कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणीचा नियम? इतरांना सुट

30 Aug 2021 13:06:38

UDDHAV Thackeray _1 


रत्नागिरी : कोरोना काळात राज्यातील जिल्हाबंदी लावण्यात आली होती. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ती उठवण्यात आली. यावेळी लागणाऱ्या आरटीपीसीआर चाचणी केली होती. राज्यात आंतरजिल्हा प्रवास बंदी अथवा जिल्हाबंदी नसताना, कोकणातच गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने चाकरमान्यांना घातलेली आरटीपीसीआर चाचणी अट रद्द करावी, अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीत खंडागळे म्हणाले की, "राज्यात जनतेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना बंधने नाहीत. जिल्हाबंदीही नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रशासनाने जाहीर केल्यानुसार गणेशोत्सव दरम्यान चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. जिल्हाबंदी नसताना व राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी बंधने नसताना कोकणातच गणेशोत्सवासाठी आरटीपीसीआर चाचणी का, ही अट रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जिल्हाबंदी असताना नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना जी बंधने तेव्हा होती ती आता नाहीत याकडे खंडागळे यांनी लक्ष वेधले. कोकणात महापूर आला तेव्हा आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी हजारो कोकणवासीय मुंबईतून कोकणात गेले, तेव्हा चाचण्या केल्या गेल्या नाहीत. राजकिय पक्षांची मोठी आंदोलने राज्यभर झाली. त्यावेळी कोरोना निर्बंधांचा सरकारला सोयीस्कर विसर पडला होता. पण आता सामान्य माणूस गणपतीसाठी गावाला निघाला की, त्याच्यावर नियम बंधने का?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तिकीटापेक्षा कोरोना चाचणीचा खर्च अधिक!
कोकणात गावी जाण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी गर्दी होत आहे. तर खासगी तपासणी लॅब्समध्ये असलेला कोरोना चाचणीचा खर्चही आता चाकरमान्यांना उचललावा लागणार आहे. त्यामुळे कोकणात गावी जाण्याच्या खर्चात कोरोना चाचणीच्या खर्चाचीही भर पडत आहे, अशी प्रतिक्रीया चाकरमान्यांनी दिली आहे.
 
Powered By Sangraha 9.0