ही मंडळी थोडी विचित्र भावूक आणि असामान्य वाटली, तरी त्यांना लोकांनी नीट समजून घेतलेले नाही. हळवेपणा ही त्यांची कमजोरी वा दुर्बलता नसून ती लोकं अतिशय समर्थ आहेत, परिश्रमी आहेत आणि मुख्य म्हणजे विधायक आहेत. ती इतर सर्व सामान्य माणसांपेक्षा अधिक सजग आहेत. त्यांचा आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आणि सृजनात्मक आहे.
अतिशय हळव्या मंडळींबद्दल बोलताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे ते स्वतःचेच मोठे टीकाकार असतात. त्यांना आपण इतर लोकांच्या आनंदासाठी पूर्णतः जबाबदार आहोत, असे वाटते. लोकांना तुच्छ, हीन लेखणं त्यांना आवडत नाही. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी ‘नाही’ म्हणणं त्यांना आव्हानात्मक वाटतं. पण, ज्या पद्धतीने लोकांच्या मागण्यांचा दबाव त्यांच्यावर येतो, ते पाहता ‘नाही’ म्हणणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते. अतिसंवेदनशील व्यक्ती या परस्परविरोधी वणव्याचा बळी ठरतात. त्यांना अधिक जाणीवपूर्वक नात्यांमधला संघर्ष लक्षात येत असतो. अगदी सुरुवातीपासून त्यांना हे विवाद कळत असतात आणि या संघर्षामधील व्यक्ती हा विवाद जेव्हा टाळू पाहतात, तेव्हा हा संघर्ष अधिक भावनिक बनायला लागतो. याशिवाय सामाजिक पातळीवर ज्या काही तुलना या व्यक्तींबाबत होत असतात, त्याचाही जबरदस्त ताण त्या मनावर घेतात. जेव्हा काही कारणांनी नाती अचानक संपुष्टात येतात किंवा ती वाचविण्यासाठी आपल्याकडून काहीतरी करता आले असते, ही भावना त्यांच्या मनात येते, तेव्हा या हळव्या व्यक्ती अधिक प्रक्षुब्ध होतात. त्यांच्या मनातून या बेबनाव झालेल्या नात्यांची स्पंदने दिवसरात्र चालू राहतात. इतर लोकांना ही हळवेपणाची लक्षणे वाटतात. पण, या व्यक्ती मात्र आतून आक्रंदत राहतात. शिवाय हळव्या मनाची सहनशीलता ही तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. आपण सगळेच काही नावडत्या व्यक्ती, गोष्टी आणि प्रसंग झेलत असतो, सहन करत असतो. पण, हळव्या व्यक्तींच्या बाबतीत हे करता येणं महाकठीण गोष्ट असते. कारण, आपण अशा त्रासदायक गोष्टींपासून लक्ष विचलित करू शकतो. हळव्या मनाच्या माणसाला हे जमत नाही, उलट ही मंडळी त्यातच गुंतत जातात. आपण साधी गोष्ट पाहिली. जसे की, खूप भूक लागली तर या व्यक्ती खर्याखुर्या भुकेने कासावीस होतील. त्यांना ते सहजच होत नाही. अशा पद्धतीने त्यांचे रोजचेच नित्याचे ‘स्ट्रेस पॉईंट्स’ वाढत जातात. साहजिकच त्यांची विफलताही वाढत जाते. हळव्या व्यक्तीची स्वतःकडेच पाहण्याची प्रवृत्ती छिद्रान्वेषी असल्याने ते त्याच त्याच चुकीचे रवंथ करत राहतात. एखादी लाजिरवाणी गोष्ट त्यांच्या हातून घडली, तर त्यांना कित्येक महिने ती मनातून काढायला जमत नाही. त्यामुळे त्यांना अधिक ओशाळल्यासारखं वाटतं. आपल्याकडे कोणी पाहत आहे वा आपलं निरीक्षण करत आहे, ही गोष्ट त्यांना सहन होत नाही. किंबहुना, आपल्यावर कोणाचे तरी लक्ष आहे, हे लक्षात आले तर त्यांच्या हातून अनंत चुका होत राहतात. हळव्या मनाची माणसं प्रचंड भावुकतेने आयुष्यातील सकारात्मक असो वा नकारात्मक असो. सर्वच गोष्टी अनुभवत असतात. एखादी गोष्ट खोलात शिरून पाहण्याची त्यांची सवय असते. ही मंडळी त्यामुळे ‘सुप्पर’ विधायक असू शकतात. बुद्धिमान आणि तेजस्वी असतात.
अल्बर्ट आईन्स्टाईन, ग्रेटा गार्ब्रो, कॅथरीन हेपबर्न, निकोल कीइमॅन सारखी जगद्विख्यात मंडळी अत्यंत संवेदनशील (Highly sensitive people) म्हणून ओळखली जातात. ही सगळी मंडळी महान शास्त्रज्ञ, कलाकार, तत्त्ववेत्ते या ‘लेव्हल’ची आहेत. या व्यक्तिमत्त्वांमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या विचारशैलीत खोली आणि गांभीर्य असल्याने आपल्या कार्यात ती निष्णात होती. त्यांची मज्जासंस्था एखाद्या वाघासारखी ‘फाईन ट्यून’ झालेली असते. त्यामुळे त्यांच्या हातातील कोणतही काम जेव्हा पूर्णत्वाला जाते, तेव्हा ते अद्भुत आणि विस्मयकारी असते. या व्यक्तींच्या मेंदूमधील ‘इन्फॉरमेशन प्रोसेसिंग’ यंत्रणा (माहिती संस्करण प्रक्रिया) गतिशील असते म्हणून ते अधिक माहिती वातावरणांतून शोषून घेतात आणि त्याचे संस्करण ही सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगाने करतात. या माहितीवर ते विचार सूक्ष्म, अतिशय सूक्ष्मपद्धतीने आणि गांभीर्याने करतात. त्यामुळे बर्याच वेळा संवेदनशील मंडळी आत्मकेंद्रित आहेत की काय, असे वाटते. बर्याचदा अशा प्रकारच्या हळव्या व्यक्ती भावूक, सरळ, असुरक्षित, चिंतातुर, निराशावादी, शिष्ट वाटायला लागतात. डॉ. अॅरॉन ज्यांनी या अतिसंवेदशील माणसाच्या संकल्पनेचा शोध लावला, त्यांनी असे संशोधनात सांगितले आहे की, ही मंडळी थोडी विचित्र भावूक आणि असामान्य वाटली, तरी त्यांना लोकांनी नीट समजून घेतलेले नाही. हळवेपणा ही त्यांची कमजोरी वा दुर्बलता नसून ती लोकं अतिशय समर्थ आहेत, परिश्रमी आहेत आणि मुख्य म्हणजे विधायक आहेत. ती इतर सर्व सामान्य माणसांपेक्षा अधिक सजग आहेत. त्यांचा आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आणि सृजनात्मक आहे. स्टीव्ह जॉबसुद्धा अतिसंवेदनशील व्यक्ती आहे. त्यांच्या मते, त्यांच्या अंतर्ज्ञानी हृदयामुळे ते इतक्या उच्चकोटीच्या यशाकडे पोहोचले आहेत.
- डॉ. शुभांगी पारकर