स्वतंत्र देश आत्मनिर्भर झाला, तरच सुरक्षित राहू शकतो : डॉ.मोहनजी भागवत

    दिनांक  15-Aug-2021 14:06:14
|

news 1 _1  H x

मुंबई : आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांना योग्य बनणे आवश्यक आहे. त्या योग्यतेचा बोध आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगावरून येतो. सर्वागीण समृद्धीसाठी या रंगांचा आपल्या आयुष्यात उपयोग करून आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचे आहे. देशाला आत्मनिर्भर झाला, स्वावलंबी करायचे आहे.


देश स्वावलंबी झाला तरच तो सुरक्षित राहू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. दादर (पू.) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी संचालित राजा शिवाजी विद्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद वैद्य, सरचिटणीस शैलेंद्र गाडसे, सतीश नायक आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, आपल्या आर्थिक दृष्टीचे लक्ष्य म्हणजे सगळ्यांचे सुख. त्याकरिता भौतिक कामनांची तृप्ती आणि सगळ्यांच्या सुखाचे परमलक्ष्य हे प्राप्त करण्यासाठी आपल्यातील समाधान प्राप्त करण्यासाठी बल आवश्यक आहे आणि बल अर्थ साधनातून येते. आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा. छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे.जे आपल्या देशात तयार होत नाही, जे अतिआवश्यक आहे तेच आपण निर्यात करायचे आहे. आपल्या अटींवर घ्यायचे आहे. स्वातंत्र्य तर आपल्याला मिळाले पण हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकांना योग्य बनणे आवश्यक आहे. ती योग्यता आपल्याला आपला राष्ट्रध्वज पाहून कळते. शीर्षस्थानी असलेला भगवा रंग जो त्यागाची, कर्माची, प्रकाशाच्या दिशेने नेण्याची प्रेरणा देतो. ते आपले लक्ष्य आहे. आपल्याला जगात अशी मानवता हवी आहे.मनुष्याचे जीवन 'असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय' हे परमलक्ष्याकडे घेऊन जाणाऱ्या एका यात्रेचे वर्णन आहे अशा पद्धतीने चालणारी निरंतर यात्रा आहे, आपल्याला असा समाज बनवायचा आहे, संपूर्ण जगाला असे बनवायचे आहे. त्यासाठी भारताला स्वतंत्र करायचे आहे. हे करतेवेळी आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे कि, आपला हा उद्देश जितका पवित्र, शुद्ध आहे, तितकाच त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, आपली वृत्ती तितकीच शुद्ध आणि निर्मळ असावी, शीलता असावी, त्याचे प्रतीक म्हणजे सफेद रंग आहे.हे सगळे करण्यासाठी जी शक्ती हवी, जी वैभवसंपन्नता हवी, सामर्थ्य हवे, समृद्धी हवी या सगळ्याचे परिपाक म्हणजे समग्रता. आपण श्रीसुक्त म्हणतो त्यामध्ये सगळ्यांचे वर्णन आहे. निसर्गाने बहाल केलेली साधनसामग्री, पर्यावरण, भौतिक सुख-सुविधा या सगळ्याचा जेव्हा उल्लेख होतो. आपल्या मन, शीलाच्या श्रीमंतीबरोबरच भौतिक श्रीमंती या दोन्हीच्या बळांवर मनुष्य जीवनात परमलक्ष्य प्राप्त करतो. त्या समृद्धीचा रंग म्हणजे हिरवा रंग आहे. आपण जे काही करणार आहोत त्याचे अधिष्ठान काय असणार आहे, तर ते म्हणजे आपल्या तिरंग्यामधील धर्मचक्र. सगळ्यांना आनंद देणारा, आनंदात राहणारा, चराचर सृष्टीची धारणा ज्याला आपण धर्म म्हणतो असे धर्मकेंद्रितआपले प्रयत्न असायला हवेत, असेही डॉ. भागवत यांनी यावेळी नमूद केले.


जीवनात सुखप्राप्तीसाठी माणूस जगत असतो. जेवढे सुखी तेवढा आनंद. पण भारतीय मात्र ज्या सुखाबद्दल अनुभव घेत आहेत. तो आनंद म्हणजे केवळ भौतिक सुख नाही तर सुख आपल्या अंतरात आहे, हे ते जाणतात. सुख-दुःख वृत्ती आपल्या चित्तवृत्तीत अवलंबून असते. मनाचे समाधान खूप महत्वाचे असून त्यावर सर्व काही अवलंबून असते. केवळ एक माणूस सुखी राहू शकत नाही. इतर सगळे जोपर्यंत सुखी राहू शकत नाहीत तो पर्यंत एक व्यक्ती सुखी राहू शकत नाही. आपल्यासोबत सगळ्यांना सुखी ठेवणे हा आपला धर्म आहे. सगळ्यांचे सुख ही आपली धारणा असायला हवी. जगात सुखाचे संतुलन असायला हवे. समृद्धीच्या प्राप्तीची आपली ही दृष्टी आहे. सगळ्यांची उन्नती व्हावी हा आपला धर्म आहे. संयमाने त्यासाठी चालायला हवे, असेही डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.