पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : “ ‘ड्रोन’ वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम हे स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणार्या आपल्या युवकांना मोठ्या प्रमाणात मदत करतील,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. २६ ऑगस्ट रोजी केले.केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेली
‘ड्रोन’विषयक नवी नियमावली अतिशय महत्त्वाची ठरणार असल्याचे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले ते म्हणाले, “ ‘ड्रोन’ वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. हे नियम विश्वास आणि स्वयं-प्रमाणीकरणाच्या पायाभूत तत्त्वावर आधारित आहेत.
मंजुरी, अनुपालन आवश्यकता आणि प्रवेशातील अडथळे यात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. ‘ड्रोन’ वापरासंबंधीचे नवीन नियम स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणार्या आपल्या युवकांना मोठी मदत करतील. अभिनवता आणि उद्योगांसाठी ते नव्या संधी खुल्या करतील. भारताला ‘ड्रोन’ हब बनवण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील भारताच्या सामर्थ्याचा लाभ मिळवण्यास ते मदत करेल,” असेही त्यांनी नमूद केले.