रंगलेपनाला आध्यात्मिक गतीत शोधणारे कलातपस्वी प्रा. केशव मोरे

20 Aug 2021 23:46:43

painter_1  H x
या सप्ताहात नाशिक येथे वास्तव्यास असलेले, परंतु सार्‍या कलाविश्वाला एकाहून एक असे कलाविद्यार्थी बहाल करणारे आणि दृश्यकलेतील ’प्रामाणिकत्व’ जपण्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड तसेच विचारांची तोडफोड न करणारे असे, ज्यांच्या नावात महाभारतातील महानायक असलेल्या बहुभूमिका निभावणार्‍या भगवान श्रीकृष्णाचे एक नाव आहे; मात्र ज्यांच्या कुंचल्याचा फटकारा आणि वाणी रामायणातील महानायक प्रभू रामचंद्रांच्या ‘एकवचनी-एकबाणी’ तत्त्वांनुसार व्यक्त होत असते, अशा कलातपस्वी प्रा. केशव मोरे सरांच्या कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...


माझे ज्येष्ठ व चित्रकार मित्र विनायक टाकळकर यांच्यासह प्रा. केशव मोरे सरांना भेटण्याचे भाग्य लाभले. स्पष्ट, सडेतोड, नि:संदिग्ध आणि अनुभवाचे बोल ऐकताना एका प्रदीर्घ तसेच प्रगल्भ कलाजीवनाचा शब्दपट उलगडत उलगडत कोरा ‘कॅनव्हास’ आध्यात्मिक रंगांनी रंगत जाताना जसा प्रत्यक्षानुभव यावा, असा अनुभव आम्ही घेत होतो. जेव्हा सर बोलत होते, ज्येष्ठ चित्रकार आणि प्रा. रामदास महाले, ज्येष्ठ चित्रकार प्रा. शंकर पळशीकर, ज्येष्ठ चित्रकार गोविंद सोलेगावकर आणि कलाप्रशासनात स्वतःची स्वतंत्र ऐतिहासिक कारकिर्द करवून गेलेले ज्येष्ठ चित्रकार प्रा. बाबुराव सडवेलकर यांची नावे आदराने घेत मोरे सर औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातील तब्बल २० वर्षांचा कलाध्यापनाचा अनुभव आणि तत्पूर्वीचा नाशिक येथील कलाध्यायनाचा दशकांहून अधिक अनुभव सहजपणे सांगत होते. त्यांचा प्राकृतिक स्वभावच पारदर्शी आणि सुस्पष्ट असल्याने आज मोठी वाटणारी कलाक्षेत्रातील बरीच व्यक्तिमत्त्वे सरांनी, डोंगराच्या जवळ गेल्यावर डोंगर कसा अनुभवायला मिळतो, तशीच विशद केली.
 
इतर क्षेत्रांप्रमाणेच दुर्दैवाने आमचे हे कलाक्षेत्रही दृष्टावले असल्यामुळे बरबटलेल्या रंगराजकारण्यांमुळे मोरे सरांना कागदोपत्री ज्येष्ठता भलेही देण्यात आली नसेल, परंतु व्रतस्थ व्यक्ती या सार्‍याच्या फार पुढे केव्हाच पोहोचलेली असते. त्यांना कागदावरच्या ज्येष्ठतेत अजिबात स्वारस्य नसते. अशा व्यक्ती नेहमी विचारांनी ज्येष्ठ ठरतात. त्यांची वैचारिक व्याप्ती अवकाशाला गवसणी घालते, तर प्रतलाचा ठाव घेते. रंगांच्या साधनेपुढे अशा व्यक्तींना कागदोपत्रीची क्षणिक ज्येष्ठता फार फुटकळ भासते. मोरे सरांच्या बाबतीतील त्यांना आलेले हे सारे अनुभव म्हणजे कलाक्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करणार्‍यांसाठी एक ‘कलागाथा’च ठरतील. विद्यार्थी अवस्थेतील मोरे आणि कलेला, आध्यात्मिक स्थितीतून पाहणारे कलातपस्वी मोरे सर, हा कलाप्रवास केवळ अद्भुतच नाही, तर अवलियाप्रमाणे आहे. स्वामी परमहंस प्रकाशानंद सरस्वती, वणी आणि संत कबीर यांच्या विचारतत्त्वांनी प्रभावित असलेल्या मोरे सरांनी कलाध्यापनासह कलासाधनेत एका ठाम आणि निश्चित विचारांना प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांची व्यक्तिचित्रणे ही पाहणार्‍याशी संवाद साधतात. ज्या गुरुजनांच्या कलाकृती त्यांनी पाहिल्या, त्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, त्यांच्या पॅलेटचा अभ्यासही मोरे सरांनी केलेला असला, तरी चित्रकार केशव मोरे सरांच्या व्यक्तिचित्रणातील व्यक्ती ही दीर्घायुषी आणि पाहणार्‍याशी सुसंवाद साधणारी असते. हा अनुभव त्यांच्या कलाकृती पाहणार्‍याला येतोच येतो. पाहणारा जेव्हा एखाद्या कलाकृतीकडे पाहतच राहतो, तेव्हा पाहणार्‍याला कळतच नाही की, ती कलाकृती त्याच्याशी सुसंवाद साधत आहे, ही अवस्था जेव्हा पाहणार्‍याला येते तेव्हा ते यश त्या कलाकृतीला प्राप्त झालेले असते. अर्थातच अशी कलाकृती निर्माण करणारा कलाकार कोणत्या एका परमोच्च स्थितीला पोहोचलेला असतो, याचा ठाव शोधण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा!
 
सरांशी बोलत असताना त्यांनी रंगलेपनाच्या वेळी त्यांची होणारी अवस्थाच विशद केली. ते म्हणाले, “कॅन्व्हास रंगवताना श्वास मंद मंद होत जातो. हातातील कुंचल्यातून कॅन्व्हासवर जे काही अवतरत असतं, ते प्रचंड अशा एकाग्रतेतून प्रकट होत असतं, विचार पूर्ण स्थिर झालेला असतो. कॅन्व्हास-कुंचला-हाताची बोटं यांच्यावर स्थिरमनाने ताबा मिळवलेला असतो. हे सारे जेव्हा जुळून येते तेव्हा ती कलाकृती पाहणार्‍याला कलारसिक बनवते.” प्रचलित रंगलेपनकार हे केवळ रंग कॅन्व्हासवर लेपायचा आहे, या ड्युटीने काम करताना दिसतात. म्हणून त्यांना ‘कलाकार’ न म्हणता ‘रंगलेपनकार’ म्हणायला हवे, असे वाटायला लागले, जेव्हा मोरे सरांचे कलेबद्दलचे आणि कथित कलाकारांबद्दलचे विचार ऐकायला मिळाले तेव्हा...
 
 
सरांचा कॅन्व्हास हा जेव्हा त्यांच्या समोर उभा राहतो, तेव्हा सर आणि ते तादात्म्य पावतात. ही अवस्था पाहणारा जर दर्दी असेल तर तत्क्षणीच त्याच्या ध्यानात येईल. सरांचे रंगलेपन म्हणूनच कृत्रिम वाटत नाही, ‘रेंज्ड’ वाटत नाही. त्यांच्या कलाकृती पाहताना निखळ आनंद होतो. ओरबाडून आणलेले किंवा मेकअप केलेले रुपडे आणि ईश्वरीय सौंदर्याचा आविष्कार, जे चिरंतन असते असे मूर्तिमंत तेज यातील फरक अनुभवायचा असेल, तर मोरे सरांच्या कला सृजनात्मक कलाकृती पाहाव्यात.
 
 
‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चा व्यक्तिचित्रणातील प्रतिष्ठेचा पुरस्कार, दोन वेळा ‘म्हैसूर दसरा महोत्सव पुरस्कार’ यांसह त्यांच्या इतर काही कलाकृतींनाही सन्मान प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कलासाधनेचा उशिरा का होईना, परंतु सन्मान केला. दि. 23 जानेवारीला सरांना सरकारने ‘कलासन्मान’ प्रदान केला. ‘कलाध्यापन’ ही नोकरी नसून सेवा आहे, साधना आहे. याच भावनेतून मोरे सरांनी औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात कला विद्यार्थी घडविले. बर्‍याचदा मितभाषी राहूनही रंगाकारांद्वारे संवाद साधणारे मोरे सर नेहमीच विद्यार्थ्यांबरोबर त्यांचाही एक इझल उभा ठेवायचे. त्यांचा स्टुडिओ म्हणजे एक मेडिटेशन हॉल ठरायचा. ज्या खुर्चीवर नव्हे, तर आसनावर बसून ते कलाध्यापन करायचे, त्या आसनावर त्यांचे समकालीन एक कलाध्यापक, जेव्हा अधिष्ठाता म्हणून बनवले गेले तेव्हा वर्गातील राऊंड मारतेवेळी नकळतपणे बसले आणि अचानक त्या खुर्चीवरून उठल्याचा किस्सा सरांनी सांगितला. कला निर्माण करणे ही साधना असून ती एक आध्यात्मिक बैठक असते. ओशोंनी सांगितले होते की, सर्व प्रकारच्या कलाकारांमध्ये चित्रकार हा फार लवकर ‘मेडिटेट’ होतो, म्हणजे तादात्म्य पावतो. जर या स्थितीला अचूक वेळेचा रियाज असेल, तर ती जागाच काय, त़ो परिसरही तितकाच भारावला जातो.
प्रा. मोरे सरांनी खूप वेळ दिला. भरपूर अनुभव सांगितले. शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबादच्या अनेक आठवणी जागवल्या. चित्रकार पळशीकर यांच्या चित्रशैलीत व्यक्तिचित्रणातील शरीरशास्त्राचा अभ्यास त्यांनी अनुकरला. परंतु, पळशीकर यांच्या ‘रंगपॅलेट’चा सन्मान ठेवत काही रंगमिश्रणे ही स्वतःचीच निर्माण केली. चित्रकार सोलेगावकरांच्या चित्रशैलीतील बारकाव्यांचे तपशील, अंबर आणि ऑकरचा रंगलेपनातील लपंडाव त्यांनी अनुभवला. मात्र, स्वतःच्या शैलीमध्ये अंबरकडे जाणारी, पांढरा मिसळून तयार होणारी प्रकाशाकडील गल किंवा व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भाव चित्रणात आणण्याचे कसब हे मात्र स्वत:चेच. ‘स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ ही म्हण रंगोपासनेत सिद्ध करून मोरे सरांनी ‘याची देही याची डोळा’ कलारसिकांना कलाकृती पाहतानाचे स्वर्गसुख दिले. चित्रकार बाबुरावांचा ‘कोबाल्ट टू स्काय ब्ल्यू’ हा प्रवास त्यांनी अनुभवला. मात्र, त्यातून प्रेरणा घेऊन मोरे सरांनी एका विशुद्ध रंगातून दुसर्‍या विशुद्ध रंगाकडे जाणारा प्रवास घेतला. त्या त्या रंगांचे अस्तित्व अबाधित ठेवून उचित परिणामही साधायचा आणि भावदेखील व्यक्त करायचा! हे सारं फक्त योग्यालाच शक्य आहे. मोरे सरांच्या साधनेतून व्यक्त होणार्‍या रंगानाही देवत्व लाभते, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या कलाप्रवासाला आरोग्यदायी, निरोगी सुदृढत्व लाभावे आणि त्यांच्या सृजनात्मक कलाकृती पाहण्याची पर्वणी पुढील अनेक वर्षे रसिकांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांच्यावतीने मोरे सरांना मनापासून शुभेच्छा व सदिच्छा!


- प्रा. डॉ. गजानन शेपाळ






 



 
 
 
Powered By Sangraha 9.0