मनपा रुग्णालये : एक स्वप्न

07 Jul 2021 20:49:56

bmc_1  H x W: 0
 
 
 
एक्सरे, सोनोग्राफी दोन्ही १०० रुपयांत करून मिळतात. ज्या शस्त्रक्रियेचे तुम्हाला बाहेर लाख-दीड लाख सांगितलेले असतात, ती शस्त्रक्रिया तुम्हाला दहा हजारांपेक्षाही कमी रुपयांत खात्रीने करून मिळेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाचे व्यवस्थापन आहे. पण, तरीही मुंबईत ‘प्रायव्हेट लॅब’, खासगी इस्पितळे रुग्णांना उपचार देऊन खोर्‍याने पैसे ओढत आहेत. याचे उत्तर सर्वसामान्य मुंबईकरांना विचारले तर ते म्हणतात की, “उपचार घेत असताना इथे रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल, असे वर्तन केले जाते. अरे-तुरेने चढ्या आवाजात बोलणे, अक्कल काढणे, कधीच सरळ उत्तर न देणे, याबाबत तर या इस्पितळामधील कर्मचार्‍यांचा हात कुणीच धरणार नाही. अपवादही आहेतच. बरं काय बोलावं, तर त्यांच्या कर्मचारी संघटना आहेतच. या सर्वावर कडी म्हणजे, इथे प्रत्येक वॉर्डात असलेले नवशिके डॉक्टर. बहुतेकांना हिंदी आणि इंग्रजीशिवाय एकही भाषा अवगत नाही. ते काय बोलतात ते रुग्णांना कळत नाही आणि रुग्ण काय बोलतात ते यांना कळत नाही. इथले नर्स, वॉर्डबॉय, आयाबाया अगदी सफाई कामगारही डॉक्टरच्या अविर्भावात वावरतात. प्रत्येक वॉर्ड हे जणू त्यांचे साम्राज्य आणि तिथे उपचार घेणारे गरीब गरजू, पिचलेले रुग्ण त्यांचे राज्य.” तसे पाहायला गेले, तर या इस्पितळामध्ये तक्रार निवारणाचेही कक्ष असतात. डिन वगैरेही आहेत. पण, मांजराच्या गळ्यात उंदराने घंटा बांधावी, असे हे तक्रार निवारण. या इस्पितळामध्येही अनेक राजकीय गटतट आहेत. त्यामुळे नेतेमंडळींच्या शब्दांना चलती आहे. ज्यांची ओळख नाही, त्यांना कोर्टाप्रमाणे इथेही शस्त्रक्रियेची तारीख पे तारीख आहे. खर्‍या अर्थाने या रुग्णालयात रुग्णांना आरोग्यसेवा मिळवून द्यायची असेल तर रुग्णांना माणूस म्हणून संवेदनशीलतेने वागणूक इथे मिळायला हवी. आपली सेवा करणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना वेतनभत्ते सुविधा आणि तितकीच प्रतिष्ठा मिळते, त्यामुळे आपण इथे लाचार नाही तर या रुग्णालयाची जान आहोत हे रुग्णांना वाटायला हवे. पण, हे स्वप्नच राहील वाटते.
 
 

रुग्ण भिकारी नव्हेत!

 
 
मुंबईमधील गरीब रुग्णांचे काय होते? ते कुठे उपचार घेतात? यावर उत्तर असते की, “कुठे उपचार घेतात म्हणजे? मुंबई महानगरपालिकेची ही मोठी मोठी रुग्णालये आहेत.” मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. अर्थात, रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर, डॉक्टर, नर्स आणि सर्वच कर्मचार्‍यांवर प्रचंड ताण पडला आहे. पण, अस्सल मुंबईकरांना ठाऊक आहे की, कोरोनाच्या भीतीने लोक सध्या रुग्णालयात भरती होण्याचे टाळत असल्याने पूर्वीपेक्षा कमी गर्दी या रुग्णालयांमध्ये आहे. रुग्णालयामध्ये काय बदलले आहे? छे! काहीच नाही. जैसे थे!
 
 
शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या रुग्णांची कोरोना चाचणी केली जाते. पण, त्यानंतर लगेचच त्याची शस्त्रक्रिया होते का? नाही. इथे रुग्ण अणि त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांना सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाते का? मुळात या इस्पितळात येणारे कितीतरी रुग्ण गरीबच असतात. मास्क लावणे हीसुद्धा त्यांच्यासाठी चैन आहे. या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना केवळ रुग्णालयात तरी मास्क उपलब्ध केले जातील अशी व्यवस्था आहे का? आता कुणी म्हणेल की मग आता मास्क आणि सॅनिटायझरही रुग्णालय पर्यायाने महानगरपालिकेने द्यावेत का? तर यावर इतकेच म्हणणे आहे की, महानगरपालिका दावा करते की, आमची रुग्णालये मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक व्यवस्थाही असेल. पण, इस्पितळात किती रुग्ण दररोज येतात आणि किती गंभीर रुग्णांना प्रवेश दिला जातो, किती रुग्णांना वेळेत सर्व उपचार होतो? किती रुग्णांवर शस्त्रक्रिया होते? किती रुग्ण बरे होतात आणि किती रुग्ण देवाघरी जातात, याचेही ‘ऑडिट’ पब्लिक डिमांडने झालेच पाहिजे. इथे डॉक्टर म्हणजे देव आहे, हे मान्यच आहे. पण, महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणारे काही भिकारी किंवा बेइज्जत असलेले लोक नसतात. ज्यांना कुणाला आपल्या मोठेपणाचा किंवा पदाबिदाचा गर्व असेल त्यांनी आपली ओळख न देता, या इस्पितळामध्ये उपचार घ्यावेत म्हणजे ‘भीक नको; पण कुत्रा आवर’ म्हणजे काय, हे अनुभवायला मिळेल.
Powered By Sangraha 9.0