गूँज रही हैं हल्दी घाटी, घोडों की इन टापों से

13 Aug 2021 21:49:00

Haldi ghati_1  
 
 
मुसलमान हे कायम विजेते आणि हिंदू हे कायम पराभूत, असं चित्र मुद्दाम उभं केलं गेलं. आता आलं का लक्षात? १९७०च्या सुमारास, राजस्थान राज्याच्या काँग्रेसी सरकारच्या पर्यटन खात्याने, हल्दी घाटीत उभारलेल्या माहितीफलकावर राणा प्रताप पराभूत झाला, असं का लिहिण्यात आलं ते?
कित्येक वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘राष्ट्रीय छात्र सेना’ म्हणजेच ‘नॅशनल कॅडेट कोअर’ किंवा ‘एन.सी.सी.’च्या नौदल विभागाचं कार्यालय. सकाळचं कॉलेज, मग दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी रा. स्व. संघाची शाखा, असा व्यस्त दिनक्रम असणारा एक कॉलेज विद्यार्थी. ‘एन.सी.सी.’चा अभ्यासक्रम फक्त दर रविवारी सकाळी ७ ते १२ असा असतो. म्हणून या विद्यार्थ्याने तिथेही नाव नोंदवलं होतं. ‘एन.सी.सी.’ नौदलाच्या त्या विभागीय कार्यालयाबाहेर एक जुनाट पाटी होती. तिच्यावर इंग्रजांनी स्थापन केलेल्या ‘बॉम्बे मरीन्स’ या भारतातल्या पहिल्या नौदल सैन्य तुकडीपासून, ‘रॉयल इंडियन नेव्ही’ आणि मग स्वतंत्र भारतातील ‘इंडियन नेव्ही’च्या इतिहासातले काही टप्पे नोंदलेले होते. या कॉलेज विद्यार्थ्याने एका रविवारी ती पाटी वाचली आणि तो सरळ ‘एन.सी.सी. नेव्हल युनिट चीफ कमांडर’समोर जाऊन उभा राहिला. “सर, त्या पाटीवर लिहिलंय की, अमुक साली ‘बॉम्बे मरीन्स’ने ‘आंग्लिया-द-पायरेट’चा पराभव केला. सर, माझा या मुद्द्याला आक्षेप आहे.” चीफ कमांडर आणि त्याच्या केबिनमधल्या अन्य दोन-तीन लोकांनी टवकारून या विद्यार्थ्यांकडे पाहिलं. अशी भाषा कुणा कॅडेटकडनं ऐकायची त्यांना सवय नव्हती. “काय आक्षेप आहे तुझा?” कमांडर गुरगुरला. “सर, आंग्लिया म्हणजे कान्होजी आंग्रे. इंग्रजांनी त्यांना ‘पायरेट’ म्हणजे समुद्री चाचा म्हटलंय. पण, आता स्वतंत्र भारतात ते आमचे राष्ट्रीय हिरो आहेत. मुंबईच्या नाशिक अड्ड्याला आम्हीच तर नाव दिलंय ‘आय.एन.एस. आंग्रे’ म्हणून. तेव्हा माझी नम्र विनंती आहे की, त्या बाहेरच्या पाटीवरचा ‘आंग्लिया-द-पायरेट’ हा उल्लेख तिथून हटला पाहिजे.”
 
 
 
कमांडर ऐकतच राहिला. बहुधा त्याने त्या कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यापासून ती जुनाट पाटी कधीही पाहिलेलीच नव्हती. पण, आता हे मान्य कसं करायचं? तो युनिटचा चीफ आणि सूचना करणारा एक सामान्य कॅडेट. “बरं, बरं! बघू काय करता येतं! मला वर कळवावं लागेल,” तो जरा चढ्या आवाजातच बोलला. विद्यार्थ्याकडे त्याच्यावरही उत्तर होतंच. “सर, मीपण केंद्र सरकारच्या एका आस्थापनाचा कर्मचारी आहे. शिवाय, मी सकाळी कॉलेजला जातो. ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ तेव्हा हवं तर मी माझ्या नावासकट लेखी निवेदन देऊ शकतो,” विद्यार्थी म्हणाला.
 
 
 
महिना-दोन महिने असेच गेले आणि एक दिवस विद्यार्थी पाहतो, तर अख्खी पाटीच जागेवरून गायब झाली होती. परेड चालू असताना कमांडर त्या विद्यार्थ्याकडे बघून बारीकसं हसला आणि तिथून गेला. यालाच म्हणतात, ‘न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी!’
गेली कित्येक वर्षे राजस्थानमधल्या अनेक संघटना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आवेदनं पाठवत होत्या की, हल्दी घाटीमधली पाटी बदला. त्या पाटीवरचा मजकूर चुकीचा आहे. महाराणा प्रतापाचा अकबराने पराभव केला, असा मजकूर त्या पाटीवर आहे, तो चुकीचा आहे. ती पाटी हटवा. पण, तो योग काही जुळून येत नव्हता. आता तो सुयोग जुळून आला आहे. राजसमुंद लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार दियाकुमारी आणि त्याच परिसराच्या भाजप आमदार दीप्ती माहेश्वरी या दोघी बहाद्दर महिलांनी थेट केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनाच गाठलं. मेघवाल हे राजस्थानमधल्या बिकानेरचे खासदार. त्यामुळे त्यांना सगळं प्रकरण मुळापासून माहिती होतंच. त्यांनी तातडीने भारतीय पुरातत्त्व खात्याला म्हणजेच ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ला आदेश दिला-पाटी बदला. त्यामुळे हल्दी घाटीची लढाई हा पराभवाचा इतिहास आहे, असं जाहीर करणारी ही पाटी बदलण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
 
 
१८ जून इ.स. १५७६ या दिवशी ही प्रख्यात लढाई झाली होती. तिच्यात महाराणा प्रताप आणि मुघल या दोन्ही सैन्यांमधली खूप माणसं ठार झाली. त्यांच्या रक्ताचा पूर वाहिला. त्यामुळे या ठिकाणाला नंतर ‘रक्त तलाव’ असंही नाव पडलं. आज हे ठिकाण म्हणजेच राजस्थानी भाषेत हल्दी घाटी किंवा मराठीत हळदी घाट किंवा रक्त तलाव हे उदयपूर शहरापासून सुमारे ६२ कि.मी. अंतरावर राजसमुंद या जिल्ह्याचं ठिकाण असणार्‍या शहराजवळ आहे. भंवरसिंग रेटा या गृहस्थांनी ‘जय राजपुताना संघ’ या नावाची संस्था स्थापन केली असून, ते या पाटीबदलासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. परवाच्या १८ जून, २०२१ या दिवशी हल्दी घाटी संग्रामाला ४४५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ‘जय राजपुताना संघा’ने रक्त तलाव स्थानावर जोरदार उत्सव करून पाटी बदलाची जोरदार मागणी केली. भंवरसिंग रेटा यांचा हा जोरदार रेटा आपल्याला राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे, हे भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारबाईंना लक्षात आलं अन् मग बात दिल्लीपर्यंत पोहोचली.
 
 
यातला आणखी एक गमतीदार योगायोग म्हणजे हल्दी घाटीच्या युद्धात अकबराचा सेनापती मानसिंग, जो जयपूरचा राजा होता आणि जो महाराणा प्रतापाच्या अचूक भालाफेकीतून केवळ नशिबानेच बचावला होता. त्या राजा मानसिंगाच्याच आजच्या वंशज खासदार दियाकुमारी आहेत. राजा मानसिंग हिंदुत्वाच्या विरुद्ध लढला होता. त्याच्या कुळातली आजची महिला हिंदुत्वाचा पुरस्कार करते आहे.
 
 
भारतीय पुरातत्त्व खात्याचे स्थानिक अधीक्षक बिपिनचंद्र नेगी म्हणतात, “आता तिथे असलेली पाटी ही आमच्या खात्याची नाही. ती बहुधा १९७०च्या सुमारास राज्य पर्यटन खात्याने लावलेली असावी.” म्हणजे आता कालक्रम कसा लागतो पाहा. पंडित नेहरूंना खरं म्हणजे आपल्यानंतर इंदिरा गांधींनाच पंतप्रधान करायचं होतं. १९५६ साली ते बोलता-बोलता ही गोष्ट मौलाना आझादांकडे बोलून गेले. मौलाना हे ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या दुर्गादास यांना बोलले. दुर्गादास ते छापून मोकळे झाले. पण १९६४ साली पंडितजींच्या निधनानंतर प्रत्यक्षात लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. १९६५च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळाल्यामुळे शास्त्रीजी जनतेत लोकप्रिय झाले. पण, लवकरच त्यांचा (संशयास्पद) मृत्यू होऊन १९६६ साली इंदिराजी पंतप्रधान झाल्या. लगेच १९६७ साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या. इंदिराजींनी निवडणूक जिंकली खरी; पण चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची स्वतंत्र पार्टी आणि दीनदयाळ उपाध्याय यांचा भारतीय जनसंघ यांनी यावेळी काँग्रेसची चांगलीच दमछाक केली. शिवाय, काँग्रेस पक्षातही संघर्ष उफाळून अखेर १९६९ साली काँग्रेस पक्ष दुभंगला. यावर तोड म्हणून इंदिराजींनी कम्युनिस्ट पक्षाला जवळ केलं. त्याची किंमत म्हणून कम्युनिस्ट कार्यकर्ते शिक्षणक्षेत्रात घुसले. विद्यापीठ आणि शालेय शिक्षणक्रमात साम्यवादी इतिहास लेखकांची पुस्तकं लागली. त्यांनी बनवलेला पाठ्यक्रम शिकवला जाऊ लागला. मेकॉले शिक्षणपद्धतीचीच पुनरावृत्ती अनेक बाबतीत करण्यात आली. मुसलमान हे कायम विजेते आणि हिंदू हे कायम पराभूत, असं चित्र मुद्दाम उभं केलं गेलं. आता आलं का लक्षात? १९७०च्या सुमारास, राजस्थान राज्याच्या काँग्रेसी सरकारच्या पर्यटन खात्याने, हल्दी घाटीत उभारलेल्या माहितीफलकावर राणा प्रताप पराभूत झाला, असं का लिहिण्यात आलं ते?
 
 
 
अरावली हा भारतातला सर्वात प्राचीन पर्वत आहे. तो दिल्ली परिसरात सुरू होतो आणि हरयाणा, राजस्थान ते गुजरात असा पसरत जातो. ६७० कि.मी. लांबीची त्याची ही रांग ईशान्येकडून नैऋत्येकडे तिरकी धावलेली आहे. या रांगेने राजस्थान प्रांताचे उभे दोन भाग केलेत. पूर्वेकडचा तो राजपुताना किंवा मेवाड इथली जमीन सुपीक आहे. पश्चिमेकडचा तो मारवाड. याच प्रदेशात थर हे वाळवंट सुरू होतं. महाराणा प्रताप यांचा जन्म मेवाडमध्ये गुहिलोत वंशीय राजपुतांच्या सिसोदिया नामक घराण्यात झाला. तो इ.स. १५४० मध्ये. म्हणजे तो शिवछत्रपतींच्या पूर्वी ९० वर्षे होऊन गेला. त्याचा समकालीन मुघल बादशाह अकबर याने काबूलपासून दक्षिणेत अहमदनगरपर्यंतच मुलुख जिंकला. राजस्थानमध्येही त्याने राजा भगवानदास, राजा तोडरमल्ल, राजा पृथ्वीराज राठोड, राजा मानसिंग अशा अनेकांना नमवून आपली सरदारकी करायला भाग पाडलं. महाराणा प्रताप हा एकमेव राजा त्याच्या गोड बोलण्यालाही भुलला नाही आणि रणांगणात तर त्याने कधीच हार पत्करली नाही. अकबराने वारंवार त्याच्यावर मोहिमा काढल्या. पण, प्रताप त्याच्या हातीही लागला नाही, अगर ठारही झाला नाही. सन १५७२ ते सन १५८६ अशी तब्बल १४ वर्षे अकबराने मेवाडवर सैन्याच्या अक्षरशः लाटा सोडल्या. महाराणाने त्या तर परतवल्याच; पण क्रमाक्रमाने मुघलांनी जिंकलेले मेवाडमधले अनेक किल्ले पुन्हा जिंकून घेतले. सन १५८६ नंतर अकबरानेच थकून मेवाडचा नाद सोडला. सन १५८६ ते सन १५९७ ही ११ वर्षे महाराणाला तुलनेने शांततेची मिळाली. त्या कालखंडात त्याने सततच्या लढायांमुळे उद्ध्वस्त झालेला मेवाडचा मुलुख पुन्हा संपन्न करून सोडला. शेतीबरोबरच धर्म, विद्या, कला यांनाही उत्तेजन देऊन आपण खरोखरच प्रभू रामचंद्राच्या सूर्यवंशाचे वारसदार असे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते आहोत, हे त्याने सिद्ध केलं. सन १५९७ साली महाराणा प्रताप मरण पावला.
 
 
 
पण, मग हल्दी घाटीच्या युद्धातून महाराणा प्रताप पळून गेला. म्हणजेच तो पराभूत झाला, ही थाप मारण्याची संधी मेकॉलेपुत्र आणि मार्क्सपुत्र यांना कशी मिळाली? तर युद्धाच्या ऐन धुमाळीत राणाने आपल्या हातातला भाला हत्तीवर बसलेल्या मानसिंगावर फेकला. माहुताने विलक्षण चपळाईने हत्ती दबवला. त्यामुळे मानसिंग बचावला. पण, आता राणाच्या हातात शस्त्र नाही, असं पाहून मानसिंगाचे सैनिक राणावर तुटून पडले. अतिशय जखमी झालेल्या राणाला घेऊन त्याचा इमानी घोडा चेतक चौखूर उधळला. त्याच वेळी राणाच्या रामदास राठोड आदी मित्रांनी मुघलांना थोपवून धरलं. बस्स! केवळ एवढ्यावरून मेकॉलेपुत्र आणि मार्क्सपुत्र यांनी निष्कर्ष काढला की, राणा पराभूत झाला. यालाच म्हणतात पुरोगामी विचारवंत!
 
 
 
Powered By Sangraha 9.0