समाजाचे खरे नायक!

05 Aug 2021 00:32:19

Dushyant Athavale_1 
 
 
अखंड कष्ट, जिद्द आणि कार्याप्रति निष्ठात्मक समर्पण हाच दुष्यंत आठवले यांच्या यशाचा पाया आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा...
 
 
ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्राचं सोनं करणार, अशा व्यक्तीही समाजात आहेत. त्यापैकी एक दुष्यंत आठवले. एका माणसात किती आत्मिक आणि बौद्धिक शक्ती असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दुष्यंत यांचे कर्तृत्व होय. ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ शिकलेले दुष्यंत यांना ऐन उमेदीच्या काळात नोकरी करत असताना १९९९च्या दशकात ‘बेस्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअर’चा पुरस्कार मिळाला होता. पुढे इंजिनिअरिंग क्षेत्राशी तसा संबंध नसलेल्या कृषी क्षेत्रात २००७ साली ‘औरंगाबाद जिल्हा प्रगतिशील शेतकरी पुरस्कार’, तर २००८ साली महाराष्ट्र सरकारचा ‘उद्यान पंडित पुरस्कार’ मिळाला. २०१८ साली लघुउद्योग क्षेत्राचा शासनाचा ‘लघुउद्योग पुरस्कार’ मिळाला. इंजिनिअरिंग, कृषी आणि लघुउद्योग या तिन्ही क्षेत्रात स्वत:च्या कार्याचा, अस्तित्वाचा ठसा दुष्यंत यांनी उमटवला. ते आज लघुउद्योगासंदर्भातल्या केंद्र सरकारच्या ‘नॅशनल हाय पॉवर मॉनिटरिंग’चे सदस्य आहेत, लघुउद्योग आणि कृषीसंदर्भात ते विविध शैक्षणिक क्षेत्रात व्याख्यान देतात. विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची जबाबदारी दुष्यंत यांच्यावर आहे.
 
 
 
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्यासाठी शिकण्याचा मंत्र दिला. हे शिकणे आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर प्रत्येक स्तरावर अबाधित ठेवले पाहिजे,” असे दुष्यंत यांचे विचार. दुष्यंत म्हणतात की, “बाबासाहेबांनी सकारात्मक यशासाठी संघटन करा, सांगितले. संघर्ष करा म्हणजे तो संघर्ष, अत्याचार, अन्याय आणि लाचार परिस्थितीविरोधात करा, सांगितले. नाही कोणत्या जाती, धर्म आणि व्यक्तीविरोधात.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन दुष्यंत आज समाजासमोर एक आदर्श जीवनप्रणाली प्रस्थापित करत आहेत. माणसाला केवळ प्रामाणिक कष्टच वाचवू शकतात, याबाबत दुष्यंत यांची धारणा पक्की आहे. समाजात जगत असताना आपल्यासोबत सर्वांचेच भले व्हावे, हा विचार त्यांच्या मनात रुजवला तो शासकीय विद्या निकेतन शाळेच्या शिक्षकांनी. नव्हे, आयुष्याच्या सगळ्या सकारात्मकतेचे श्रेय ते या शाळेने दिलेली शिस्त, देशप्रेम मानवी मूल्ये या संस्कारांना देतात.
 
 
 
आठवले कुटुंब मूळचे बारड, नांदेडचे. लक्ष्मणराव आणि छायाबाई या दाम्पत्यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक दुष्यंत. लक्ष्मणराव शिक्षक. मुलांनी शिकावे, अशी त्यांची इच्छा. त्या इच्छेतूनच त्यांनी दुष्यंत यांना शासकीय विद्या निकेतनमध्ये शिकायला पाठवले. तिथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर दुष्यंत यांनी लवकर नोकरी लागावी म्हणून ‘इलेक्ट्रिक डिप्लोमा’चे शिक्षण घेतले. पण, त्यांना नोकरी मिळतच नव्हती. त्यामुळे डिप्लोमा केल्यानंतरही ते एका कंपनीत पॅकिंगचे काम करू लागले. कंपनी राहत्या ठिकाणापासून दूर. पण, बसने जाण्यासाठीही पैसे नाहीत. मग दुष्यंत 2.30 चालत कामाला जात, तसेच पुन्हा परत चालत येत. पुढे आकाशवाणीमध्ये नऊ वर्षे नोकरी केली. त्याच काळात त्यांचे लग्न झाले. त्यांचा मुलगा चार महिन्यांचा असताना त्यांची बदली पोर्ट ब्लेअरला झाली. इतक्या छोट्या मुलाला घेऊन पोर्ट ब्लेअरला राहण्यासाठी जाणे शक्यच नव्हते. त्यांनी वरिष्ठांना सांगितले, संबंधितांना अर्ज केले. पण, काही झाले नाही. शेवटी दुष्यंत यांनी ठरवले की, स्वत:चा व्यवसाय करावा. दुष्यंत यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने घरात वादळ उठले. दुष्यंत यांनी नवा व्यवसाय सुरू केला. इलेक्ट्रिकल कंत्राट घेणे. व्यवसायात जम बसला. त्याच वेळी बाजारात येणार्‍या शेतकर्‍यांचे प्रश्न दुष्यंत यांना अस्वस्थ करू लागले. शेतीसंदर्भात अभ्यास सुरू केला. शेती करण्यासाठी पैठणला साडेअकरा एकर जमीन खरेदी केली. तिथे शेतीचे स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून शेती केली. प्रयोगशील, यशस्वी शेतकरी म्हणून दुष्यंत यांचे नाव झाले. पुढे दुष्यंत यांनी मित्रासोबत व्यवसाय सुरू केला. त्यात ‘लेझर कटिंग’ मशीनची गरज पडे. पण, औरंगाबाद शहरात एकही नसल्याने याकामासाठी मुंबई-पुण्याला जावे लागे.
 
 
 
 
‘लेझर कटिंग’ची किंमत जास्त असल्याने औरंगाबादमध्ये ती मशीन कुणीच विकत घेत नाही, हे दुष्यंत यांना कळले. त्यांनी ठरवले की, आपण शहरात ‘लेझर कटिंग’ मशीनचा व्यवसाय सुरू करायचा. यावर लोक त्यांना सल्ला देते की, “अजिबात असं करू नकोस, तोटा होईल.” पण, एकदा दुष्यंत यांनी ठरवल्यावर त्यात युटर्न नाहीच. ‘लेझर मशीन’ची किंमत करोड रुपयांच्यावर होती. दुष्यंत यांनी मोठ्या मेहनतीने घेतलेली ती साडेअकरा एकर शेतजमीन विकली, त्या पैशांतून ‘लेझर मशीन’ विकत घेतली. आज त्यांनी या व्यवसायात चांगलीच मांड ठोकली आहे. पैसा, यश यांची कमी नाही. कधी काळी छोट्या कंपनीत पॅकिंग करणारे दुष्यंत आज समाजात एक यशस्वी उद्योगपती आहेत. यावर दुष्यंत यांचे म्हणणे आहे की, “माणसाने प्रामाणिकपणे काम केले की यश मिळतेच. पण, ज्या क्षेत्रात असू, त्या क्षेत्रात शिकणे महत्त्वाचे, तसेच गुणवत्ता असेल तर त्यांना कुणीही नामशेष करू शकत नाही. कोणत्याही प्रकारचे विवाद, मत्सर द्वेष टाळून आपण आपले लक्ष समाजकेंद्रित यशाकडे वळवले, तर आपण नक्कीच यशस्वी होतो.” दुष्यंत यांचे कार्य आणि विचार पाहता वाटते की, त्यांच्या आयुष्यातही अनेक कष्ट आणि चढ-उतार आलेच. पण, कुठेही कोणत्याही प्रकारची कटुता न ठेवता त्यांनी विचारात, आचारात मधुरता, विनम्रता कायम ठेवली. केवळ आणि केवळ ध्येयाप्रतिच समर्पण राखले. दुष्यंत आठवले यांच्यासारखे व्यक्तिमत्त्वच हे समाजाचे खरे नायक आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0