नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बनणार्या ५२ वर्षीय प्रतिमा भौमिक या त्रिपुराच्या पहिल्या रहिवासी आहेत. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी त्या एक आहेत. विज्ञान पदवीधर असलेल्या भौमिक यांनी १९९१ मध्ये पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी राज्यात संघटनात्मक पदे भूषवली आहेत. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सहभागी झाल्यापासून शून्यातून सुरू झालेला प्रवास आज केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचला आहे.
१९९८ आणि २०१८ मध्ये त्रिपुराच्या प्रदीर्घ कार्यकाळातील मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्या त्रिपुरा येथून खासदार बनल्या. एका शिक्षिकेची मुलगी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचू शकते हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. त्यांचे मूळ गाव सोनमूरा येथील बारानारायण खेड्यात आहे. त्यांना लहानपणापासून खो-खो आणि कबड्डीची आवड आहे.