‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ म्हणत घराघरातल्या बहिणी आणि सासरी गेलेल्या माहेरवाशिणी आपल्या भावाला हौसेने राखी बांधून हा सण फार उत्साहाने, कौतुकाने साजरा करतात. नागपंचमीला माहेरी आलेली बहीण राखी बांधूनच सासरी परत पाठवण्याची रीतभात आहे.श्रावणातल्या नारळी पौर्णिमेला होणारे हे रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या भावपूर्ण नात्याचे सुंदर प्रतीक. परंतु, कायद्याच्या एका कलमाने या भावूक हळूवार नात्यावर कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे या नाजूक नात्याची चिरफाड झाल्याची अनेक उदाहरणं आज आपल्याला समोर दिसतात.
वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना समान वाटा देणार्या कळपर्वी र्डीललशीीळेप ( राशपवाशपीं) अलीं २००५’ म्हणजेच, हिंदू वारसा हक्क कायदा, २००५ अंतर्गत मुलींना समान अधिकार अशी तरतूद करण्यात आली आहे. तेव्हापासून या कायद्याच्या कचाट्यात हा राखीचा रेशमी हळवा धागा अडकून तुटताना अनेक बहिणींच्या डोळ्यात पाणी आणतो आणि अनेक भावांच्या हृदयात काट्यासारखा सलतोय.
कितीतरी कुटुंबात या कायद्यान्वये बहिणींनी भावांवर केस ठोकल्या असून, त्या केस कोर्टात अनिर्णित आहेत, जोपर्यंत निर्णय लागत नाही, कायदेशीर पूर्तता होत नाही, तोपर्यंत त्या संपत्तीचा कुणालाच लाभ घेता येत नाही आणि जिथे निर्णय लागतो, तिथे भावांना झक्कत आपल्या मनाविरुद्ध संपत्तीतला वाटा बहिणींना द्यावाच लागतो आणि तिथूनच या नात्याचे रेशीमबंध तुटून हृदयात मात्र घट्ट गाठ बसते. इतकी की, भाऊ-बहिणीला संतापाने सुनावतो, “मिळाला ना संपत्तीत वाटा, झालं ना तुझ्या मनासारखं, आता माझ्या दारात कधी पाऊल टाकू नकोस, दिवाळीत ओवाळायला येऊ नकोस. भाऊबिजेला साडी-चोळीची अपेक्षा ठेवू नकोस आणि रक्षाबंधनाला राखी बांधू नकोस.”
धाड धाड बोलून भाऊ नातं तोडून टाकतो आणि केस जिंकल्याच्या धुंदीत बहीणपण ‘गेलास उडत...’ म्हणत, बेफिकीरपणे जीवंतपणी या सुंदर नात्याला तिलांजली देते.आपल्या डोळ्यादेखत एका अनमोल नात्याची कवडी किंमत होते. कित्येकदा ‘ती’ बहीण आणि ‘तो’ भाऊ या दोघांशीही आपलं नातं असतं. पण, आपण कुठल्याही सुई-दोर्याने ते ठिगळ जोडू शकत नाही.
अशा घटना आपल्या अवती-भोवती, नात्या-गोत्यात, मित्र परिवारात, परिचितांमध्ये घडताना पाहिल्या की, मला हिंदी सिनेमातलं आशा भोसलेंनी गायलेलं एक अति सुंदर गीत आठवतं,
“मेरे भैय्या... मेरे चंदा...
मेरे अनमोल रतन...
तेरे बदले में जमानेकी कोई
एकीकडे बहिणीचा इतका उदात्त त्याग कवी वर्णन करतोय की, तिला आपला भाऊ म्हणजे आकाशातला शीतल चंद्र वाटतो, पृथ्वीवरचं अनमोल रत्नं वाटतो आणि भावावरील या मायेच्या बदल्यात तुलनेने तिला सर्वच गोष्टी तुच्छ वाटतात, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र या कवी कल्पनेला छेद देऊन वडिलोपार्जित इस्टेटीत आपला वाटा द्यायला तयार नसलेल्या भावावर बहिणी बिनदिक्कत कोर्टात दावा दाखल करण्याइतक्या हट्टाला पेटतात.अर्थात, कधी कधी अशा प्रकरणात त्या बहिणीवर तिच्या नवर्याचा, सासरच्यांचा दबाव असण्याची शक्यता जास्त. अशा वेळी तिचा दोन्हीकडून होणारा कोंडमारा कुटुंबात कुणीतरी समजून घ्यायला हवा आणि तुटणारं नातं सांधायला हवं.
खरे तर संपत्तीत मुलींना समान वाटा हे महिला हितैषी तत्त्व जर सर्व कुटुंबांनी समजून-उमजून मान्य केलं, तर काहीच प्रश्न उद्भवणार नाही, गोष्टी इतक्या थराला जाणार नाहीत. नाती इतकी दुभंगणार नाहीत. पण, ‘कायद्याचं बोला’ याऐवजी ‘फायद्याचं बोला’ असं म्हणणारी प्रवृत्ती समाजात जास्त प्रमाणात आढळते आणि म्हणूनच इस्टेटीचे कज्जे-खटले कोर्टात वर्षानुवर्ष चालू राहतात. आयुष्य संपायला येतं. पण, भांडण संपत नाही आणि ते संपवायला माघार कोणी घ्यायची म्हणून नातं विदीर्ण करून आढ्यतेचा दोर मात्र घट्ट घट्ट होत जातो.अर्थात, या विदारक नकारात्मक स्थितीच्या अगदी विरुद्ध अशी दुर्मीळ उदाहरणं पण घडतात आणि आपली सर्वसाधारण परिस्थिती असूनही प्रामाणिक वृत्तीचा भाऊ नियमानुसार बहिणीच्या वाटचं जे आहे ते तिला उदारपणे देऊन टाकतो आणि आपलं कर्तव्य निभावतानाच नातंपण जपतो, अशाप्रकरणी ती बहीणपण तशीच असल्याने तीपण ते घ्यायला तयार होत नाही. आहे ना गंमत!
याशिवाय, सर्रास दिसणारं चित्र म्हणजे, आपली घरची गरिबी असो, श्रीमंती किंवा मध्यम स्थिती; पण बहिणी आपला हक्क बजावायला शक्यतो नकारच देतात आणि ‘जे काय असेल ते तुलाच राहू दे,’ म्हणत भावाच्या सुखी संसाराची कामना करून त्यातच आपलं सुख मानतात.पैशापेक्षा नात्याला महत्त्व देऊन कायमचं धनाढ्य होण्याची संधी अशा प्रसंगात बहिणींना मिळते, कारण या बहिणींना भाऊपण काहीच कमी पडू देत नाहीत.नातं आणि पैसा यात निवड करायची वेळ आल्यावर नात्याची निवड करणारी व्यक्ती अंततः फायद्यात राहते. कारण, माणसा माणसातले चांगले संबंध अनेक संकटात तारतात. मदतीला उभे राहतात. पैशाच्या मागे धावणारी नाती मात्र कोर्टाच्या फेर्यात गरगरत राहतात.
वास्तविक, ‘समान संपत्ती वाटपाचा कायदा’ सर्वसाधारण सार्वजनिक हित लक्षात घेऊन महिलांच्या सन्मानासाठी सरकारने केला आहे. संसारात कधी आपत्ती-विपत्तींना तोंड द्यावे लागले, तिच्यावर काही दुर्दैवी आघात झाला, तर तिला कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये आणि तिच्या असहायतेचा कुणी फायदा घेऊ नये, सासरी तिचा योग्य तो मान राहावा, हा उद्देश लक्षात घेऊन या कायद्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. पण, ‘कायदा गाढव आहे’ म्हणणारा माणूस कायद्याकडून कधी ‘गाढव’ होऊन जातो, हे त्याचं त्यालाच कळत नाही. याच गाढव लाथाळीत धुळीस मिळतात, सुंदर नाती!
कधी बहीण-भाऊ, कधी भाऊ-भाऊ, कधी बहिणी-बहिणी संपत्तीच्या वादात अनमोल माया हरवून बसतात. हिंदी सिनेसृष्टीतल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे तर प्रत्यक्ष आपल्या मायमाऊलीशीच संपत्तीवरून वाद होते, ‘हमारी बेटी’ म्हणून ज्या आईने मुलीला चित्रपट जगात उभी केली, तिनेच आईला कोर्टात खेचून मायलेकीचं नातं आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं!अशावेळी वाटतं; भांडणं होतील इतकी संपत्तीच आपल्या नावावर नसलेले वारसदार भाऊ-बहिणी खरे श्रीमंत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यामागे संपत्ती ठेवली नसली, तरी संस्काराची संपदा भरपूर दिली. अशा संस्कारसंपन्न घरात मात्र भाऊबीज दणक्यात साजरी होते आणि राखीचा हळवा धागा मायेत ओतप्रोत भिजून जातो.
- अमृता खाकुर्डीकर