मॉल, शॉपिंग सेंटर रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राज्य सरकारची नवी नियमावली
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य सरकारने सोमवार, दि. 16 ऑगस्टपासून अनेक निर्बंधांत काही अटींसह शिथिलता दिली आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत सुधारित आदेश जाहीर केले आहेत. मात्र, आता यातील जाचक अटींमुळे कर्मचार्यांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागण्याची चिन्हे आहेत. केवळ दोन डोस घेतलेल्या आणि दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या कर्मचार्यांनाच आता शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या सुधारित परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व मॉल आणि शॉपिंग सेंटर रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तथापि शॉपिंग मॉलमध्ये काम करणार्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणार्या सर्व नागरिकांचे ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण आणि दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसे लसीकरणाचे प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र असणे आवश्यक आहे, असे शासन परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
तसेच, वय वर्षे 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने प्रवेश करताना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असणारे शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र वयाच्या पुराव्यासाठी सोबत असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लसीची एक मात्रा घेतलेल्या कर्मचार्यांचे काय?
राज्य सरकारने शॉपिंग मॉलमधील व्यवस्थापन आणि कर्मचार्यांसाठी लसीच्या दोन मात्रा पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे ज्या कर्मचार्यांनी लसीची एकच मात्रा घेतली आहे किंवा जे कर्मचारी लसीच्या प्रतीक्षेत आहे, अशा कर्मचार्यांच्या नोकरीवर टाच येण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच कित्येक दिवस मॉल आणि दुकान बंद असल्याकरणाने अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्या. आता पुन्हा एकदा राज्य शासनाच्या जाचक अटींमुळे कर्मचार्यांच्या नोकरीवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्या कर्मचार्यांचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत, अशांबाबत राज्य सरकारने योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे. तसेच अशा कर्मचार्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये म्हणून आस्थापनांना सूचना करणेही गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.