अंतिम सामन्यापूर्वी वाचली भगवतगीता आणि रचला इतिहास

01 Sep 2021 16:36:56

Sharad Kumar_1  
 
 
नवी दिल्ली : भारत सध्या टोकियो पॅरालिम्पिक २०२०मध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. आत्तापर्यंत भारताने या स्पर्धेत १० पदके जिंकली असून यामध्ये २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदक पटकावले आहेत. यामध्ये भारतीय पॅरा अॅथलीट शरद कुमारने टी४२ उंच उडीत कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. याच प्रकारात त्याच्यासोबत थंगावेलू मरियप्पननेही रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत भारतीयांनी दुसऱ्यांदा एकाच प्रकारात २ पदके जिंकण्याचा विक्रम रचला आहे.
 
 
अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करून भारताला कांस्य पदक पटकावणाऱ्या शरद कुमारने एका मुलाखतीत सांगितले की, तो अंतिम सामन्यातून माघार घेणार होता. यावेळी त्याने वडिलांच्या सांगण्यानुसार आदल्या दिवशीच भगवतगीता वाचली आणि पुढे त्याने इतिहास घडवला. शरद कुमारला सामन्याआधी ३० ऑगस्ट रोजी गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याला खेळता येईल का?, आपल्याला पदक मिळेल का? असे विचार त्याला सतावत होते. याचवेळी त्याने भारतामध्ये असलेल्या आपल्या कुटुंबाशी संवाद साधला.
 
 
शरदने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, "हे कांस्य पदक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सोमवारी सरावादरम्यान मला दुखापत झाली होती. मी रात्रभर रडत होते. तसेच, अंतिम फेरीतून माझे नाव मागे घेण्याचादेखील विचार करत होते. सामन्याच्या आदल्या दिवशी मी घरच्यांशी संवाद साधला. माझ्या वडिलांनी मला भगवद्गीता वाचण्यास सांगितले आणि मी काय करू शकतो? यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. जे आपल्या हातात नाही, त्यावर लक्ष न देण्याचा सल्लाही दिला." असे म्हणत त्याने 'हे कांस्य पदक माझ्यासाठी सुवर्ण पदकासारखेच आहे,' असे मत व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0