भारतीय सैनिकांकडून कुख्यात दहशतवादी अब्बास शेख ठार

25 Aug 2021 10:40:53

Abbas Sheikh_1  
 
 
नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कुख्यात दहशतवाद्याला ठार केले. गेली २६ वर्षे देशात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) कमांडर अब्बास शेखचा मोठा सहभाग होता. श्रीनगरमधील अलुची बाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी अब्बास शेख आणि त्याचा एक साथीदाराला ठार केले. स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी)च्या १० कमांडोंनी ही कारवाई केली.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी आलूचीबाग क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या अब्बास शेख आणि त्याचा सहकारी डेप्युटी कमांडर साकीब मंजूर यांना घेरले. यानंतर त्यांना ठार केले. गेली अनेक वर्षे ते पोलिसांच्या निशाणावर होते. यांच्याकडून काही शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दोघेही अनेक नागरिकांच्या हत्येत सहभागी होते.
 
 
 
सर्वात जुन्या अतिरेक्यांपैकी एक असणारा अब्बास शेख १९९६ मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला होता. गेल्या काही वर्षापासून द रेझिस्टन्स फ्रंटचा प्रमुख होता. काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी जाहीर केलेल्या १० मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कमांडरच्या यादीत त्याचे नाव अव्वल होते. तसेच तो अनेक तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेत होता असेदेखील सांगण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0