निसर्गाचे सुरम्य सौंदर्य खुलविणारा श्रावण महिना आला की, सृष्टीतील सर्व जीवांच्या आनंदाला उधाण येऊ लागते. भूलोकी हजारो हातांनी मांगल्याची बरसात करणारा श्रावण सर्वांच्या मनाला इतका मोहून टाकतो की, प्रत्येकजण आपली सारी दुःखे विसरुन मनस्वी आनंदी होतो. वर्षभरातील १२ महिन्यांमध्ये श्रावण हा शिरोमणी आहे. केवळ नैसर्गिक सुंदरताच नव्हे, तर मानवी अंतरंगातील निर्मळता वृद्धिंगत करण्यासाठी साद घालणारा हा पवित्र महिना!
इतर महिन्यांमध्ये अशी चौफेर ऐश्वर्याची उधळण अनुभवता येत नाही, पण श्रावण हा मात्र सर्व बाजूंनी विकासाच्या पाऊलखुणा रुंदावणारा महिना म्हणून ओळखला जातो. एकूणच नैसर्गिक, धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रावणमास सबंध प्राणिमात्राला नवचैतन्य प्रदान करण्यास तत्पर आहे. माणूस हा संवेदनशील व सहृदयी प्राणी! सांसारिक उद्वेग, क्लेश, अडचणी व नेहमीच्या जबाबदार्यांमुळे मानवाची मने उद्विग्न झालेली असतात. अशा वेळी नैराश्याचे तिमिर नाहीसे करण्याकरिता आणि मानसिक शांतता व आत्मिक आनंदाच्या प्राप्तीकरिता तो उपाय शोधू लागतो. अशातच मग त्याला आठवण होते ती निसर्गाची! श्रावणातील निसर्गसौंदर्याचा अपूर्व ठेवा हा मानवाला त्रिविध दुःखांपासून दूर ठेवण्यास पर्वणीच ठरतो. श्रावणातील निसर्गरम्य वातावरण त्याला या सर्व चिंता व क्लेशांपासून परावृत्त करण्यास मोलाची मदत करते.
श्रावणात आपल्या सभोवतालची दृश्ये पाहा! उंच उंच पर्वतरांगा, खोल खोल दर्या, उभे डोंगर व कडेकपारींचे प्रदेश... हे सर्व कसे हिरवेगार दिसत आहेत. जिकडे पाहावे तिकडे वनराई हरित तृणांनी फुलून गेली आहे. असा कोणताच भूभाग शिल्लक नाही की जिथे विविध प्रकारच्या गवतांची दाटी नाही. धरणीमातेने जणू काही हिरवा शालूच परिधान केला आहे. तिच्या उंच-सखल भागातील नदी-नाल्यांतून खळाळणारे निर्झर आपणांस सतत सद्विचारांनी प्रवाहित होण्याची प्रेरणा देत आहेत. श्रावणातील ऊन-सावल्यांचा खेळ हा जीवनात उद्भवणार्या सुख-दुःखे, हानि-लाभ, हर्ष-विषाद या द्वंद्वांना स्थितप्रज्ञतेने व समदृष्टीने सहन करण्यास जणू काही प्रवृत्तच करीत आहेत. शेतातील डोलणारी पिके, पानाफुलांनी बहरलेल्या हिरव्यागार वृक्ष-लता! लहानसहान झुडपे... त्यातच अधूनमधून पडणार्या पावसाच्या सरी आणि पुन्हा थोड्याच वेळात पडणारे पिवळसर ऊन! क्षणार्धात सुटणारी मंद वार्याची झुळूक! अशावेळी आकाशात उमटणारे सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंगबेरंगी प्रतिबिंब! असा हा निसर्गाकडून प्राणिसमूहास मिळालेला हा सौंदर्याचा अनमोल खजिना म्हणजे विधात्याने मुक्तपणे दिलेले ऐश्वर्याचे वरदानच! श्रावणातला हा बहार कविमनाला काव्यसृजनास प्रवृत्त करू लागतो. मग अशा श्रावण कवितांचे रसास्वादन करण्यात रसिकजनदेखील तल्लीन होऊ लागतात. बालकवींच्या समृद्ध काव्यकुंचल्यातून उदयास आलेली ’श्रावण मासि... ’ ही कविता ही आजदेखील सहृदयी मानवाच्या मनात कायमस्वरूपी घर करून आहे. त्यातील प्रारंभीच्या खालील काव्यपंक्ती श्रावणातले निसर्गसौंदर्य अधिक खुलवतात
श्रावण मासि हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे
श्रावणातले हे निसर्गाचे हे विहंगम दृश्य पाहून कोणाचे मन हर्षून येणार नाही? दैनंदिन जीवनात सतावणार्या चिंता, नानाविध दुःखाचे प्रसंग आणि तोच तो कंटाळवाणा जीवनप्रवास! या सर्वांना परतून लावण्याचे सामर्थ्य आहे, ते श्रावणातल्या या आल्हाददायी निसर्गदृश्यांत! सृष्टीत घडणारा श्रावणातील हा मोहक आमूलाग्र बदल मानवी मनाला विधायक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर घेऊन जातो. हे सुंदर असे व्यापक रम्य बदल मानवी मनाच्या कपारीत दडलेल्या नैराश्याला परास्त करण्यास पुरेशी ठरतात. म्हणून व्यस्त जीवनातील वेळ काढून निसर्गदर्शन करावयास हवेच! सृष्टीचे हे विलसित झालेले रूप पाहून पशु-पक्ष्यांनादेखील मनस्वी आनंद होतो. हरीण, कोल्हे, ससे इत्यादी कसे हर्षित होऊन विचारत आहेत. पक्ष्यांचे थवेच्या थवे सस्वर गायन करीत इकडून तिकडे घिरट्या घालीत आहेत. पानांपानांवरील व गवतांवरील कीटक, सूक्ष्म जंतू अगदी प्रसन्नतेने आपल्या जीवनमार्गावरून सरसावत आहेत. पुष्पांतील मकरंद चाखणारे भ्रमर व रंगीबेरंगी फुलपाखरे आपल्या कार्यात मस्तपणे व्यस्त आहेत. राष्ट्रीय पक्षी नीलकंठी मोर हा तर कसा शांत राहणार? त्याने केलेला उंच-मधुर केकारव सर्वांच्या कानांना आकर्षित करून घेतो, तर पिसारा फुलवित त्याने केलेले चित्ताकर्षक थुई थुई नृत्य हे निश्चितच दर्शकांचा आनंद द्विगुणित करणारे बनते!
सर्व जीवांना अगदी स्वानंदे वसवून घेणारी ’वसुंधरा’ ही किती उदार आहे पाहा. याच श्रावणात ती सर्वांच्या भविष्याची मोठी काळजी वाहते. कारण, आपल्यातील बीजांना अंकुरित करून त्यांचे धान्यात, फळां-फुलांत व औषधी वनस्पतीत रूपांतरित करण्यात ती खूपच गढून गेली आहे. मानवांसह सर्व जीवांना अन्नधान्य पुरवावे, असे तिला मनोमन वाटते. म्हणूनच ती आमची अन्नदात्री जगन्माता! अशा या भूमातेची मात्र आमच्याकडून सदैव उपेक्षाच होते. भौतिक सुविधांपोटी या निसर्गसौंदर्याचा विचार न करणारा कृतघ्न माणूस या भूमातेवर सिमेंटची जंगले उभी करीत आहे. विशेष म्हणजे, सर्व बाबतीत डोळस असणारा हा माणूस श्रावणातल्या निसर्गवैभवाकडे पाहून प्रसन्न तर होतोय, पण त्यात दडलेल्या व्यापकतेकडे दुर्लक्ष करतोय. त्यालाही दृष्टीस पडत नाही की, निसर्गाचे वैभवी लेणे हे सर्वांसाठी खुले आहे. इथे सर्व प्रकारचे भेदाभेद अमंगळ. मानवाच्या मनामध्ये दाटलेली अविचारांची संकिर्णता, जातिभेदाचे किंवा उच्चनीच्चतेच्या दुर्भावनांचे साठलेले मळभ नाहीसे करण्यास श्रावणाचे हे अनोखे निसर्गदर्शन अतिशय समर्पक आहे. या महिन्यातील विलक्षण परिवर्तन मानवी मनाला सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यास खुणावत आहे. फक्त गरज आहे, ती त्यातून बोध घेण्याची!
श्रावणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, या महिन्यात धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. ’श्रु-श्रवणे’ या संस्कृत धातूपासून ‘श्रावण’ शब्दाची उत्पत्ती होते. या महिन्यातील पौर्णिमा ही श्रवण नक्षत्रांची. म्हणूनदेखील ‘श्रावण’ असे या महिन्याचे नामाभिधान. श्रवण म्हणजे ऐकणे आणि श्रावण म्हणजे ऐकविणे. थोडक्यात सांगायचे झाले, तर श्रावण हा धार्मिक व आध्यात्मिक तत्त्वज्ञान ऐकण्याचा व ऐकविण्याचा महिना! अगदी प्राचीन काळापासून श्रवण-श्रावणाची ही परंपरा व संस्कृती प्रचलित आहे. ज्ञानी, विद्वान, पंडित व आचार्यांकडून शास्त्रांचे श्रवण आणि श्रावणाची ही परंपरा पुढे ग्रंथनिर्मितीनंतर ’शिकणे व शिकविणे’ यात रूपांतरित झाली . ज्ञान-विज्ञानाचे आदिमूळ ग्रंथ म्हणजे वेद. अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे चार वेद म्हणजे वैश्विक कल्याणाचे व शाश्वत सुखाचे आगर! यांनाच ‘श्रुती’ असे ही म्हणतात. त्यांचे सारभूत ज्ञान ११ उपनिषदांत आले. पुढे त्यातील तत्त्वज्ञानपरक सूक्ष्मविचार सहा दर्शनशास्त्रात रूपांतरित झाले. या ज्ञानप्रद आर्ष ग्रंथांसह रामायण, गीता, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे पठणपाठण, श्रवण-श्रावण करण्याचा हा श्रावण महिना!
याच महिन्यात वनात तपश्चर्या करणारे ऋषी, महर्षी, तपस्वी साधुमंडळी प्रवचन, प्रबोधनासाठी गावांकडे निघतात. श्रावणात चहुकडे पाणी, गवत, चिखल, दलदल वाढल्याने ते आपल्या आश्रमी राहू शकत नाहीत. म्हणूनच काही काळ व्यतित करण्यासाठी ग्राम परिसरातील मठ, मंदिरात निवास करतात. जवळपास चार महिने राहून ते सामान्य जनांना आध्यात्मिक ज्ञान वितरित करतात. चातुर्मासाची परंपरा ही त्यातूनच उदयास आली. यादरम्यान त्या तपस्वी व ज्ञानी संतजनांकडून आध्यात्मिक व धार्मिक ज्ञानाचे श्रवण गावकर्यांकडून मोठ्या श्रद्धेने होत असे. हीच प्राचीन परंपरा थोड्याफार फरकाने सद्ययुगातही गावोगावी धार्मिक ग्रंथ पारायणे, जप-तप, उपवास यांच्या माध्यमाने सुरू आहे. शेतकरी वर्ग शेतीतील सर्व कामे संपल्याने आणि व्यापारी वर्गदेखील पावसामुळे उद्योगधंदे ठप्प असल्याने निवांत आहे. म्हणूनच तो ऋषिमुनींच्या सान्निध्यात बसून सद्ग्रंथातील ज्ञान श्रवणाचा भक्तीभावनेने आनंद घेतो. आध्यात्मिक ज्ञान श्रवण व शंकांचे निरसन करण्याबरोबरच चिंतन, मनन व निदिध्यासन पण झाले पाहिजे. म्हणूनच आपले शरीर स्वस्थ, मन शुद्ध व बुद्धी पवित्र शुद्ध व्हावे, यासाठी अल्पाहार, फलाहार, उपवास यांसारख्या संकल्पना!
आयुर्वेदशास्त्रानुसार श्रावणात चहुकडे पाऊस असल्याने बाहेरचे वातावरण कोंदट बनलेले असते. त्यामुळे सर्व लोक एकाच ठिकाणी बसून असतात. चालणे-फिरणे थांबलेले असते. शारीरिक हालचाल नसल्याने व्यायामही होत नाही. त्यामुळे अन्न पचणे कठीण! यासाठी आपल्या पचनसंस्थेला आराम मिळावा, मन ईश्वरीय ध्यानात एकाग्र व्हावे, याकरिता आहार कमी घेणे इष्ट किंवा आठवड्यातून एकदा पूर्णपणे निराहार राहणे योग्य. त्यालाच सध्याच्या रुढ भाषेत ‘उपवास’ असे म्हणतात. पण, या उपवासाचा मुख्य उद्देश हा वेगळा आहे. उपवासाचा वास्तविक अर्थ म्हणजे ईश्वराच्या सान्निध्यात राहणे. ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे वसणे, वास करणे किंवा राहणे होय. आत्मज्ञान व शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी जगन्नियंत्या, सर्वशक्तिमान, सर्वव्यापक व निराकार अशा एकाच ईश्वराच्या सान्निध्यात राहिल्यास उपासना सफल होते, ती अशा उपवासामुळे! उपवासाचा हा व्यापक अर्थ जाणून घेणे व आचरणे ही काळाची गरज आहे.
श्रावणातील विलक्षण असे निसर्गरम्य व विहंगम असे बाह्यसौंदर्य आणि धार्मिक व आध्यात्मिक वातावरण हे सर्व मानवांचे अंतरंग उजळण्यास व त्यांचे आत्मिक कल्याण साधण्यास प्रेरक ठरो. तसेच श्रेष्ठ ग्रंथांचे अध्ययन व सद्विचारांचे श्रवण-श्रावण करण्यास सर्वजण तत्पर राहोत, अशी कामना!
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य