येवोत चहू दिशांनी सद्विचार!

    07-Jul-2021
Total Views |

thoughts_1  H x
 
विचारांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, एक चांगला विचारांमुळे विश्वाचे कल्याण साधू शकते, तर वाईट विचार हे विश्वाचा संहार करू शकतात. म्हणूनच येणार्‍या विचारांमध्ये मांगल्य असावे, व्यापक कल्याणाचा दृष्टिकोन हवा! प्राणिमात्रांचे हित साधणारे हिंसक, द्वेषमूलक, फुटीर, क्लेशकारक व अधार्मिक असे अनिष्ट विचार प्राणिमात्रासह समस्त मानव समूहाला दुःखाच्या खाईत लोटणारे ठरतात. म्हणूनच मंत्रात भद्र विचारांची कामना केली आहे.
 
 
आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वतो।
अदब्धासो अपरितास उद्भिद:॥
देवा नो यथा सद्मिद् वृधे।
असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे॥
(ऋग्वेद-१/८९/१, यजुर्वेद-२५/१४)
 
 
अन्वयार्थ
 
 
 
हे परमेश्वरा, (न:) आम्हा सर्वांमध्ये (अदब्धास:) कधीही नष्ट न होणारे, न दबणारे (अपरितास:) इतरांकडून न ग्रासलेले व (उद्भिद:) सर्व प्रश्नांना भेदणारे, समस्यांची उकल करणारे असे (भद्रा:) कल्याणकारक (क्रतव:) शुभ संकल्प, सद्विचार, सत्कर्म (विश्वतः) जगाच्या चहुबाजूंनी (आ यन्तु) येवोत. (यथा ) जेणेकरून (देवा:) सर्व दिव्यशक्ती, सज्जन महापुरुष (न:) आमच्यासाठी (सदमिद्) सदैव (वृधे) सर्व प्रकारची वृद्धी, उन्नती करण्यासाठी तत्पर (असन्) राहोत. तसेच ते सर्वजण (दिवे दिवे ) दररोज (अप्रायुव:) आळस व प्रमाण न करता (नः) आम्हा सर्वांचे (रक्षितार: च) रक्षक (असन्) ठरोत.
 
विवेचन
 
मानव आणि पशू यांच्यामध्ये अंतर हेच की, विचार करण्याची क्षमता फक्त मानवात आहे. ती पशूंमध्ये मात्र दृष्टीस पडत नाही. पशूंमध्ये विचारशक्ती असली, तरी त्यांना अभिव्यक्त करता येत नाही. म्हणूनच मनुष्यांचे वैशिष्ट्य हे की, तो विचारशील प्राणी आहे. कोणतेही काम असो, ते करण्याअगोदर तो बुद्धी व मनाने विचार करतो. मग तो साक्षर असो की निरक्षक, यासाठीच तर विचारांची फार गरज भासते. इतकेच काय तर माणूस जगतो, तो विचारांवरच! विचारच नसतील तर माणसाची कृती थांबते. तो स्तब्ध होतो. कर्महीन बनतो. विचार चांगले असोत की वाईट! त्यांच्यावरच त्याची गतिमानता अवलंबून असते. चांगले विचार आले तर त्याच्या जीवनाची दिशा उत्तम बनते. याउलट वाईट विचार आले, तर तो दुर्गतीच्या मार्गावर जाऊ लागतो. म्हणूनच विचार हे कोणतेही व कशाही प्रकारचे असता नयेत, तर ते नेहमीच पवित्र व शुद्ध असावेत.
 
सदरील मंत्रात मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी पवित्र व कल्याणकारी विचार चहुकडून मिळत राहोत, हा मोलाचा संदेश व्यक्त झाला आहे. पहिले चरण हाच तर संकेत करतोय- आ नो भद्रा: क्रतवो यन्तु।
 
‘क्रतु’ या शब्दाचे अनेक अर्थ होतात. ‘निरुक्त’ ग्रंथात कर्म किंवा प्रज्ञा (संकल्प) असे अर्थ प्रतिपादित केले आहेत, तर यज्ञ हादेखील ‘क्रतु’ शब्दाचा अर्थ होतो. एकूणच पवित्र विचार, शुभ संकल्प किंवा सत्कर्म यज्ञ इत्यादी अर्थामुळे या शब्दाची व्याप्ती वाढलेली आहे. माणसाचे मन हे चंचल आहे. त्यात संकल्प विकल्प करणारी बुद्धी ही मनाला विचारप्रवण बनवते आणि मग मन हे इंद्रियांना योग्य व अयोग्य दिशेकडे घेऊन जाते. यासाठीच यजुर्वेदात म्हटले आहे- तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु। माझे मन सदैव शुभ व पवित्र विचारांनी परिपूर्ण असू दे.
 
 
मनात काहीना काही विचार येतच असतात. ते कधीही स्थिर नसते. एकांतात असो की गर्दीत असो! कोणत्याही स्थितीत असला, तरी मानवी मनात संकल्प व विकल्पांचा खेळ चालूच असतो. विशेष म्हणजे, बाह्य प्रवृत्तींमुळे मनाचा ओढा हा वाईटाकडेच अधिक असतो. यामुळे कर्मेदेखील वाईटच बनतात. क्षणभराचाही विलंब न लावता विचारांची परिणती कर्मात होते. त्यामुळेच ’भद्र’ विचारांची गरज भासते. ज्याप्रमाणे हवा दोन्ही बाजूंनी येत राहते, त्याचप्रमाणे विचारांचा प्रवाहदेखील सर्वच दिशांतून वाहत असतो. विचार चहुबाजूंनी का येईनात? पण, त्यांची गती उत्तम असावयास हवी! सर्व दिशांतून मिळणार्‍या विचारांचा आशय हा व्यक्ती, समाज, राष्ट्र व एकूणच विश्वाच्या कल्याणासाठी असावा. कारण, विचारांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, एक चांगला विचारांमुळे विश्वाचे कल्याण साधू शकते, तर वाईट विचार हे विश्वाचा संहार करू शकतात. म्हणूनच येणार्‍या विचारांमध्ये मांगल्य असावे, व्यापक कल्याणाचा दृष्टिकोन हवा! प्राणिमात्रांचे हित साधणारे हिंसक, द्वेषमूलक, फुटीर, क्लेशकारक व अधार्मिक असे अनिष्ट विचार प्राणिमात्रासह समस्त मानव समूहाला दुःखाच्या खाईत लोटणारे ठरतात. म्हणूनच मंत्रात भद्र विचारांची कामना केली आहे.
 
 
सर्व दिशांतून येणारे विचार हे ’अदब्ध’ म्हणजेच इतरांकडून कदापिही दाबले जाणारे असता कामा नयेत. आपल्या विचारांमध्ये एवढी शक्ती असावी की, त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. अनिष्ट प्रवृत्तींचे लोक संख्येने खूप असतात, तर इष्ट प्रवृत्तींचे लोक मात्र फार कमी असतात. म्हणूनच वाईट लोक हे चांगल्या लोकांच्या शुभ संकल्पांना रोखण्याचे व तिथेच दाबण्याचे काम करतात. म्हणून विचारांमध्ये एवढे सामर्थ्य असायला हवे की, त्यांना कोणीही रोखता नये. त्याचबरोबर आपले विचार हे ’अपरितास:’ म्हणजेच ते स्थिर व एकाग्र असले पाहिजेत. इतरांच्या अविचारांनी ग्रासलेले असता नयेत. स्वतंत्र, सत्याधारित, नीतियुक्त व प्रबल विचार असले की, ते प्रकट करणार्‍या वक्त्यांमध्येदेखील सामर्थ्य देते. आपल्या विचारशक्तींना इतरांच्या अयोग्य विचारांचा आधार असता नये. यामुळे आपल्या अभिव्यक्ती व एकूणच व्यक्तिमत्त्वाला तडा जातो. विचारात स्थैर्य राहत नाही. म्हणूनच विचार व संकल्पांमध्ये मोठे सामर्थ्य असावे. तसेच ते ’उद्भिद:’ असले पाहिजेत. जगातील कोणत्याही समस्या व अडचणी असोत, त्यांची सोडवणूक करण्याकरिता ते उपयुक्त ठरावेत. समाजात निरनिराळ्या गंभीर व जटील समस्या उद्भवत असतात. पर्वतासारखे प्रश्न उभे राहतात, त्यावेळी त्यांना भेटण्याकरिता विचार देखील तितकेच प्रबळ असावे असावेत म्हणून विचारांची उंची व शक्तीदेखील तितकीच बलशाली असावी.
 
 
ज्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ विचार विद्यमान असतात, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. समाजातील सज्जनांचा व सृष्टीतील दिव्य तत्त्वांचा त्यांना नेहमी पाठिंबा असतो. ज्ञानी व विचारवंत मंडळी अशा सद्विचारी लोकांच्या मदतीला धावून येतात. जेव्हा जेव्हा भल्या चांगल्या लोकांना अडचणी आल्या, तेव्हा सत्पुरुषांचे त्यांना मार्गदर्शन मिळत राहिले. त्यांच्या शंकांचे निरसन होत गेले. त्यांच्याकडून त्यांना सतत आशीर्वादांची शक्ती मिळत राहिली. म्हणूनच ते प्रगतीच्या मार्गावर आरूढ झाले. कितीही संकटे आली, तरी दिव्य सत्पुरुषांच्या शुभकामना त्यांचे जीवन घडविण्यास कारणीभूत ठरल्या. म्हणूनच वेदमंत्र म्हणतो-
 
 
देवा नो यथा सदमिद् वृधे असन्।
 
 
जगातील सर्व दिव्यशक्ती व दिव्य लोक आम्हा सद्विचारी लोकांना प्रगतीसाठी नेहमीच प्रेरणा देत राहोत, असे सज्जन हे खरोखरच ’अप्रायुव:’ म्हणजे आळस व प्रमादांपासून दूर असतात. सदैव कार्यदक्ष राहणे हा त्यांचा स्वभाव असतो. यासाठी शेवटी म्हटले आहे- देवा: प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे।
 
 
ऋषिमुनी, संत, सत्पुरुष हे सर्व आम्हा सर्वांचे आत्मबळ वाढवत व आमचे मार्गदर्शन करीत राहिल्यामुळे सर्वांना उत्तम कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा मिळेल. त्यांच्या सुविचारी व दिशादर्शक सत्प्रेरणेमुळे आमचा विविध संकटापासून बचाव होत राहील. त्याचबरोबर येणार्‍या संकटांवर मात करण्यासाठी आमच्यात सामर्थ्य निर्माण होईल. सर्वांच्या हृदयात नवचैतन्याचा संचार होईल. कोणताही दिवस असो की, कोणतीही वेळ ती आम्हासाठी फलदायी ठरेल.
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य