अतिवृष्टीमुळे झालेले रस्त्यांचे नुकसान भरून काढणार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे, वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी आज ट्वीट करुन दिली. यात 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण जवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराव झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन 72 तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तसेच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने केले जाईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे
महामार्गांवर उभारली जाणार सौरउर्जा संयंत्रे
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर सौर ऊर्जा निर्मितीची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोणत्याही वाहतूक अथवा महामार्गाशी संबंधित सेवा व वृक्षारोपण करण्यासाठी राखीव नसलेल्या ठिकाणांवर सौरउर्जा संयंत्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
सध्या दसना इंटरचेंज, पुणे –सोलापूर, नागपूर बायपास, वायगंगा पूल ते छत्तीसगड सीमा आणि सोलापूर येडलशी प्रकल्पांमध्ये टोल प्लाझावरील छतांवर सौर पॅनेल्स बसवण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऊर्जा मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील संयुक्त उपक्रम एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडशी (ईईएसएल) एनएचएआयच्या उपलब्ध रिकाम्या जमिनीवर आणि टोल प्लाझावरील एनएचएआय इमारतीच्या छतावर आणि इतर एनएचएआयच्या मालकीच्या इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.