वसा संस्कृतीचा, वारसा जगाचा...

    01-Aug-2021
Total Views |

WHL_1  H x W: 0

नुकताच ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत भारतातील तेलंगणचे ‘रामप्पा मंदिर’ आणि गुजरातमधील ‘धोलाविरा’ या दोन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ‘युनेस्को’च्या या वारसा स्थळनिवडीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
चीनमधील फुझौ येथे ‘ऑनलाईन’ संपन्न झालेल्या एका बैठकीत भारतातील दोन स्थळांची ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आली. ही बाब निश्चितच देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांसाठीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण ठरली आहे. परंतु, भारताच्या इतिहासालाच मुळी मिथ्य मानणार्‍या पुरोगामी आणि राजकारण्यांना हे कितपत रुचेल, याबाबत साशंकता आहेच. कारण, भारतीय परंपरा, संस्कृतीच्या दोषांवर टीका करणारी ही मंडळी भारताच्या महान इतिहासाची अशी जागतिक दखल घेतली की लगेच तोंडाला कुलूप लावून बसतात. असो. तर यावर्षी निवडली गेलेले तेलंगणचे ‘रामप्पा मंदिर’ आणि गुजरातमधील ‘धोलाविरा’ ही दोन्ही स्थळे भारताच्या देदीप्यमान इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि या दोन स्थळांच्या समावेशामुळे भारताने ‘सुपर ४०’ ‘ब्राऊन’ यादीत स्थान पटकाविले आहे.
 
 
भारतातील या ४० जागतिक वारसा स्थळांमध्ये २०१४ ते २०२१ या काळात एकूण दहा वारसा स्थळांचा समावेश केला गेला. १९८३ साली ‘युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत भारताच्या लाल किल्ल्याचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला. काँग्रेस सरकारच्या काळात जर अशा अनेक ऐतिहासिक, पौराणिक स्थळांना ‘युनेस्को’मध्ये चिकाटीने सादर केले असते, तर कदाचित आज आपला देश हा वारसा स्थळांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असता. याच अनुषंगाने आजघडीला भारताचे या यादीत नेमके स्थान काय? ‘युनेस्को’च्या या यादीत वारसा स्थळांची निवड नेमकी कशी केली जाते? ही ‘ब्राऊन यादी’ नक्की काय? या यादीत समावेश होणे का महत्त्वाचे आहे? या व अशाच अन्य संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा या लेखाच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न...
 
 
संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था (युनेस्को)ची स्थापना दि. ३ नोव्हेंबर, १९४५ साली झाली होती. परंतु, ‘जागतिक वारसा स्थळ’ निवडीच्या अटी आणि नियमांचा प्रारंभ १९७५ पासून सुरू झाला. याचे मुख्य कार्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. ‘युनेस्को’ ही ‘संयुक्त राष्ट्रा’ची एक संस्था आहे. जगभरात शिक्षणाचा प्रसार करणे, तसेच जगभरातील सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे आणि त्याद्वारे मानवी इतिहास आणि मानवी मूल्यांचे संवर्धन करणे, असा ‘युनेस्को’चा उद्देश आहे.
 
 
दरवर्षी जगभरातील काही स्थळांचा ‘युनेस्को’तर्फे ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश केला जातो. ज्या देशांची एकूण वारसा स्थळांची संख्या ही ४० ते ४९च्या दरम्यान असते, त्या देशांना ‘ब्राऊन लिस्ट’मध्ये मोजले जाते, तर ४९ ते पुढे वारसा स्थळे असलेल्या देशाची गणती ही ‘पर्पल लिस्ट’मध्ये केली जाते. उदाहरणार्थ, इटली (५८) सर्वाधिक ‘जागतिक वारसा स्थळ’ असणारे राष्ट्र आहे, तर त्याखालोखाल दुसरा क्रमांक लागतो तो चीनचा (५६).
 
 
या स्थळांची नियुक्ती कशी केली जाते?
 
 
सर्वप्रथम वारसा स्थळांमध्ये समाविष्ट होऊ शकतील, अशा जगभरातील स्थळांची एक तात्पुरती यादी तयार केली जाते. या यादीत प्रत्येक देश ज्या महत्त्वपूर्ण स्थळांना ‘वारसा स्थळ’ म्हणून घोषित करु इच्छितो, अशा सहा स्थळांची यादी ‘जागतिक वारसा समिती’कडे पाठवतो. अशीच एक यादी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडूनही समितीला पाठविली जाते. तत्पूर्वी तीन सल्लागार समितींच्या माध्यमातून त्या स्थळांचे रीतसर सर्वेक्षणही केले जाते. ‘युनेस्को’द्वारे निहीत अटी-शर्ती, निकष जर संबंधित वारसा स्थळ पूर्ण करत असेल तरच त्या स्थळाचे नाव पुढील प्रक्रियेसाठी ‘जागतिक वारसा समिती’कडे पाठविले जाते. त्यानंतर सर्व देशांच्या प्रस्तावाची मिळून तयार झालेल्या एका यादीवर २१ देशांसमोर विचारविमर्ष केला जातो. त्यातही हे २१ देश कायमस्वरूपी या समितीवर नसतात, तर दर चार वर्षांनी विविध देशांना समितीवर संधी दिली जाते. यंदा रामप्पा मंदिराला तब्बल १७ देशांनी वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सहमती दर्शविली होती, त्यात रशियाने आपल्याला मोलाची मदत केली, तर आश्चर्यकारकरीत्या येथे आपल्याला चीननेही पाठिंबा दर्शविला.
 
 
‘युनेस्को’द्वारे या वारसा स्थळांना तीन प्रकारांत विभागले जाते. १. सांस्कृतिक स्थळे २. नैसर्गिक स्थळे ३. संमिश्रित स्थळे
 
 
भारतात आता या दोन स्थळांच्या समावेशामुळे भारतातील ‘जागतिक वारसा स्थळां’ची एकूण संख्या ही ४० इतकी झाली आहे. त्यातील ३२ सांस्कृतिक स्थळे, सात नैसर्गिक स्थळे आणि एका संमिश्रित स्थळाचा समावेश आहे.
 
 
सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळात समावेश होण्यासाठी नक्की कोणत्या आहेत अटी?
 
 
१. ते स्थळ, अथवा त्या वास्तूच्या निर्मितीमध्ये सर्जनशीलता हवी, सोप्या शब्दात ‘मास्टरपीस’ हवा. २. त्या स्थळात मानवी मूल्ये झळकली पाहिजेत. ३. त्या स्थळाच्या काळात त्या स्थळाचे सांस्कृतिक महत्त्व आहे. ४. जर नामांकन केलेले स्थळ हे शहर असेल, तर त्याचे नियोजन, तेथील पाणीपुरवठ्याचे नियोजन हे सर्व त्या काळानुसार उत्तम हवे. ५. त्याची स्थापत्त्यशैली, तेथील शिलालेख, ‘लँडस्केप डिझाईन’ यांचाही विचार केला जातो. ६. मानवी संस्कृतीचा इतिहास त्या स्थळाशी संबंधित असावा. ७. त्या स्थळाच्या जमिनीचा त्याच्या आजूबाजूच्या समुद्राचा सुयोग्य वापर इत्यादी.... ८. भारताची मूल्ये, परंपरा, संस्कृती जे स्थळ, जी वास्तू, जे शहर दर्शविते, तेच ठरु शकते जागतिक वारसा स्थळ.
 
 
वरील सर्व निकषांचा विचार करून या स्थळांना ‘सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता दिली जाते. जगभरात आजघडीला अशी एकूण ८६८ ‘सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ’ आहेत आणि यावर्षी निवडलेली भारतातील वरील दोन्ही वारसा स्थळे ही ‘सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे’ आहेत.
 
 
नैसर्गिक जागतिक वारसा स्थळात समावेश होण्यासाठी नक्की कोणत्या आहेत अटी ते पाहूया.
 
 
१. अपवादात्मक अशी नैसर्गिक सुंदरता तसेच त्याचे जागतिक अथवा त्या देशासाठी असणारे भौगोलिक महत्त्व. २. पृथीच्या भौगोलिक निर्मितीला दर्शविणारा भूभाग. ३. पर्यावरणीय आणि जैविक महत्त्व. ४. तिथे उपलब्ध गोड पाण्याचा साठा. ५. त्या स्थळावर जर नामशेष होणार्‍या कोणत्याही प्रजाती असतील, अथवा काही प्रजाती फक्त त्याच भागात आढळतात, अशा काही भागांचा समावेश ‘नैसर्गिक जागतिक वारसा स्थळा’त होतो. उदारणार्थ १. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, २. पश्चिम घाट इत्यादी. जगभरात अशी एकूण २१३ नैसर्गिक स्थळे आहेत.
 
 
संमिश्रित स्थळे म्हणजे काय?
 
जगभरात अशी अनेक स्थळे आहेत, जी या दोन्ही अटींची पूर्तता करतात, त्यांचा समावेश हा दोन्ही प्रकारात होतो आणि त्यांनाच ‘संमिश्रित स्थळे’ असे म्हणतात. भारतातील ‘कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान’ हे याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे.
 
‘युनेस्को टॅन्जिबल कल्चरल हेरिटेज’
 
 
अशा वस्तू अथवा गोष्टी ज्या आपल्याला मोजता येणार नाहीत, त्याची फक्त अनुभूती घेऊ शकतो, अशा गोष्टींचा सांस्कृतिक वारसा स्थळात समावेश केला जातो. परंतु, तो ‘युनेस्को जागतिक वारसा स्थळा’च्या यादीअंतर्गत केला जात नाही, तर त्यांचा समावेश ‘युनेस्को टॅन्जिबल (अशी गोष्ट अथवा वस्तू ज्या मोजता येत नाहीत,अथवा त्यांना प्रत्यक्ष स्पर्शिले जाऊ शकत नाही अशा गोष्टी...) कल्चरल हेरिटेज’ म्हणजेच ‘युनेस्को मूर्त सांस्कृतिक वारसा’ या यादीत केला जातो. भारतातील योग, कुंभमेळा आणि अनेक नृत्यशैली इत्यादींचा समावेश या प्रकारात केला जातो. ज्या गोष्टींतून त्या त्या देशाची संस्कृती झळकते. पण, त्याचे निश्चित ठिकाण अथवा व्यक्तिपरत्वे बदलत असेल, अशा गोष्टींचा समावेश यात केला जातो.
 
 
‘जागतिक वारसा स्थळा’त एखाद्या स्थळाची नोंद होणे हे का महत्त्वाचे आहे?
 
 
१. एकदा ‘जागतिक वारसा स्थळा’त नोंद झाली की, ते स्थळ जगाच्या नकाशावर येते व त्यामुळे त्या स्थळास आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त होते. २. या स्थळाचे संवर्धन करण्यासाठी राज्य, राष्ट्र तसेच जागतिक स्थळावर प्रयत्न केले जातात. ३. त्यासाठी जगभरातून तिथे पैसे ओतला जातो. ४. तसेच ‘युनेस्को’ही निधीपुरवठा करते. ५. अशा स्थळांच्या सरंक्षणासाठी, तेथील पुढील संशोधनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जातात. ६. या वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे, हे संबंधित देशाच्या सरकारला सूचित केले जाते. ७. एकदा ‘जागतिक वारसा स्थळा’त नावनोंदणी झाली की, देशाच्या पर्यटन क्षेत्रास चालना मिळते, ‘युनेस्को’ स्वतः त्यासाठी त्याची जाहिरात करते, त्यामुळे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही एकप्रकारे वरदान ठरते. ८. देशाची प्रतिमा जगात उजळते. ९. ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांना, अभ्यासकांना तो देश महत्त्वाचा वाटू लागतो, त्यामुळे तो देश चहुबाजूंनी विकसित होण्यास सुरुवात होते.
 
 
इत्यादी...
 
 
त्यामुळे एखाद्या देशाच्या स्थळाची ‘जागतिक वारसा स्थळा’त नोंदणी होणे फार महत्त्वाचे आहे. वरील निकषांमध्ये बसणार्‍या भारतातील अशा दीडशेहून अधिक स्थळांची नावे आपण घेऊ शकतो. तरीसुद्धा याबाबतीत भारत सहाव्या क्रमांकावर असणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. कारण, १९७२ पासून २०१३ म्हणजे ४० वर्षांच्या कालावधीत फक्त ३० स्थळांचा समावेश होणे, हे आधीच्या सरकारांचे अपयश, तर मागील सात वर्षांत दहा स्थळांचा समावेश होणे, हे विद्यमान सरकारचे यशच म्हणायला हवे. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी, त्याचे महत्त्व आणि भारतीय देदीप्यमान इतिहास जगाला सांगण्यासाठी अशा अनेक स्थळांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित करणे गरजेचे आहे. जागतिक माध्यमांद्वारे जगासमोर भारताची जी मलीन प्रतिमा सादर केली गेली होती, ती बदलण्याचे काम अशा काही घटना करत असतात. त्यामुळे ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत भारताच्या ऐतिहासिक स्थळांची नोंद होणे, हे भारताच्या अर्थव्यवस्थेपासून ते आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अतिशय महत्त्वाचे आहे आणि अशा उद्दात, भव्य इतिहास असणार्‍या देशात जन्मणे ही आपल्यासाठी खरंच अभिमानास्पदच बाब म्हणावी लागेल.
 
 
- सौरभ मुळीक