पाणीबाणीमधून मुक्तता कधी?

16 Aug 2021 17:14:13

caver image_1  
 
पाणीबाणीमधून मुक्तता कधी?
 
 मुंबई : कलिना येथील कोलिवेरी व्हिलेजमधील गेले अनेक वर्षे नागरिक पाणीबाणीने त्रस्त आहेत. याठिकाणी दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. पाण्याबरोबरच या परिसरात ड्रेनेज समस्यादेखील मोठी आहे. अपुरा पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज व्यवस्थेचा उडालेला बोजवारा यामुळे कोलिवेरी व्हिलेज सध्या समस्येचे आगार बनले आहे. नगरसेवकांकडून निवडणुकीपुरताच पाणी समस्येचा मुद्दा विचारत घेतला जातो, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
 
कलिना परिसरातील कोलिवेरी व्हिलेज येथे दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याचे नियोजन करताना येथील रहिवाशांच्या नाकीनऊ येत आहे. पाण्याची समस्या घेऊन मुंबईसारख्या शहरातील या वस्तीमध्ये चक्क टँकर मागवला जात आहे. नळाला पाणी येत नाही म्हणून लोक स्वतः वर्गणी काढून पाण्याचे टँकर मागवत आहेत.
 
दर आठवड्याला, 15 दिवसांनी आपले कामधंदे सोडून लोक पाणी समस्या सुटावी म्हणून नगरसेवक आणि महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जातात. पण त्यांना नेहमीच कारणे सांगितली जातात. पाणी प्रश्न कधी सुटेल, याबद्दल कुणीही उत्तर देत नाही. पत्र, निवेदने, अर्ज, तक्रार, आंदोलन, मोर्चे काढल्यानंतरही काहीच होत नसल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन निवडणुकांच्या वेळी
देण्यात आले. पण अद्याप याबाबत काही होताना दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0