देशमुखांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात EDचं आरोपपत्र

23 Aug 2021 17:28:28

Shinde Palande _1 &n




मुंबई
: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पालांडे यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) कथित शंभर कोटी वसुली प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. बारमालकांतर्फे शंभर कोटी वसुलींच्या आरोप प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने पालांडे आणि शिंदे या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली होती.

यापूर्वी बारमालकांच्या चौकशीत आढळलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२०मध्ये गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख पदावर असलेल्या सचिन वाझे यांना ४० लाख रुपये गुड लक मनी म्हणून दिल्याची माहिती दिली होती. ईडीने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझेने बारमालकांकडून दोनदा १.६४ कोटी आणि २.६६ कोटींचा हप्ता गोळा केला. दर महिना अशाच प्रकारे रक्कम द्यावी लागेल, असेही वाझेने सांगितले होते.


वाझेने एकूण ४.७७ कोटींची रक्कम कुंदन शिंदे यांना दिल्याची माहिती ईडीला दिली आहे. तसेच देशमुखांचे निकटवर्तीय पालांडेंना दोन पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे दिल्याची माहितीही ईडीकडे आहे. वाझेने पोलीसांबद्दलच्या दिलेल्या जबाबाचीही पडताळणी ईडीने केली आहे. शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ११ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता.




Powered By Sangraha 9.0