केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा श्रीगणेशा

16 Aug 2021 16:28:25

kapil patil thane_1 



ठाणे:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे ठाणे जिल्हा भाजपामय बनला आहे. भारतीय जनता पक्ष ठाणे शहराच्यावतीने मंत्री कपिल पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ठाण्याच्या वेशीवरून जन आशिर्वाद यात्रेला जोरदार सुरुवात झाली. ठाण्याचे नगरसेवक भरत चव्हाण आणि संजय वाघुले यांनी ना.कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत केले असून पारंपारिक वेशभुषेतील आगरी कोळी बांधवांनी कोळी गीतांच्या ठेक्यावर नृत्य सादर करून ना. कपिल पाटील यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या. यावेळी भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांनी कपिल पाटील यांना आशिर्वाद दिला.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश केला आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार या दिग्गज मंडळीच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवार १६ ऑगस्टपासून प्रारंभ झाला.ठाणे, आनंदनगर चेकनाक्यावर कोपरीचे एकमेव भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी ना.कपिल पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.संपूर्ण पूर्वद्रुतगती महामार्गासह परिसर भाजपमय बनला आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या, संजीव नाईक, भाजपचे नेते कृपाशंकर सिंग, या कार्यक्रमाचे आयोजक भरत चव्हाण, संजय वाघुले, ओमकार चव्हाण, वृषाली वाघुले, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सोमवारी पहिल्या दिवशी जनआशिर्वाद यात्रा ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व येथून जाणार आहे. दुसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातून यात्रा फिरेल. तिसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट रोजी कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, म्हारळ, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील विविध भागातून यात्रा जाईल.चौथ्या दिवशी १९ ऑगस्ट रोजी मुरबाड, किन्हवली, शहापूर, भिवंडी शहरात यात्रा जाणार आहे. तर पाचव्या दिवशी २० ऑगस्ट रोजी भिवंडी तालुक्यात यात्रेची सांगता होईल.


मंत्रिपद देऊन मोदींनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला - कपिल पाटील


ठाणे जिल्ह्याला केंद्रात मंत्री पद दिले हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद देऊन जिल्ह्याचा वनवास संपवला आहे.मंत्री झाल्यानंतर जनतेचा आशीर्वाद घ्या कामाला सुरुवात करा.असे मोदी यांनी सांगितल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. ही अभिमानाची बाब असून हे माझे स्वागत नाही तर, मोदींच्या विचाराला सलाम आहे.मला मोदींनी विकास कामे करण्यासाठी संधी दिली, मला जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पूर्ण करणार असून याआधी भरकटलेल्या मार्गावर चालत होतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिशा दिली असून भारतीय जनता पार्टी माझे कुटूंब म्हणून मी काम करून दाखवेन.

- कपिल पाटील ( केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री)
Powered By Sangraha 9.0