पुणे - मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यातील नव्या खासदारांना मंत्री आणि राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. मोंदीच्या या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. यामधील अनेक मंत्री हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसमधील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “भारती पवार पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच आहेत. त्या आदिवासी असून डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना घेतलेलं दिसतंय. कपिल पाटील हे आग्री समाजाचे आहेत. तेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. आम्हीच त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले होतं. त्यांना संधी मिळाली. नारायण राणे कोकणातील नेते आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. ते पूर्वी काँग्रेसचे नेते होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांनाही संधी देण्यात आली. त्यानंतर डॉ. भागवत कराड त्यांना संधी दिली. तेही ओबीसीच आहेत,” असं अजित पवार यांनी म्हटलंय
आम्ही लुडबुड करु शकत नाही !
“जसं राज्याच्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, तसाच देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अधिकार आहे. मोदींनी कुणाला घ्यावं, कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याचं कारण नाही", असे पवार म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघूनच हे सर्व लोकं निवडून आलेत. भाजपचे जे खासदार निवडून आलेत ते मोदी पंतप्रधान होणार म्हणून देशातील जनतेने त्यांना निवडून दिले,” असंही त्यांनी नमूद केलं.