पक्षाचा निर्णय मान्यच ! कोणतीही नाराजी नाही : पंकजा मुंडे

09 Jul 2021 14:15:31

pankaja munde_1 &nbs


फक्त पंकजा आणि प्रीतम हा वंजारी समाजाचा चेहरा नाही


मुंबई:
केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून ४ खासदारांची केंद्रातील नव नियुक्त मंत्रिमंडळात निवड झाली. डॉ. कराड यांना मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर, पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. "प्रीतम मुंडेंना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. केंद्रातील तसेच राज्यातील ज्यांची केंद्रीय मंत्रीपदी नवनियुक्ती झाली अशा सर्वांचे अभिनंदन !" असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अखेर सुरु असलेल्या चर्चांवर पडदा टाकला. पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेंनी याबाबत माहिती दिली.

यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं, "प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज नाही. भाजप मला संपवायचा प्रयत्न करत आहे, असं मला वाटत नाही. सामनात काय लिहिलंय ते मी वाचलं नाही. पंतप्रधान मला संपवायचा प्रयत्न करतील, इतकी मी मोठी आहे, असं मला वाटत नाही. पक्षानं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पंकजा आणि प्रीतम यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही," असे पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंकजा यांनी डॉ. भागवत कराड यांचे अभिनंदन केले. यावेळी त्या म्हणाल्या,"डॉ. भागवत कराड हे देखील गोपीनाथ मुंडेंचे हात धरूनच राजकारणात आले आहेत. डॉ. कराड हे देखील वंजारी समाजाचा चेहरा आहे. फक्त पंकजा आणि प्रीतम हा वंजारी समाज नाही. कोणीतरी वंजारी समाजाचा चेहरा म्हणून मोठं होत असेल तर त्याच्या पाठीशी मी उभं राहणार हे मुंडे साहेबांचे संस्कार आहे. पक्षाने त्याच्यावर विश्वास टाकला, पक्षानं त्यांना संधी दिली आज ते समाजची ताकद वाढवतील यासाठी शुभेच्छा देते मी." पुढे त्या म्हणतात ,"'भाजपला टीम नरेंद्र आणि टीम देवेंद्र मान्य नाहीत, भाजपसाठी राष्ट्र प्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आमच्याकडे आहे. मीपणा आमच्याकडे मान्यच नाही." असेही त्या म्हणाल्या. यावेळी पंकजा मुंडे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावून झाल्या.
Powered By Sangraha 9.0