शेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे बुधवार, दि. 4 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावलेली होती. मात्र, रुग्णालयामध्ये न नेण्याचे त्यांनी सांगितल्याने घरीच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार चालू होते. आजच्या काळातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने समाजाच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत, शेगाव येथे मोजक्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
“श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार,दि. 4 ऑगस्ट रोजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “मी शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट होत असे. ते प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करीत. शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घेण्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगीसुद्धा शेगावला दर्शनाला गेलो तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
श्री संत गजानन महाराज यांच्या वास्तवाने पुनित झालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत समजून दु:ख झाले. विनम्र स्वभाव व नि:स्वार्थ सेवेकरिता परिचित असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांनी उत्तम मंदिर व्यवस्थापनाचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
श्री संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्येसुद्धा संस्थांची बांधणी केली. त्या संस्थाच्या माध्यमातून गोरगरीब आणि वंचिताची सेवा केली. त्यांच्या नि:स्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील, असे असून ते सत्य आहेत. श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यांच्या निधनाने सेवाकार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री