वारली चित्रशैलीतील संपूर्ण रामायण राष्ट्रपती भवनात विराजमान !; 'विहिंप'चे उपाध्यक्ष अशोकराव चौगुले यांची संकल्पना

    दिनांक  11-Aug-2021 19:26:33
|
rbb_1  H x W: 0

राष्ट्रपतींना चित्र भेट देताना डॉ. सहस्रबुद्धे, चित्रकार हरेश्वर वनगा, आयसीसीआर सदस्य विनोद पवार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : डहाणू येथील चित्रकार हरेश्वर वनगा यांनी वारली चित्रशैलीमध्ये चितारलेले संपूर्ण रामायणाचे चित्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मंगळवारी सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वारली चित्रशैलीचे कौतुक केले असून हे चित्र आता राष्ट्रपती भवनात विराजमान होणार आहे.
 
 
अयोध्येमध्ये गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी भव्य श्रीराम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव चौगुले यांनी वारली चित्रशैलीमध्ये संपूर्ण रामायण चितारले जावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर डहाणू येथील वनवासी कल्याण प्रकल्पातील माजी विद्यार्थी आणि वारली चित्रकार हरेश्वर वनगा यांनी संपूर्ण रामायण वारली चित्रशैलीत चितारण्याची जबाबदारी स्विकारली. या चित्रामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ, रामायणातील महत्वाच्या घटनांसह लंकादहन, रावण वध आणि श्रीरामचंद्रांचे अयोध्येत पुनरागमन असे सर्व प्रसंग आहेत.
 
 
वनगा यांनी त्यानंतर दोन महिने मेहनत घेऊन ६x४ या आकारात हे चित्र साकारले. त्यानंतर बुधवारी राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, परिषद सल्लालाग समितीचे सदस्य विनोद पवार आणि वारली चित्रकार हरेश्वर वनगा यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे चित्र सादर केले.
 
 

rb_1  H x W: 0  
 
 
 
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चित्राचे आणि वारली चित्रशैलीचे कौतुक केले. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी वारली चित्रशैलीचा विकास करण्यासाठी आणि कलेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले. तसेच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वारली चित्रशैलीचे कौतुक करून सन्मान केल्याची भावना चित्रकार हरेश्वर वनगा यांनी व्यक्त केली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.