राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका स्थगित

09 Jul 2021 19:49:26

jilhaparishd_1  


मुंबई, दि.९ :
कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेत राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी विरोधी पक्ष भाजप तसेच सत्ताधारी पक्षातील ओबीसी मंत्र्यांकडूनदेखील वारंवार होत होती. भाजपने यासंदर्भात २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनही केले होते. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षानेही ओबीसी आरक्षण कायम रहावे, अशी आग्रही भूमिका घेत ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. यानंतर वाढता दबाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने हीच भूमिका घेत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे करण्याचा निर्णयही घेतला. या आशयाचे एक पत्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात येईल,अशी घोषणाही सरकारने पावसाळी अधिवेशनात केली होती.
Powered By Sangraha 9.0