"शिवसेनेला 'धनुष्यबाणा'चाही विसर पडलाय का?"

27 Aug 2021 12:42:58

MNS_1  H x W: 0
 
 
 
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीनंतर सर्व राज्य सरकारांनी आपल्या खेळाडूंसाठी योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगळेच चित्र समोर आणले आहे. मनसेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित, "शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे हे आम्ही मान्य केले आहे. पण आता स्वतःचेच चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचाही विसर पडलाय का?" असा खरमरीत सवाल विचारत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी महापौर निवासस्थानाजवळ बंद असलेल्या 'धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र' आणि त्यामुळे धनुर्विद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
 
 
 
संदीप देशपांडे यांनी पत्रात लिहिले आहे की, "गेल्या बऱ्याच वर्षांपासून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात सुरू असेलेले धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र बंद आहे. हे धनुर्विद्या केंद्र पुन्हा सुरु व्हावे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात एक धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू होते. या केंद्रात अनेक खेळाडू धनुर्विद्याचा सराव करत होते. एक दिवस प्रशिक्षण सुरू असताना एक बाण चुकून तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. पण केवळ महापौरांच्या निवासस्थानात बाण पडल्याच्या कारणातून हे प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले आहे." असे त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
"या प्रशिक्षण चालवणाऱ्या संस्थेने अनेक पदके मिळवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. या संस्थेसाठी नाही पण आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा धनुर्विद्येसाठी तरी आपण आर्चरी क्लबला सरावाकरता जागा मिळवून द्यावी. अन्यथा आपले पक्षचिन्ह विसर्जीत करत जमिन हडपणारा ‘पंजा’ किंवा संधीसाधू ‘घड्याळ’ तरी करावे," असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे.
 
 
 
पुढे त्यांनी म्हंटले आहे की, "प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आहे. याशिवाय त्याला साजेसे पक्षचिन्हही निर्माण केले. ते म्हणजे 'धनुष्यबाण' महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हा हिंदु धर्मातील महत्त्वाचे प्रतिक आहे. परंतु तरीही आपण हे धनुर्विद्या प्रशिक्षण बंद करण्याचा आदेश कम ‘फतवा’च काढल्याचे समजते आहे. शिवसेनेचे काय दुर्भाग्य व विरोधाभास म्हणावा, ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्याच चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतो आहे?" अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
त्यानंतर त्यांनी, "ही अवस्था जर खेळाडूंची होत असेल तर ऑलिम्पिकमध्ये भारताला पारितोषिक कसे मिळणार? जे खेळाडूंचे प्रशिक्षण बंद पाडून खच्चीकरण करत आहेत, त्यांना ऑलिम्पिकमधील खेळाडूंना ‘वर तोंड’ करून शुभेच्छा देण्याचा अधिकार कोणी दिला? ज्याप्रमाणे कॉमनवेल्थ गेम्समध्ये काँग्रेसने भ्रष्ट्राचार केला होता, कदाचित आघाडीत जाऊन शिवसेनेनेही हाच तर 'किमान समान कायदा' तर आखला नाही? असा प्रश्न क्रिडा प्रेमींना आणि धनुर्विद्या चाहत्यांना पडला आहे." असे म्हंटले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0