टोकियो : २४ ऑगस्टला टोकियो येथे पॅरालिंपिक स्पर्धेला सुरुवात झाली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बह्रास्ताची कामगिरी पाहता पॅरालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा भारतीयांकडून ठेवण्यात आली होती. या करोडो भारतीयांच्या अपेक्षांवर आता भारतीय खेळाडू खरे उतरत आहेत. गेल्या २ दिवसांत भारताने ७ पॅरालिंपिक पदके मिळवत एक नवा इतिहास रचला आहे. यामध्ये १ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताचे पहिले सुवर्ण ; अवनीची लक्षभेदी कामगिरी
टोकियो पॅरालिंपिक २०२०मध्ये भारताने १० मीटर एअर रायफलमध्ये अवनी लेखरेने सुवर्ण पदक पटकावून मोठा इतिहास रचला. याचसोबत तिने अनेक विक्रमदेखील रचले. तिने २४९.६ गुणांसह पॅरालिंपिकचा विक्रम तर मोडीत काढलाच, याशिवाय तिने विश्व विक्रमाची बरोबरीदेखील केली आहे. याचसोबत तिने पॅरालिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला होण्याचा बहुमान मिळवला.
योगेश कठुनियाची चंदेरी थाळीफेक
टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिंपिकमध्ये थाळीफेकमध्ये भारताच्या योगेश कठुनिया याने रौप्यपदक मिळवून दिले. योगेशने ४४.३८ इतक्या लांब थाळी फेकली आणि पदक जिंकले. सुरुवातीला योगेश सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता. पण ब्राझीलच्या खेळाडूने ४४.५७ इतक्या लांब थाळी फेकत आघाडी घेतली.
एकाच क्रीडा प्रकारात २ पदके
पॅरालिंपिक प्रकारात भारताने पहिल्यांदाच एका क्रीडा प्रकारात २ पदके पटकावली आहेत. एफ४६ प्रकारात मागील सुवर्ण पदक विजेता देवेंद्र झाझरियाने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. ६४.35 मीटर भालाफेक करुन त्याने दुसरे स्थान पटकावले होते. याचबरोबर या प्रकारात सुंदरसिंग गुर्जरने ६४.०१ मीटर भालाफेक करुन तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक आपल्या नावावर केले.
भविना पटेल यांच्या रौप्य पदकाने भारताच्या पदक विजयांचा प्रारंभ
टोकियो पॅरालिंपिक २०२०मध्ये भविना पटेलने देशासाठी पहिले पदक पटकावले. तिने पॅरा टेबल टेनिस प्रकारात अंतिम फेरी गाठत, भारतासाठी रौप्य पदकांची कमाई केली. यावेळी तिला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली असली तरीही जगातील सर्वोत्तम खेळाडू चीनच्या यिंगला टक्कर दिली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर तिने सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. यामध्ये तिने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या मियोचा सेटमध्ये ३ - २ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामना गमावल्यानंतर तिने पॅरालिंपिकमध्ये पहिले पदक पटकावून देशाची मान उंचावली.
भविनानंतर भारताने २ पदके पटकावत साधली हॅट्रिक, पण...
भविना पटेलनंतर निषाद कुमार याने उंच उडी प्रकारात रौप्य पदक मिळवून भारताला दुसरे पदक पटकावून दिले. यावेळी त्याने अमेरिकेतील २ खेळाडूंवर मात करत हे पदक पटकावले. तर दुसरीकडे थाळीफेक प्रकारात भारताच्या विनोद कुमार यांनी कांस्य पदक पटकावून देशाला रविवारच्या दिवसाचे तिसरे पदक मिळवून दिले. सहा प्रयत्नांमध्ये १९.९१ मीटरचा सर्वोच्च थ्रो करत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला खरा. पण, काही वेळानंतर पदक रोखून ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.