प्रतीक्षानगरातील रहिवाशांना हक्काचे घर कधी मिळणार?

10 Aug 2021 12:44:20

mhada_1  H x W:

राजकारण्यांनी अवैधरीत्या घरे लाटली; स्थानिकांचा आरोप
 
‘म्हाडा’ भाडे घेते; मात्र संक्रमण शिबिरात पायाभूत सुविधा नाहीत

मुंबई : शहरातील प्रतीक्षानगर भागामध्ये राहणारे नागरिक मागील ४०-५०वर्षांपासून स्वत:च्या घराच्या पुनर्विकासाच्या आशेत दिवस काढत आहेत. मात्र, इतकी वर्षे उलटून गेली तरी संक्रमण शिबिरात राहणार्‍यांना आपल्या हक्काची घरे कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही कुणी देऊ शकलेले नाही. स्थानिक राजकारण्यांनी अवैधरीत्या घरे लाटली, असा आरोपही रहिवासी करत आहेत.

“या शिबिरात राहणार्‍या नागरिकांना पात्र-अपात्र ठरवत अनेक जाचक नियम लादले गेले आहेत. त्या नियमांच्या अतिरेकामुळे मात्र स्थानिक रहिवाशांची ससेहोलपट होत आहे. स्थानिकांना जी तात्पुरती घरे ‘म्हाडा‘तर्फे देण्यात आली आहेत, त्यांनादेखील त्या घरांसाठी ‘म्हाडा’तर्फे शुल्क आकारते जाते. मात्र, शुल्क आकारूनही त्या घरांमध्ये पायाभूत सुविधा मिळत नाहीत,“ अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
 
प्रतीक्षानगरच्या संक्रमण शिबिरात ३० ते ४० टक्के लोक गेले ५० वर्षे घराचा पुनर्विकास होईल आणि आपण पुन्हा आपल्या घरात जाऊ, या प्रतीक्षेत आहेत. ५० वर्षांत या लोकांच्या घराची पुनर्बांधणी झालेलीच नाही. यातील कित्येकांची घरांची परिस्थिती ‘जैसे थे‘च आहे. तर काहींच्या घराच्या जागेवर भलत्याच लोकांनी कब्जा केल्याचेही दृश्य आहे. आता आपले कायमचे घर म्हणजे संक्रमण शिबीर, असेच या लोकांना वाटत आहे. ‘म्हाडा’च्या माध्यमातून ३० ते ४०टक्के संक्रमण शिबिरातील लोकांना अपात्र घोषित करून, त्यांना ५०० रुपयांऐवजी तीन हजार रुपये भाडे लावण्यात आले आहे.
गळतीची समस्या मोठी
 
प्रतीक्षानगर भागातील संक्रमण शिबिरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे गळती. या भागातील अनेक इमारतींमधील बर्‍याच घरांमध्ये गळतीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसेच घरांमधील दरवाजेदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत.
पाण्याचा अनियमित पुरवठा

प्रतीक्षानगर भागातील इमारतींना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे दोन पंप आहेत. मात्र, त्यातील एक पंप कायम बंद आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्वाभाविकरीत्या भागातील काही इमारतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. “आमचे घर धोकादायक आहे किंवा पुनर्विकास करत आहोत, असे सांगून ‘म्हाडा’ने आमची रवानगी संक्रमण शिबिरात केली. त्याला वर्षे लोटली आहेत. आता आम्हाला आमची हक्काची घरे कधी मिळतील? घरे मिळणारच नसतील, तर किमान संक्रमण शिबिरातील पायाभूत सुविधा तरी चांगल्या द्याव्यात,“ अशी केविलवाणी विनंती संक्रमण शिबिरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.




Powered By Sangraha 9.0