार्य स्वतंत्र, खुल्या, सर्वसमावेशी आणि समृद्ध हिंद – प्रशांत महासागर क्षेत्राच्या संकल्पनेवर आधारीत आहे. लोकशाहीच्या दृष्टीकोनातून या क्षेत्राची प्रगती आणि शांतता यामध्ये दोन्ही देशांचे समान हितसंबंध आहेत. बैठकीमध्ये अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून या विषयावर दोन्ही देशांमध्ये सहकार्याचे धोरण ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रातील समुद्री सुरक्षा आणि अन्य मुद्द्यांवरही सहकार्य करण्याविषयी एकमत झाल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
 
 
द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासाठी दोन्ही देशांमधील सैन्य भागिदारीचा विस्तार करणे, अधिकाधिक माहितीची देवाण-घेवाण मजबूत केली जाणार आहे. मलबार सैन्य अभ्यासामध्ये भारताच्या विकसित होणाऱ्या संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये ऑस्ट्रेलियाला सहभागी होण्याचे आणि संरक्षण विषयक सह – उत्पादन आणि सह – विकासासाठीही ऑस्ट्रेलियाला निमंत्रित करण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले.
 
 
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दोन्ही देशांनी कोणतीही तडजोड न करता दहशतवादाचा सामना करण्याचे महत्व विषद केले. त्याचप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेस २० वर्षे पूर्ण होत असताना सध्याची जागतिक परिस्थिती अतिशय महत्वाची ठरत असल्याचे सांगितले. यावेळी करोना संसर्गाचा सामना करण्यासाठी भविष्यातील सहकार्याविषयी चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.
 
 
ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री ड्यूटन यांनी दोन्ही देशांचे संबंध सध्या ऐतिहासिक उंचीवर असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री पायने यांनी अफगाणिस्तानवर तालिबानचा झालेला कब्जा ही घटना दोन्ही देशांसाठी महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.