यशस्वितेचा ‘अनामिक’ वसा

06 Jul 2021 22:15:51

Anamika Yadav_1 &nbs
 
 
 
जातीपातीपलीकडे जाऊन शाश्वत मानवी मूल्य जपत स्वत:चे आयुष्य घडवत, समाजाला प्रेरणा देणार्‍या अनामिका सोनवणे-यादव यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा...
 
 
‘प्रीमियर बायोमेड सर्व्हिस प्रा.लि.’च्या संचालिका आणि मुलुंड येथील एका प्रशस्त सोसायटीच्या अध्यक्षा असलेल्या अनामिका सोनवणे-यादव. इंजिनिअर असलेल्या आणि त्यासोबतच साहित्यिक संवेदनशीलता जपणार्‍या अनामिका. ‘डायलिसीस’ मशीनसंदर्भात त्यांची कंपनी काम करते. हे क्षेत्र तसे पुरुषी वर्चस्वाचे. पण, या क्षेत्रात अत्यंत यशस्वीपणे पाय रोवणार्‍या अनामिका. संस्कृती आणि संस्काराचा वारसा जपणार्‍या अनामिका यांनी काही वर्षांपूर्वी स्वत:च्या जीवनावर ‘डाऊन द मेमरी लेन’ नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. कोणताही मोठा वरदहस्त किंवा कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, केवळ आणि केवळ स्वत:च्या मताशी ठाम राहत अनामिका यांनी उद्योगविश्वात यश संपादित केले. अर्थात, त्यांचे पती सुरेश यादव यांचाही उद्योगव्यवसायात मोठा सहभाग आहेच.
 
 
 
अनामिका यांचे वडील अर्जुन सोनवणे हे मूळचे जळगावचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आणि त्यांच्या विचारांनुसार आयुष्यभर चालण्याचा वसा उचलणारे. तथागत गौतम बुद्धांच्या खर्‍या करुणा आणि प्रज्ञा, शील, शांतीचा वारसा हा सोनवणे कुटुंबात होता. ते कामानिमित्त मुंबईत आले. त्यांच्या पत्नी अस्मिता. अर्जुन आणि अस्मिता यांना चार अपत्ये. त्यापैकी सर्वात मोठ्या अनामिका. सोनवणे दाम्पत्याने मुलगा-मुलगी असा भेद न करता अपत्यांना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध करून दिल्या. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च उचलता यावा म्हणून अर्जुन तीन-तीन नोकर्‍या करायचे. दहावीला असताना अनामिका यांनी खुल्या प्रवर्गात प्रवेश घ्यायचे ठरवले. पण, एका गुणाने अनामिका यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश बाद झाला आणि त्यांना आरक्षित गटातून महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अनामिका म्हणतात की, “इतक्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला ही आनंदाची बाब होती. मात्र, बाबांच्या चेहर्‍यावर आनंद नव्हता आणि माझ्याही. कारण, आपल्याला सुविधा आणि संधी असूनही मी खर्‍या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क मारला, असे आम्हाला वाटले.” त्या क्षणापासून अनामिका यांनी ठरवले की, आपली गुणवत्ता इतकी वाढवायची की, आपल्याला खर्‍या शोषित-वंचित बांधवांना कोणत्या न कोणत्या स्वरूपात सहकार्य करता येईल. पुढे अनामिका यांना खुल्या प्रवर्गातून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. मात्र, त्याचवेळी अर्जुन यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. आजारपण आणि कामधाम बंद. अशा काळात इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायलाही पैसे नव्हते. त्यावेळी अनामिका यांनी ठरवले की, घरच्या अशा परिस्थितीत नोकरी करावी, शिक्षण सोडावे. पण, अशा काळात अस्मिता पुढे आल्या. हातातल्या सोन्याच्या बांगड्या त्यांनी मोडल्या. अनामिका यांचा इंजिनिअरिंगचा प्रवेश घेतला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “काहीही झाले तरी शिक्षण पूर्ण करायचेच. बाबासाहेबांनी त्यावेळी बायकांना सांगितले होते की, एक भाकर कमी खा. पण, लेकरांना शिकवा.”
 
 
 
 
इंजिनिअरिंग झाल्यानंतर अनामिका यांनी दोन-तीन ठिकाणी काम केले. पण, सर्वसाधारणपणे ८० टक्के महिलांना जो त्रास सहन करावा लागतो, तो त्यांनाही सहन करावाच लागला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते ना, मग पुरुषांसारखे रात्री-बेरात्री काम सांगणे, मुद्दाम कोंडीत पकडणे, महिला आहे हिला काय कळते, असे समजून वागणे. इतकेच काय, तेव्हा अनामिका अंधेरीला ऑफिसमध्ये काम करत होत्या. त्यांच्या बॉसने त्यांना अचानक सांगितले की, भोपाळला जाण्यासाठी ट्रेन आहे आणि अनामिका यांना त्या ट्रेनने भोपाळला जाऊन कंपनीचे काम करायचे आहे. मात्र, पाऊण तास झाला, एक तास झाला. बॉस अनामिका यांना ऑफिसमध्ये सूचना देत राहिले. त्या सूचना बिनकामाच्या होत्या, हे विशेष. शेवटी नेसत्या कपड्यानिशी अनामिका ‘सीएसएमटी’ला गेल्या आणि ट्रेन चुकली. ट्रेन चुकली याचे खापरही अनामिका यांच्यावर फोडले गेले. यावर बाकीच्या सोबत्यांचे म्हणणे होते, ‘बॉस इज ऑलवेज राईट.’ हे सगळे अनुभवून अनामिका यांना वाटले की, आपण दुसर्‍यांसाठी काम करतो. स्वतःची कल्पना, कौशल्य याचा उपयोग करता येत नाही. मग त्यांनी सरळ नोकरीचा राजीनामा दिला. अक्षरशः शून्य भांडवलात केवळ आपल्या संपर्क आणि संवादातून त्यांनी उद्योग सुरू केला. आज त्यांच्या हाताखाली सात इंजिनिअर आणि कर्मचारी आहेत. “बॉस असो की आणखी कुणी, माणुसकी नसेल तर सगळे शून्य!” असे अनामिका यांचे म्हणणे आहे. असो. महाराष्ट्रातील दुर्गम खेडेगावात ‘डायलिसीस’ची सेवा उपलब्ध नाही. रुग्णांना सोबत एका माणसाला घेऊन कधी चालत, तर कधी खर्च करत शहरगावात यावे लागते. आठवड्यातून तीनदा त्याला हे करावे लागते. यामध्ये पैशापरी पैसे जातात आणि रुग्णाचा जीवही. त्यामुळे दुर्गम भागात ‘डायलिसीस’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनामिका या प्रयत्नशील आहेत.
 
 
 
बाबासाहेबांची अनुयायी अनामिका सोनवणे आणि उत्तर प्रदेशमध्ये गाव असणारे सुरेश यादव हे दोघेही आज कौटुंबिक उद्योग व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. घरदार, उद्योग-व्यवसाय, समाजकारण आणि साहित्यसेवेत प्रचंड समन्वय साधत स्वतःची ओळख निर्माण करणार्‍या अनामिका सोनवणे-यादव सारख्या महिला याच समाजाचे मानबिंदू असतात हे नक्की!
 
 
 
Powered By Sangraha 9.0