'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या गणेश मूर्तीवर बंदी का ?

30 Aug 2021 19:42:06
plaster of Paris _1 

 
सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायाची अंमलबजावणीही येत्या काळात होईल. मात, खरचं प्लास्टर ऑफ पॅरिस हे शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा घातक आहे का ? याविषयी तज्ज्ञांकडून तथ्य जाणून घेऊन केलेला हा उहापोह…..
 
 
 
प्रिया फुलंब्रीकर - सर्व धर्म समाविष्ट असलेला आपला भारत देश हा प्राचीन संस्कृतीचा आदर करून त्याचा अभिमान बाळगणारा, सर्वधर्म समभाव या तत्त्वाचा अंगीकार केलेला उत्सवप्रिय देश आहे. त्यामुळे प्रत्येक धर्मीयांनी देशात सण साजरे करण्यात काही गैर नाही. परंतु, सध्या मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची झालेली अपरिमित हानी लक्षात घेता सर्व धर्मीयांनी सण साजरा करण्याच्या आपापल्या पद्धतींमध्ये काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत कळत-नकळत झालेल्या चुका मान्य केल्यास निसर्गाचे नियम पाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरे करता येतात. पण त्याकरिता योग्य बदल करण्याची मानसिकता मात्र असावी लागते.
 
 
आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक कारणांवर आधारित तिथीनुसार साजर्‍या केल्या जाणार्‍या विशिष्ट दिवसांना सण असे म्हटले जाते. हिंदुस्थानात अर्थात भारत देशामध्ये पुरातन कालापासून हिंदू धर्मामध्ये भारतीय पंचांगाला अनुसरूनच तिथीप्रमाणे सण साजरे करण्याची पद्धत प्रचलित आहे. भाद्रपद मासातील शुक्ल चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या गणेश चतुर्थीच्या दिवशी भारतातील अनेक राज्यांत घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची विधिपूर्वक स्थापना केली जाते. येथे पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीने गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा व अतिशय प्रिय असणारा सण लक्षात घेऊया.
 
 
गणपती ही वैश्विक आणि वैदिक देवता असून हिंदू धर्मात कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्याच्या आधी सर्वांत प्रथम विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले जाते. भारतात गणेशोत्सव अनेक राज्यांत मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा म्हटलं, तर सर्वप्रथम गणपतीच्या मूर्तीचा विचार करूया. या मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याची प्रथा आहे. वाहते पाणी म्हटले की, सर्वांत आधी नदी डोळ्यांसमोर येते. परंतु, शहरांमधील नदी वाहती वाटली, तरी ती मानवनिर्मित प्रदूषणामुळे मृतवत झालेली आहे.
 
 
सरकारने या प्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित करून मप्लास्टर ऑफ पॅरिसफवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रदूषणाला केवळ मप्लास्टर ऑफ पॅरिसफ जबाबदार आहे का ? शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक आणि मप्लास्टर ऑफ पॅरिसफ हे पर्यावरणास घातक, हा ठप्पा नेमका कोणी लावला. सरकारने हा ठप्पा लावण्याअगोदर शास्त्रज्ञांचे म्हणणे ऐकून घेतले का ? मप्लास्टर ऑफ पॅरिसफ हा विघटनात्मक घटक आहे. असे असताना त्याला पर्यावरणघातक असा ठप्पा लावून त्यापासून तयार होणार्‍या गणेशमूर्तींवर सरसकट बंदी आणणे, हे कितपत योग्य आहे. सारासार विचार न करता केवळ भावनिक आणि तथ्यहिनतेने या विषयाकडे आपण पाहतोय का ? मप्लास्टर ऑफ पॅरिसफपासून तयार झालेल्या मूर्ती या पर्यावरणास घातक आहेत, या अपप्रचाराला आपण बळी पडतोय? रसायन संशोधक, अभ्यासक आणि मूर्तिकार याविषयी काय सांगतात ते जाणून घेऊया...
 
 
 
पुनर्वापर शक्य !
 
मप्लास्टर ऑफ पॅरिसफ हा जिप्सम या खनिजापासून तयार झालेला एक पदार्थ असून त्याला रासायनिक भाषेत कॅल्शियम सल्फेट असे म्हटले जाते. हा पदार्थ दैनंदिन जीवनात सर्रास वापरला जातो. बांधकाम क्षेत्र आणि ऑर्थोपेडिकफ उपचारामध्ये प्लास्टर करण्यासाठी या पदार्थाचा वापर होतो. शाडू हा केरळमधून मोठ्या प्रमाणावर आयात होतो. रासायनिक भाषेत जाणून घ्यायचे झाल्यास तो ममॅग्निशियम अ‍ॅल्युमिनियम सिलिकेटफ आहे. म्हणजेच ते ऑक्साईड आहे. मॅग्नेशियम, अ‍ॅल्युमिनियम आणि सिलिकेट यांचा मेळ या पदार्थामध्ये असतो. त्यामध्ये या तिन्ही घटकांचे एकावर एक थर तयार झालेले असतात. या थरांमध्ये सोडियम आणि पॉटेशियम असते. अशा वेळी शाडू हा पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर फुगतो. त्यामधील थर हे एकमेकांपासून दूर जातात आणि त्यामधील घटक बाहेर पडून पाण्यात मिसळतात. त्यामधील विषारी घटक स्वच्छ पाण्याला प्रदूषित करतात. शाडू वितळून पाणवठ्याच्या तळाशी जाऊन बसतो. अशावेळी हा थर पाण्याला जमिनीमध्ये झिरपू देत नाही. परिणामी, प्रदूषणाची पातळी वाढते. याउलट मप्लास्टर ऑफ पॅरिसफ हा पाण्यात विरघळत नाही. ते शाबूत राहते. त्यामुळे त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. आम्ही पुण्याच्या मराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेफमध्ये (एनसीएल) मप्लास्टर ऑफ पॅरिसफच्या विघटनासंदर्भात प्रयोग केले आहेत. मप्लास्टर ऑफ पॅरिसफची साधारण दोन किलो वजनाची गणेशमूर्ती आपण 20 लीटर पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवल्यास आणि त्यामध्ये त्याच प्रमाणात बेकिंग सोडा टाकल्यास चार दिवसांमध्ये ती मूर्ती विरघळते, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. पुण्यात अनेक ठिकाणी विसर्जनासाठी ही पद्धत वापरली जाते. मूर्ती वितळल्यानंतर पाण्यामध्ये मकॅल्शियम कार्बोनेटफचा थर तयार होतो, तर पाणी हे मअमोनियम सल्फेडफ असते. मकॅल्शियम कार्बोनेटफच्या थराचा वापर सिमेेंट किंवा विटा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, तर मअमोनियम सल्फेडफचे पाणी आपण बागेतील किंवा कुंडीतील झाडाला घालू शकतो.
- डॉ. मोहन डोंगरे, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा - पुणे
 
 
 
पर्याय उपलब्ध असताना बंदी
 
समाजामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस हे पर्यावरणास घातक आणि शाडू हे पर्यावरणपूरक अशी धारणा आहे. 2016 च्या पुण्यातील गणेश विर्सजनाच्या आकडेवारीनुसार याठिकाणी मप्लास्टर ऑफ पॅरिसफच्या 600 टन गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. उलटपक्षी पुण्यात दररोज बांधकाम व्यवसायामध्ये 100 टन प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो. यामधील विरोधाभास आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर जर बंदी घातली, तर ममोरीला घट्ट बोळा आणि दरवाजा सताड उघडाफ अशी अवस्था होणार आहे. मप्लास्टर ऑफ पॅरिसफ हा निसर्गामध्येच तयार होणार एक घटक आहे. भारतात 85 टक्के मप्लास्टर ऑफ पॅरिसफ हा खाणीमध्ये तयार होतो. राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये या खाणी आहेत. मप्लास्टर ऑफ पॅरिसफचा पुनर्वापर हा होऊ शकतो आणि त्यासंबधी यशस्वीसंशोधन हे सरकारच्याच पुण्यातील मराष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेफमध्ये झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारनेच मप्लास्टर ऑफ पॅरिसफच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पर्याय उपलब्ध असताना आणि ते पर्यावरणस्नेही असताना त्यावर बंदी आणणे चुकीचे आहे.
- डॉ. जयंत गाडगीळ, शास्त्रज्ञ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 
 
 
पाण्याचे झरे बुजले
 
माझ्या आजोबांनी सन 1928 मध्ये पुणे येथील सदाशिव पेठेत आमचे घर बांधायला घेतले तेव्हा जमिनीत 20 फूट खोदल्यावर जीवंत झरे आणि स्फटिकासारखे शुभ्र पाणी लागले. ते पाणी बघितल्यावर आजोबांनी पुढाकार घेऊन शेजारी आमचे घर यांमध्ये सामायिक विहीर पद्धतशीरपणे बांधायचे ठरवले. आमचे घर आणि विहीर दोन्हीचे बांधकाम 1929 साली पूर्ण झाल्यावर त्या विहिरीतील शुद्ध पाण्याचा दोन्ही घरांत वापर लगेच सुरू झाला. दरवर्षी पावसाळ्यात आमची विहीर पाण्याने तुडुंब भरायची. घरच्या विहिरीत गणेशोत्सवात हरितालिका, गणपतीच्या शाडूच्या मूर्ती, गौरीचे मुखवटे विसर्जित करण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक कुटुंबे यायची. परंतु, सन 2016 मध्ये अघटित घटना घडली. विपुल पाण्याने कायमच भरलेली आमची विहीर पूर्णपणे आटली इतकी की, वरून डोकावून पाहिल्यास विहिरीचा अगदी तळ स्पष्ट दिसू लागायचा. भूजलतज्ज्ञाला पाहणी करायला आमंत्रित केले तेव्हा समजले की, अनेक वर्षांचा गाळ तळाशी साचून राहिल्यामुळे विहिरीच्या तळाशी असलेल्या जीवंत झर्‍यांची तोंडे पार बुजून गेलेली आहेत. त्यामुळे जमिनीतील पाणी बाहेर येण्याचा मार्गच बंद झालेला आहे. मग आम्ही व शेजार्‍यांनी मिळून विहीर साफ करायचे ठरवले. विहीर साफ करताना तळाशी साचलेली एकूण 27 पोती चिकणमाती गोळा केली तेव्हा कुठे झर्‍यांची तोंडे मोकळी झाली व पाणी बाहेर येणे पूर्ववत सुरू झाले. बरं ती चिकणमाती म्हणजे अनेक वर्षे अगणित कुटुंबांनी गणेशोत्सवात विसर्जित केलेल्या मूर्तींची माती मुख्यत्वे शाडू माती होती. शाडू माती वरकरणी विरघळणारी वाटली, तरी ती चिकणमाती असल्यामुळे तळाशी जाऊन साचते व त्या मातीचा तळाशी राब बसतो. या स्वानुभवावरून मनाशी खूण गाठ बांधली की, गणेशोत्सवात फक्त पर्यावरणपूरक मूर्तीच वापरायच्या म्हणजे निसर्गावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही.
- प्रिया फुलंब्रीकर - नदी अभ्यासक, संस्थापक - ग्रीन बर्ड्स अभियान
 
 
 
शासनाने पर्याय द्यावा
 
मूर्तिकार म्हणून काम करत असताना आम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती या सगळ्यांमध्ये काम केले आहे. मागणीनुसार काम केले आहे. आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, शाडू माती ही प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षाही घातक आहे. त्यामुळे आता मप्लास्टर ऑफ पॅरिसफवर बंदी आली. पुढच्या चार-पाच वर्षांमध्ये शाडू मातीवर बंदी येईल. अशावेळी मूर्तिकारांनी काय करावे ? शासनाने मूर्तिकारांना त्यांच्या संज्ञेनुसार पर्यावरणपूरक पर्याय सुचवावा. त्यामुळे तो पर्याय उपलब्ध होईपर्यंत मप्लास्टर ऑफ पॅरिसफवर बंदी आणू नये - प्रवीण बावधनकर, मूर्तिकार
 
 
 
'पर्यावरणपूरक गणेश मूर्ती'
(१) फक्त पर्यावरणपूरक म्हणता येईल अशा मूर्ती म्हणजे माती किंवा माती+गोमय (देशी गायीचे शेण)+गोंद यांपासून तयार केलेल्या न रंगवलेल्या मूर्ती किंवा गेरू, हळद, नैसर्गिक कुंकू यांनी रंगवलेल्या मूर्ती. मूर्ती रंगवण्याकरिता नैसर्गिक रंग वापरणे महत्त्वाचे आहे कारण कृत्रिम रासायनिक रंग हे विषारी आणि अविघटनशील असल्यामुळे असे रंग पाण्यातील जीवसृष्टीस व मानवी आरोग्यास घातक ठरतात. या मातीच्या विघटनशील मूर्ती कोठेही विसर्जित केल्या (ओढा/नदी/समुद्र असे वाहते जलाशय) तरी पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. अगदी हौद किंवा बादलीत जरी ह्या मूर्ती विसर्जित केल्या आणि मूर्ती विरघळल्यावर ते पाणी झाडांना किंवा नुसत्या जमिनीत घातले तर ते पाणी झाडे व जमिनीकरिता हितकारकच ठरते.
 
 
(२) नुसत्या सुपारीचा गणपतीदेखील पर्यावरणपूरक म्हणता येईल. तसेच सुपारीवर कारागिरी करून त्यास मूर्तीचे स्वरूप पण देता येते. ज्यांची फक्त सुपारीवर प्राणप्रतिष्ठा करून सुपारीचा गणपती बसवण्याची तयारी असेल ते असा गणपती पर्यावरणपूरक म्हणून बसवू शकतात. परंतु मूर्तीकरिता सुपारीचा भरपूर प्रमाणात वापर होतो हे लक्षात घेता हा पर्याय शंभर टक्के योग्य म्हणता येणार नाही.
 
 
(३) शाडूची मूर्ती पाण्यात विरघळत असल्यामुळे त्यास पर्यावरणपूरक मानले जाते. पण शाडू ही चिकणमाती असून वरकरणी विरघळणारी वाटली तरी तिचा राब पाणवठ्याच्या तळाशी साचून राहतो. त्याचा विपरीत परिणाम त्या पाणवठ्याच्या तळाशी असलेल्या अखंड जिवंत झऱ्यांवर होत असतो. शिवाय शाडू माती ही गुजरातसारख्या ठिकाणांहून डोंगरावरून आणली जाते व त्याकरिता डोंगर उकरावे लागतात. ही बाब लक्षात घेतल्यास शाडूची मूर्ती देखील पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपयोगी नाही.
 
 
(४) कागद तयार करण्यासाठी झाडे तोडली जातात. त्यामुळे कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती विघटनशील असल्या तरीदेखील त्या पर्यावरणपूरक नाहीत.
 
  
(५) घरात कायम स्वरूपी धातूची मूर्ती ठेवणे व तिचा दरवर्षी गणपती उत्सवात वापर करणे ही पद्धत हितकारक आहे. आवश्यक वाटल्यास विसर्जनाची म्हणून माती किंवा सुपारीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून वापरता येते.
 
 
 
 
(लेखिका या निसर्ग संवर्धनाकरिता स्थापन केलेल्या 'ग्रीन बर्ड्स अभियाना'च्या संस्थापक आहेत)
 
(इनपूट अक्षय मांडवकर) 
 
Powered By Sangraha 9.0