रत्नागिरी - लांज्यामध्ये माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत तिथल्या शिवसैनिक ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी राणे यांनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी राणे म्हणाले, इथल्या शिवसेनेला घाबरण्याची काहीही गरज नाही. यांच्या खुर्च्या, यांची टेबलं-कपाटं सगळं मला माहित आहेत. एका दिवसात उध्वस्त करून टाकीन. तुम्हाला साधं खरचटलं तरी ते मलाच खरचटल्यासारखं आहे. आपण सगळे एक परिवार आहोत तुमच्यासाठी तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेन असे सांगत त्यांनी शिवसेनेला "अंगावर आल्यास शिंगावर घेण्याचा " अप्रत्यक्ष इशाराच दिला.
बाळासाहेब आठवतात? नाही आठवत !! जिथे बाळासाहेबच नाहीत त्या पक्षावर श्रद्धा कसली? आमची श्रद्धा त्या माणसावर होती, असे राणे म्हणाले. यावेळी त्यांनी मातोश्रीवरही आरोप केले. ते म्हणाले, आता काही शिल्लक ठेवलं नाही त्या भवनामध्ये. तुम्ही आजही जा, तुम्हाला सगळे अमराठी आतमध्ये दिसतील डिलिंगसाठी येणारे. मातोश्रीच्या आजूबाजूला जेवढी फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत तिकडे रूम आणि खालचे हॉल बुकींग होतात ते सगळे यांच्या व्यवहारांसाठी होतात. मराठी माणसासाठी होत नाहीत.
मराठी माणूस तिकडे मंत्रालयात गेलाच तर त्याला स्थानदेखील नाही. पण बाहेरचा माणूस बॅग घेऊन आला असेल तर त्याला आधी आतमध्ये घ्यायचा. आपला मराठी माणूस बाहेर तडफडला तरी चालेल!! काय स्थान आहे मराठी माणसाला शिवसेनेमध्ये? असा सवाल राणे यांनी केला. आज शिवसेना सत्तेमध्ये आली पण एक मराठी भवन बनवू शकलेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.