न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ

19 Aug 2021 15:56:20
                                                  vidyasagar_1  H                         
 
न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ 
 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली.राजभवन येथे गुरुवारी (दि.१९) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली.शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
न्या एम एल तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये संपल्यापासून सदर पद रिक्त होते.
सुरुवातीला राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी न्या. कानडे यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली. शपथ ग्रहण सोहळ्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.दिनांक २२ जून १९५५ रोजी जन्मलेल्या न्या. कानडे यांनी सन १९७९ साली मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली.
 
 
न्या. कानडे यांची दिनांक १२ ऑक्टोबर २००१ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. दिनांक २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१५ या कालावधीत व त्यानंतर १५ जानेवारी ते २० जानेवारी २०१६ या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते.न्या. कानडे यांनी आपल्या कारकिर्दीत ३४००० प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा केला असून त्यांनी दिलेले १२०० पेक्षा अधिक निकालांचा विधी अहवालांमध्ये उल्लेख केल्या गेला आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0