रुग्णांचे हितरक्षक

19 Aug 2021 19:24:32

Peshkar  _1  H




कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांना अन्नधान्याची वानवा भासत होती, तर दुसर्‍या लाटेत नागरिकांना ‘ऑक्सिजन’, इंजेक्शन, रुग्णालयातील खाटा, औषधे यांची भासणारी वानवा यांचा सामना करावा लागला. अशावेळी प्रदीप पेशकार यांनी रुग्णांच्या हिताचे म्हणजेच सर्वात जास्त आवश्यक असणार्‍या ‘ऑक्सिजन’चा पुरवठा जिल्ह्याला व्हावा, यासाठी पुढाकार घेतला. पेशकार यांच्या या कार्यातून एक प्रकारे त्यांनी रुग्णांच्या हिताचे खर्‍या अर्थाने हितरक्षण केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.



पेशकार हे ‘उद्योग मित्र’ संस्थेचे अध्यक्षदेखील आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उद्योग-व्यवसाय काही अटी-शर्तींसह सुरू होते. पण, या काळात उद्योगांना मदत करणेदेखील आवश्यक होते. त्यासाठीदेखील पेशकार यांनी सर्वतोपरी मदत केली. तसेच, भासणारी वैद्यकीय सुविधांची वानवा दूर करण्यासाठी पेशकार यांनी पुढाकार घेतला. पेशकार यांनी त्यांच्या ‘श्वास फाऊंडेशन’ व ‘उद्योग मित्र’ या संस्थांच्या माध्यमातून मदत केंद्र कार्यन्वित केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी कोरोना तपासणी, बाधित रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, त्यासाठी रुग्णालयांशी सातत्याने संवाद साधणे, रुग्णांचे नंबर रुग्णालयात लावणे, आदी कार्य मोठ्या निष्ठेने केले.
 
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘ऑक्सिजन’च्या पुरवठ्यात मोठी समस्या जाणवत होती. यासाठी विविध उद्योगांना आवाहन करून ३७ लाख रुपयांचा निधी त्यांनी संकलित केला. या रकमेच्या माध्यमातून त्यांनी ‘व्हेंटिलेटर’, ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ मशीन शासकीय ग्रामीण रुग्णालय, श्रीगुरुजी रुग्णालय व विश्वकर्मा संस्था यांना दिले. नाशिक शहरात या काळात उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व नाशिक जिल्ह्यातील रुग्ण सातत्याने दाखल होत होते.
 
 
त्यामुळे शहराच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता, तसेच ‘ऑक्सिजन’ व बेड यांचीदेखील कमतरता त्यामुळे भासत होती. या समस्येबाबत पेशकार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संवाद साधला. त्यानुसार प्राप्त माहितीच्या आधारे पेशकार यांनी ग्रामीण भागातील रुग्णांवर तेथेच उपचार होण्यास मदत व्हावी, यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत ‘व्हेंटिलेटर’ प्रशासनास सुपूर्द केले.
 
 
 
‘ऑक्सिजन’ची कमतरता नाशिकमध्ये का भासली, याबाबत पेशकार यांनी विचारमंथन केले असता त्यांना जाणवले की, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि जिल्हाधिकारी कार्यालय यात असमन्वय आहे. सहा मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून नाशिकमधील ११ पुरवठादार यांना ‘ऑक्सिजन’ प्राप्त होत असतो व ते १७३ रुग्णालयांना त्याचा पुरवठा करतात. हे गणित नेमके बसविणे प्रशासनास शक्य होत नव्हते. रुग्णांना ‘ऑक्सिजन’चा पुरवठा व्हावा, यासाठी पेशकार यांनी प्रसंगी आक्रमक भूमिका जिल्हा प्रशासनासमोर घेतली.
 
 
 
तसेच, त्यांनी ‘एफडीए’च्या मदतीला आपले काही कार्यकर्ते दिले. त्यामुळे जिल्ह्यात ‘ऑक्सिजन’चे समभागात वितरण होण्यास सुरुवात झाली. तसेच, जामनगर येथील ‘रिलायन्स प्रकल्प’, ओडिशातील रुरकेला येथील ‘स्टील प्लांट ऑफ इंडिया’, छत्तीसगढ येथील ‘भिलाई स्टील प्लांट’ येथून ‘ऑक्सिजन’ असणारे क्रायोजेनिक टँकर मिळावे यासाठी टँकर पुरवठादार व जिल्हा प्रशासन यांची सांगड पेशकार यांनी घालून दिली. याकामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय व नाशिक येथील ‘अशोका ग्रुप’चे संजय लोंढे यांचे त्यांना सहकार्य लाभले.
 
 
 
रस्तामार्गाने इतक्या दूरच्या अंतरावरून टँकर आणण्यात वेळ जाणार होता. त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून टँकर आणावे, अशी पहिली सूचना पेशकार यांनी केंद्र सरकारकडे मांडली आणि रेल्वेने ते टँकर आणण्याचे धोरण केंद्र सरकारने जाहीर केले. भारतातील पहिली ‘ऑक्सिजन’ घेऊन येणारी ट्रेन नाशिकला दाखल झाली, असे पेशकार सांगतात.
 
 
 
याशिवाय १२ बलुतेदार वर्गातील सुमारे ५०० कुटुंबांना पेशकार यांनी शिधावाटप केले. त्यात त्यांनी तांदूळ, डाळ, पीठ, शेंगदाणे आदी एक महिना पुरेल, इतक्या किराणा मालाचे वितरण त्यांनी केले. तसेच, ‘रामकृष्ण आरोग्य संस्थे’च्या सहकार्याने दहा हजार कुटुंबांना ‘मल्टिव्हिटामीन’ गोळ्यांचे वाटप केले. याकामी ‘श्वास फाऊंडेशन’चे मकरंद वाघ व टिमने पुढाकार घेतला.
 
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जाहीर करण्यात आलेले अतिरिक्त कर्ज अनेक उद्योगांनी घेतले नव्हते. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत काही उद्योजकांना त्याची निकड भासू लागली. मात्र, जाहीर करण्यात आलेली मुदत संपली होती. त्यामुळे ही मुदत वाढावी यासाठी पेशकार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला. त्यामुळे दीड लाख कोटी रुपयांचे बजेट याकामी वाढविण्यात आले. तसेच, “कर्जाची पुनर्बांधणी करण्याचीदेखील गरज उद्योजकांना भासत होती. त्यानुसार २१ जून, २०२१ रोजी ‘आरबीआय’ने धोरण जाहीर केले. त्यामुळे अनेक उद्योग हे ‘एनपीए’त जाण्यापासून वाचणार आहेत,” असे पेशकार यांनी सांगितले.
 
 
कोरोनाकाळात मदतीसाठी पेशकार यांना ‘उद्योग मित्र’चे प्रकल्प प्रमुख उद्योजक आनंदराव सूर्यवंशी, कार्यकारिणीतील सर्व सदस्य, राजेश पुसदकर, मकरंद वाघ, किशोर सोनवणे यांसह ‘इनोव्हा रबर’, ‘जिंदाल सॉ लि.’, ‘टीडीके ईप्कॉस’, ‘एमएसएस इंडिया’, ‘न्याश रोबोटिक्स’, ‘अ‍ॅडव्हान्स एन्साइम लि.’, ‘डेल्टा फिनोकेम’ आदी कंपन्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यादरम्यान लोकांना मानसिक आधाराची गरज होती. हेच आव्हान पेशकार यांना जाणवत होते. याकामी लोकांना मदत करत त्यांची मानसिकता वृद्धिंगत करण्याचे कार्य करत त्यांनी लोकांशी चर्चा करत त्यांना आधार दिला.
 
 
 
शहरातील डॉक्टर हे ‘ऑक्सिजन’ नाही, म्हणून हतबल होऊन जिल्हाधिकारी यांच्यासमोर उभे ठाकत होते. अशा वेळी आपला जनसंपर्क व ‘लॉजिकल थिंकिंग’ यामुळे अशा भीषण परिस्थितीत आपण लोकांना मदत करू शकलो, याचे समाधान असल्याचे पेशकार आवर्जून सांगतात. “हाच क्षण आपल्या जीवनातील महत्त्वाचा क्षण,” असे पेशकार सांगतात. ‘ऑक्सिजन’पुरवठा कार्याची प्रेरणा पेशकार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मिळाली. कोरोनाकाळात रुग्णांना नेमकी गरज कशाची आहे, याचे अचूक भान बाळगत पेशकार यांनी आपले कार्य सिद्धीस नेले. त्यांच्या प्रयत्नांतून ‘ऑक्सिजन’ची भीषण असणारी समस्या सुटण्यास मदत झाली. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.







Powered By Sangraha 9.0