‘ऑलिम्पिक’ने आपल्याला एक मुक्त अनुभव घेण्याची विलक्षण संधी दिली होती. मने खरी तर ‘वढाय वढाय’ झाली होती. आपण काही टोकियोच्या प्रांगणात हुंदडत नव्हतो, पण मनाला मात्र मरगळ झटकून टाकायची संधी मिळाली होती. खरंच खेळाचं विश्व किती विश्वाव्यापी आहे. अनेक देश, अनेक खेळ, अनेक खेळाडू यांची ऊर्जा नुसती या सगळ्यांतून खळाळत वाहत होती.
‘ऑलिम्पिक’चा उत्साह आणि उन्माद नुकताच आपण पाहिला. एकंदरीत वातावरणात कोरोनाची परिस्थिती असूनसुद्धा ‘ऑलिम्पिक’मुळे जगभरात वातावरण पूर्णत: उत्साहवर्धक होते. सार्या जगभरातच लोकांच्या ऊर्जेला उधाण आलेले दिसले. तिथे ‘ऑलिम्पिक’च्या मैदानावर प्रत्यक्ष खेळणार्या खेळांडूबरोबर प्रेक्षक आणि त्यांच्या देशातील नागरिकांच्या उत्साहालाही खरंतर पारावार उरले नव्हते. कोरोना काळात विषाणूच्या भीतीने घाबरलेल्या आणि ‘लॉकडाऊन’मुळे मंदावलेल्या मनांमध्ये ‘ऑलिम्पिक’मुळे चैतन्य सळसळायला लागले. नुसत्या खेळाडूंच्या शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील खळखळणार्या तेजाकडे पाहताना पाहणार्यांच्या मनातही एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. म्हणजे जगातील प्रत्येकजण कधी एकदा आपल्याला कोरोनाच्या बंदिस्त पिंजर्यातून बाहेर पडून मुक्त भरारी घ्यायला मिळते, याची अधिरतेने वाटत पाहत बसला आहे. आपल्या घरातील टीव्ही संचासमोर बसून लोक आपलं मन मोकळ्या आकाशात संचारण्यासाठी तयार ठेवून होते. ‘ऑलिम्पिक’ने आपल्याला एक मुक्त अनुभव घेण्याची विलक्षण संधी दिली होती. मने खरी तर ‘वढाय वढाय’ झाली होती. आपण काही टोकियोच्या प्रांगणात हुंदडत नव्हतो, पण मनाला मात्र मरगळ झटकून टाकायची संधी मिळाली होती. खरंच खेळाचं विश्व किती विश्वाव्यापी आहे. अनेक देश, अनेक खेळ, अनेक खेळाडू यांची ऊर्जा नुसती या सगळ्यांतून खळाळत वाहत होती. अशा परिस्थितीत भारताच्या जहाबाँज खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची उत्तम कमाई केली. मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू, रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, लवलिना यांनी आरंभ शानदार केला आणि हॉकीच्या खेळात पुरूषांनी कांस्यपदक मिळविले, तर महिलांनीही मैदान गाजवले. जागतिक पातळीवर पदक न मिळवताही काही ना काही आपले स्थान अधोरेखित केले. काहींनी स्वतःचाच रेकॉर्ड तोडत बाजी मारली. काहीजणांसाठी या प्रांगणात संधी वाया गेल्यामुळे एक दुर्धर आठवण मागे उरली.
काहीजणांचे धैर्य तर थक्क करणारे होते. आपल्या देशाला चार दशकानंतर भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणार्या नीरजने पुढच्या काही दशकांसाठी आनंदाने उसळ्या मारायची अनमोल सुसंधी देशवासीयांंना बहाल केली. डोळ्यांचे पारणे फिटून टाकणारे, शरीरातील पेशीपेशींना धैर्य देणारे, मनाला अद्भुत अवसान आणणारे त्या वेळीच्या भालाफेकीची साजिरी सुंदर दृश्ये पाहताना आपल्या सगळ्यांना जो हुरूप येतो आणि सकारात्क रसायनांचा मेंदूत जो उत्साहवर्धी खेळ चालतो, त्याने मन तृप्त होते. तो क्षण मन आणि तन यांना संतोष देणारा असतो. एकंदरीत खेळाच्या मैदानात आपण जे पाहतो ते कौतुकास्पद असते. भावविभोर करणारे असते. ‘ये दिल मांगे मोर...’ ही लालसा त्यात असते, पण असे जगद्विख्यात कर्तृत्व गाजविणार्या या व्यक्तींची एकंदरीत मनोरचना कशी असेल, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात उभा राहतो. हे सगळं डोळ्यांचं पारण फिटणारं... या खेळाडूंना कुठून आणि कशी ही स्फूर्ती येते, हे समजून घ्यावसं सगळ्यांनाच वाटेल. एकंदरीत नीरज चोप्राची भालाफेक केवळ सुवर्णमयी नाही, तर त्या भालाफेकीत त्याने कित्येक पिढ्यांसाठी स्वप्न पाहण्याची सोनेरी वृत्ती फेकली आहे. एवढं प्रचंड कर्तृत्व गाजवायची प्रेरणा या देदीप्यमान कामगिरी करणार्या लोकांना येते कशी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यातले दोन्ही शब्द ‘कर्तृत्व’ आणि ‘प्रेरणा’ दोन्हीही महत्त्वाचे आहेत. कर्तृत्वदायी प्रेरणा किंवा ‘अचिव्हमेंट मोटिव्हेशन’ ही संकल्पना १८०० सालापासून अस्तित्वात आहे. आज मानसशास्त्रांत सर्वात जास्त संशोधन या संकल्पनेवर जगात होत आहे. विशेष करून शैक्षणिक आणि खेळ, औद्योगिक क्षेत्र संस्था किंवा संघटना या प्रांतांत कर्तृत्वदायी प्रेरणा कशी विकसित करावी, हे महत्त्वाचे ठरत आहे.
कर्तृत्व म्हणजे एखाद्याची क्षमता, यशप्रभाव दिसतो आणि प्रेरणेमधून एखाद्याची ऊर्जा, चेतना वा सक्षमतेला चालना देणारी वागणूक दिसून येते. कर्तृत्वदायी प्रेरणेत खेळाडूंचा एखादा किंवा सगळेच गुण त्यांच्या सक्षमतेला पोषक आहेत की नाहीत, हे जोखता येते. सर्वसामान्यपणे सक्षमात आणि प्रयत्नशीलता हे गुण सर्वव्यापी मानले जातात. दैनंदिन व्यवहारांतही त्याची आपल्याला गरज कळते. एखाद्याला उत्तम वक्ता व्हायचे असेल, तर एवढंच काय माळ्यालाही सुंदर बाग निर्माण करायची असेल, तर कर्तृत्वदायी प्रेरणा गरजेची आहे. यासाठी अनेक मानसशास्त्रीय घटकांची मीमांसा करणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये कर्तृत्वासाठी आवश्यक असणारी महात्त्वाकांक्षा, कर्तृत्वासाठी आवश्यक गरजा आणि वैचारिक पार्श्वभूमी, प्रयोजन किंवा उद्देश हे जितके महत्त्वाचे आहे, तितक्याच सक्षमतेची वैयक्तिक अनुभूती आणि मूल्यांकनही महत्त्वाचे ठरते. कतर्र्ृत्वासाठी आवश्यक ध्येय कशी रुजवायची, हे महत्त्वाचे आहे. यामध्ये खेळासारख्या क्षेत्रात तांत्रिक कौशल्य महत्त्वाचे आहे, पण ते वापरताना कर्तृत्वदायी प्रेरणा कशी वापरली जाते, यशाच्या दिशेने एखादा खेळाडू किती प्रेरित आहे, या गोष्टी अधिक मोलाच्या ठरतात. ज्याक्षणी एखादी व्यक्ती आपला ‘परफॉर्मन्स’ देताना वा करताना मैदानात वा स्टेजवर उभी ठाकते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरतो, तो त्यांची मानसिक तयारी. यशाकडे झेपावणाच्या वृत्तीत आपण नक्की काय करतो व कसे वागतो, या गोष्टींवर शेवटी यश आणि समाधान अवलंबून आहे. (क्रमश:)
- डॉ. शुभांगी पारकर