एक शास्त्रीय भाषेतील व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगते की, वर्तवणूक, भावनिक प्रवृत्तीविषयक आणि मानसिक अंगाचे घटक एकत्रित येऊन जी संमिश्र प्रतिमा बनते ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. दुसरी एक सर्वसामान्य व्याख्या सांगते की, एखादी व्यक्ती एकांतात असताना किंवा इतरांशी संवाद साधताना किंवा बाह्य वातावरणात वावरताना जे भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि सातत्य दाखविते किंवा विशिष्ट स्वभाववैशिष्ट्य दर्शविते ते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते.
सगळ्या जगभर लोक ‘ऑलिम्पिक’मधील खेळ आणि सामने याबद्दल आजही आनंदाने, थोडे विस्फारितपणे, काहीशा रागाने, काहीशा निराशेने चर्चा करीत आहेत. आपल्या भारताला ४० वर्षांनी मिळालेले हॉकीचे कांस्यपदक काय किंवा नीरज चोप्राचे भालाफेकीचे सुवर्णपदक, आपल्याला भारतात उत्साहित करत आहेत, तर काही देशात त्यांची हातातोंडाशी आलेली पदके निसटून गेली म्हणून लोकांमध्ये खेळाडूंबद्दल संताप आहे, नैराश्य आहे. काहींना राजकीय भानगडींनी आपल्या देशावर अन्याय झाला आहे, असे वाटत आहे. अशाप्रकारे विविध देशात जसे लोकांमध्ये या खेळाच्या यशापयशाचे ‘पोस्टमॉर्टेम’ चालू आहे. तसेच खेळाडूंच्या मनातही भावनांची आणि विचारांची स्पंदने गरगरत आहेत. खेळाडूंचे स्वतःचे विचार आणि उद्गार त्यांच्या यशामुळे म्हणा किंवा पराभवानंतर म्हणा, पण खूप महत्त्वाचे ठरतात.
किंबहुना त्यांच्या विधानावर वा निवेदनावर सोशल मीडियावर कधी खूप गंभीर वा कधी ‘गॉसिप’युक्त चर्चासत्र होतात. वृत्तपत्रात खेळाडूंच्या विवेचनाचे रकाने लिहून येतात. त्याचे विश्लेषण होते. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचेस आपण कित्येक वर्षे पाहत होतो, आहोत. दोन्ही देशांत ते ‘स्पोर्ट्स’ खेळाडू वृत्तीने न पाहता भावनेच्या भरात पाहिले जातात. मग भावनांचा टोकाचा उद्रेकही आपण दोन्ही देशांत पाहतो. खरेतर हा अतिउत्साह आणि उद्रेक तसा आनंददायक असतो. कारण, प्रत्येक जण जणू घरच्या टीव्हीसमोर बसून क्रिकेट खेळत असतो. जर विध्वंस आणि नासधूस टाळता आली, तर लहान मुलांपासून अतिवृद्धांपर्यंत, पुरुषांपासून बायकांपर्यंत, नावाजलेल्या क्रिकेटपटूंपासून गल्लीबोळातल्या क्रिकेट खेळाडूंपर्यंत सगळ्यांना हवे तेवढे चौकार-षट्कार मारायची संधी मिळते.
‘विकेट’ काढायची, ‘गुगली’ टाकायची आणि अनपेक्षितपणे ‘कॅचआऊट’ करायची जबरदस्त सुसंधीसुद्धा घर बसल्या बसल्या मिळाली, तर रसिकांना गगन ठेंगणे वाटल्यास नवल काय! ‘पॉझिटिव्ह’ रसायने मात्र लोकांच्या मेंदूत आनंदाने उड्या मारत असतात. काही काळासाठी का होईना ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ खरोखरच असतो. असो, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे, तो आपला जय-पराजय हाताळणार्या, त्यासाठी आपली जीवनपद्धती घडविणार्या खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वाचा.सध्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, अॅथलेटिक यश आणि शारीरिक क्रिया यांमधील भाग घेण्याची प्रवृत्ती खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे. पालकांना आजच्या ‘ऑलिम्पिक’च्या बॅकग्राऊंडवर आपल्या मुलांचे करिअर खेळांमध्ये विकसित करायची इच्छा असल्यास व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीकडे खास लक्ष देणे गरजेचे आहे.‘व्यायामाचे मानसशास्त्र’ हे एखाद्या व्यक्तीचा किंवा टीमचा एकूण खेळाच्या तयारीत विकास कसा घडवून आणू शकते, याबद्दल एक दिशादर्शक मार्गदर्शन करते.
व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?
मानसशास्त्रात व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच संशोधन झाले आहे. अनेक पद्धतीने मानसशास्त्राज्ञांनी व्यक्तिमत्त्वाची व्याख्या जडणघडण आणि विकास याबद्दल चर्चा केली आहे. त्यात सिग्मंड फ्रॉईड यांच्याप्रमाणे अनेक मनोविश्लेषकांनी व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी सुलभसोप्या शब्दांमध्ये व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे, तर व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही कोण आहात, याचे विवेचन, वर्णन, कथन वा स्पष्टीकरण. आता मेंदूचे शास्त्र इतके मॉडर्न आणि विकसित झाले आहे की, आण्विक शास्त्रातूनसुद्धा व्यक्तिमत्त्वाचा परिघ समजावून घेता येईल. एक शास्त्रीय भाषेतील व्यक्तिमत्त्वाची व्याख्या सांगते की, वर्तवणूक, भावनिक प्रवृत्तीविषयक आणि मानसिक अंगाचे घटक एकत्रित येऊन जी संमिश्र प्रतिमा बनते ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. दुसरी एक सर्वसामान्य व्याख्या सांगते की, एखादी व्यक्ती एकांतात असताना किंवा इतरांशी संवाद साधताना किंवा बाह्य वातावरणात वावरताना जे भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि सातत्य दाखविते किंवा विशिष्ट स्वभाववैशिष्ट्य दर्शविते ते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते. थोडक्यात, स्वभाववैशिष्ट्य स्थायिक असते तेव्हा त्या व व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व इतरांनाही आजमावता येते. खेळाडूचे व्यक्तिमत्त्व इतरांनाही आजमावता येते.
खेळाडूचे व्यक्तिमत्त्व हे खास ‘स्पोर्ट्स पर्सनॅलिटी’ असते का, याबद्दल वैचारिक एकवाक्यता नाही. प्रत्येक ‘प्रोफेशन’चे व्यक्तिमत्त्व असू शकत नाही, पण त्या ‘प्रोफेशन’ला पोषक अशी गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तिमत्त्वात असल्यास भावनिक चढउतारांशी जुळवून घेणे सुसह्य होते.स्वभाव वैशिष्ट्याचे सिद्धांतया सिद्धांताप्रमाणे व्यक्तींचे काही गुण असे असतात जे त्या खेळाच्या परिस्थितीशी आणि सर्वसामान्य परिस्थितीशी जुळवून घेताना ते कसे वागविल, याचे नियोजन करतात. यात प्रामुख्याने अंतर्मुख आणि बहिर्मुख व्यक्ती असे गट दिसून येतात. अंतर्मुख व्यक्ती या शांत, लाजाळू असतात. आपल्या कामात मग्न असतात. कामाव्यतिरिक्त उगाचच भाष्य करत नाहीत वा मत प्रदर्शन करत नाहीत.
जाणूनबुजून या व्यक्ती जल्लोष करीत नाहीत. त्या शांतिप्रिय असतात. लक्ष एकाग्र करण्याकडे त्यांचा कल असतो. अंतर्मुख व्यक्ती संघाशी संबंधित खेळांपेक्षा एकटे खेळ जास्त खेळतात. यामध्ये विश्वनाथन आनंदसारखे सुप्रसिद्ध खेळाडू बुद्धिबळपटू आपण पाहतो. हे खेळाडू स्पर्धात्मक प्रवृत्तीच्या पलीकडे जात स्वत:ला आयुष्यभर विकसित करतात. राहुल द्रविडला ‘दि वॉल’ भिंत म्हणून ओळखले जाते. तोसुद्धा अंतर्मुख प्रवृत्तीचा आहे. स्वत:च्या खेळाकडे तो पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि कठीण परिस्थितीतही डगमगताना दिसत नाही. ‘स्नूकर’, ‘गोल्फ’, ‘मॅरॅथॉन’ यासारख्या खेळांमध्ये ही मंडळी भाग घेतात. पॉल स्कोल्स हा जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू अंतर्मुख असूनही फुटबॉलसारख्या सांघिक खेळातही जगप्रसिद्ध आहे. भारताचा धोनीसुद्धा अंतर्मुख असून सांघिक खेळाडू आहे. (क्रमश:)
- डॉ. शुभांगी पारकर