तब्बल 20 वर्षांनंतर ‘रिलायन्स’ नाशिकमध्ये साकारणार प्रकल्प

16 Aug 2021 14:38:44

 
relience_1  H x

 
 
नाशिक, दि. 16 (प्रतिनिधी) : ‘रिलायन्स इंडस्ट्री’ची उपकंपनी असलेल्या ‘रिलायन्स लाईफ सायन्सेस प्रा. लि.’ या कंपनीने दिंडोरी एमआयडीसी क्षेत्रातील तळेगाव-अक्राळे येथे व्यवसाय विस्ताराच्या भूमिकेतून कार्यारंभ केला आहे. कंपनीने ‘एमआयडीसी’कडे जागेसाठी 40 कोटी रुपयेदेखील अदा केले आहेत. लवकरच कंपनी उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या इतर बाबींना चालना दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
तब्बल 20 वर्षांनंतर नाशिकमध्ये ‘रिलायन्स’सारखा मोठा उद्योग समूह येत असून, इतरही काही उद्योग नाशिकमध्ये येऊ पाहत आहेत. याबाबतचे सूतोवाच काही दिवसांपूर्वीच उद्योगमंत्र्यांनी एका कार्यक्रमात केले होते. दरम्यान, ‘रिलायन्स लाईफ सायन्स’ या कंपनीकडून तळेगाव-अक्राळे येथील 161 एकर जागेत ‘प्लाझ्मा प्रोटिन्स’ यासह विविध औषधे व लसनिर्मिती केली जाणार आहे. त्याकरिता तब्बल 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, यातून तीन ते साडेतीन हजार इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या शिष्टमंडळाने तळेगाव-अक्राळे येथील ‘एमआयडीसी’ला भेट देऊन जागेची पाहणी केली होती. त्यानंतर ‘एमआयडीसी’कडून त्यांना नियमाप्रमाणे ‘ऑफर लेटर’ देण्यात आले होते. पुढे प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी जागेसाठी 40 कोटी रुपये ‘एमआयडीसी’कडे जमा केल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली आहे. त्यामुळे वर्षअखेर कंपनी उभारणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘रिलायन्स सायन्सेस प्रा. लि.’ ही कंपनी सध्या नवी मुंबईत 25 एकर जागेवर उभी आहे. आता नाशिकमधील तळेगाव- अक्राळे येथे तब्बल 161 एकर जागेवर कंपनीचा विस्तार होणार असून, नाशिकच्या विकासासाठी नाशिककरांसाठी ही एक सुखद बाबच म्हणावी लागेल.

‘इंडियन ऑईल कंपनी’ही नाशिकच्या वाटेवर

अक्राळे येथेच ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’नेदेखील 60 एकर जागेची मागणी केली असून, लवकरच याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीकडून याठिकाणी ‘क्रायोजेनिक इंजिन्स’ आणि मोठमोठ्या ऑक्सिजन आणि इतर प्लांटसाठी लागणार्‍या इंजिन्सचे उत्पादन घेतले जाणार आहे. यातूनदेखील मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला झळाळी मिळणार असून, इतरही काही महत्वपूर्ण प्रकल्प नाशिकच्या वाटेवर आहेत.

Powered By Sangraha 9.0