वारली चित्रकलेच्या माध्यमातून हिंदुत्व जपणारा कलाकार

21 Aug 2021 22:04:53

varli_1  H x W:

“वसईतल्या एका फादरने मला ‘बायबल’मधील प्रसंग वारली चित्रशैलीत काढण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी हवा तेवढा पैसा देतो, असे सांगितले. मात्र, मी त्या कामाला नकार दिला. कारण, मी ‘बायबल’मधील प्रसंग रेखाटले असते, तर माझे समाजबांधवही तिकडे आकर्षित झाले असते आणि त्यायोगे ख्रिश्चन धर्मांतर घडविण्याचा फादरचा मनसुबा यशस्वी झाला असता,” असे सांगणारे, वारली चित्रकलेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा वारसा जोपासणारे आणि ‘संपूर्ण रामायण’ वारली चित्रशैलीत रेखाटून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ते चित्र सादर करणारे डहाणूमधील वारली कलाकार हरेश्वर वनगा यांच्याशी केलेली ही
खास बातचित...
 
वारली चित्रशैलीकडे तुम्ही कसे आकर्षित झालात?
वारली चित्रशैली ही खरे तर आमच्या समाजाची पारंपरिक कला, त्यामुळे ती इथे प्रत्येकाच्याच घरात आहे. आमच्या समाजामध्ये लग्न होतात, तेव्हा त्या घरात चौक रेखाटला जातो. त्यावेळी घरातील आमची आजी, आई तो रेखाटतात. त्यामुळे माझ्या आजी आणि आईला वारली चित्रे रेखाटताना बघतच मी लहानाचा मोठा झालो. लहानपणी आई चौक रेखाटताना मी त्याबद्दल तिला बरेच प्रश्न विचारायचो, त्यातूनच वारली चित्रशैलीचे संस्कार माझ्यावर होत गेले. मात्र, माझ्यामधील कलाकार जीवंत ठेवण्याचे श्रेय मी विश्व हिंदू परिषदेला देईन.
वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद यांच्याशी संपर्क कसा आला?
सुरुवातीला विश्व हिंदू परिषद अथवा वनवासी कल्याण आश्रमाविषयी मला लहानपणापासून तशी फारशी माहिती नव्हती. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मी विश्व हिंदू परिषदेमध्ये पहिल्यांदा दाखल झालो. त्यांच्या वसतिगृहात आणि अन्य वसतिगृहांमधला, शाळेमधला फरक मला लगेच जाणवला आणि या ठिकाणी वेगळं काहीतरी आहे, हे मला जाणवले. समाजाला चांगल्या मार्गावर घेऊन जाणारी ही लोकं आहेत, हे माझ्या लक्षात आले.
विश्व हिंदू परिषदेमध्ये तुमच्या कलेला प्रोत्साहन मिळाले का?
विश्व हिंदू परिषदेच्या शाळेत शिकत असताना मी चित्रे काढायचो. मात्र, त्यामध्ये तेवढा सफाईदारपणा नव्हता. पण, माधवराव काणे यांनी एकदा माझी चित्रे बघितली आणि माझ्या कलेचे कौतुक केले, मला प्रोत्साहन दिले. पुढे शेतातली माती घेऊन मी गणपती तयार करण्याचा प्रयत्न केला. ते माधवरावांना खूप आवडले आणि मला आणखी मूर्ती तयार करायला सांगितले. त्या मूर्ती तलासरी तालुक्यात नेऊन गणपती स्थापन करायची कल्पना त्यांनी मांडली. मात्र, तेथील काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्या मूर्ती तोडल्या. मग मी पुन्हा मूर्ती तयार केल्या आणि माधवरावांसोबत गनिमी काव्याने तलासरीमध्ये मूर्ती नेल्या व तिकडे गणपती स्थापना केली.हा अनुभव मला खूप काही शिकवून जाणारा होता. मूर्ती तोडल्यानंतर मी प्रचंड नाराज झालो होतो. मात्र, माधवरावांच्या प्रोत्साहनाने मी माझ्यातला कलाकार जीवंत ठेवला आणि त्यामध्ये मग सुधारणा घडवल्या. मूर्ती तोडल्या गेल्यानंतर जर माधवरावांनी माझी समजूत काढली नसती, तर मी कदाचित कलेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असते.
वनवासी समाजाचे हिंदुत्व अधिक मजबूत करण्यात कलेने कशी भूमिका बजावली?
ज्या तलासरीमध्ये आमच्या गणपती मूर्ती तोडण्याचा प्रकार घडला होता, त्याच तलासरीमध्ये आज जवळपास ४५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. कलेच्या माध्यमातून अशाप्रकारे तेथील हिंदुत्व जागृत झाले, वनवासी बांधव पुन्हा अतिशय जोरदारपणे पूजा-अर्चा करायला लागले. आता हे सर्व करण्याचे प्रोत्साहन मला विश्व हिंदू परिषदेच्या वसतिगृहात मिळाले.याविषयी एक उदाहरण मला सांगायलाचं हवं. वसई तालुक्यातील एका ख्रिस्ती मिशनर्‍याने मला ‘बायबल’मधले प्रसंग वारली चित्रशैलीत रेखाटण्याची ऑफर दिली. त्यासाठी त्याने मला हवा तेवढा पैसा देतो, असे सांगितले. त्यानंतर मग त्याने मला ‘बायबल’ वाचण्यासाठी आणून दिलं आणि वाचन झाल्यानंतर चित्रं काढा, असा सल्ला दिला. मात्र, मी त्या मिशनर्‍याला चित्रे काढणार नसल्याचे ठामपणे सांगितले. कारण, मी जर ‘बायबल’मधील प्रसंग वारली चित्रशैलीत चितारले असते, तर साहजिकच माझे बांधव ‘बायबल’कडे आकर्षित झाले असते. त्या मिशनर्‍याचाही अशा प्रकारे धर्मांतरे घडविण्याचा मनसुबा होता. मात्र, माझ्या एका नकारामुळे तेथे धर्मांतराचा मनसुबा मी पूर्णत्वास जाऊ दिला नाही.
वारली चित्रशैलीच्या भविष्याविषयी तुम्हाला काय वाटते?
 
वारली समाजाचा अतिशय संपन्न वारसा म्हणजे वारली चित्रशैली. यामध्ये आज कालानुरूप बदल होत आहेत, पूर्वी चित्रे केवळ कुडाच्या भिंतींवर तांदळाच्या पिठीने आणि बोरूचा वापर करून काढली जात असत. मात्र, आज कागदावर आणि कापडावरही ती रेखाटली जातात. त्यासाठी ब्रशचाही वापर केला जातो. असे बदल कालानुरूप होणारच; मात्र आता खरी गरज आहे ती वारली चित्रशैलीच्या पारंपरिकतेचे जतन करण्याची. कारण, ही अन्य लोकांसाठी केवळ चित्रे असली तरीही आमच्यासाठी ती एक चित्रभाषा आहे. त्यात सध्या ‘मार्केटिंग’ करण्याच्या नावाखाली धादांत खोट्या गोष्टीही खपविल्या जात आहेत. वारली चित्रशैलीची बरीच वैशिष्ट्ये अद्याप जगासमोर आलेली नाहीत आणि ती जाणणारी पिढीही हळूहळू काळाच्या ओघात विरून जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वारली चित्रशैलीचे शास्त्रीय पद्धतीने ‘डॉक्युमेंटेशन’ होणे गरजेचे आहे.
‘संपूर्ण रामायण’ राष्ट्रपतींना भेट देतानाचा अनुभव कसा होता?
आज जवळपास ३५ ते ४० वर्षांपासून मी वारली चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या कालावधीमध्ये माझ्यावर अन्यायाचेही अनेक प्रसंग आले, मला या क्षेत्रातील कंपूशाहीचा, मी विश्व हिंदू परिषेदेचे काम करीत असल्याने डाव्या विचारांच्या मंडळींना माझ्यातील कलाकारावर भरपूर अन्याय केला. माझे चित्र दिल्लीपर्यंत पोहोचावे, अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ‘संपूर्ण रामायण’चे चित्र भेट दिल्यावर त्यांनी जे कौतुक केले, त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे. जवळपास १५ मिनिटे राष्ट्रपतींनी आमच्याशी संवाद साधला. मी त्यांना चित्राची सविस्तर माहिती दिली. त्यांनीही माझा संपूर्ण प्रवास समजून घेतला. राष्ट्रपतींनी केवळ माझ्या कलेचाच नव्हे, तर वारली चित्रशैलीचा सन्मान केल्याची माझी भावना आहे.


‘मीच पौरोहित्य करतो आणि ख्रिश्चन मिशनर्‍यांचे मनसुबे उधळून लावतो!’ आमच्या वनवासी समाजाला हिंदुत्वापासून तोडण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत. वनवासी समाज आज आपल्या पद्धतीने पूजा-अर्चना करतो. मात्र, त्यातही पुरोहिताला म्हणजेच ब्राह्मणाला बोलावू नका, कारण तो तुमच्याविरोधात आहे, असा प्रचार काही मंडळी करतात. पुढे मग त्यांना हिंदू परंपरांपासून तोडण्याचा प्रकार सुरू होतो. मात्र, हा मनसुबा मी माझ्या पद्धतीने हाणून पाडला आहे. कारण, आज आमच्या समाजात होणार्‍या धार्मिक विधींसाठी मीच पौरोहित्य करतो. त्यामुळे ख्रिस्ती फादरच्या प्रवेशावर आणि पुढे त्याने धर्मांतराच्या कारवाया करण्यावर आपोआपच पायबंद घातला गेला आहे, असेही वनगा अगदी अभिमानाने सांगतात.

- हरेश्वर वनगा









 
 
 
Powered By Sangraha 9.0