फसलं नाही म्हणजे मिळवलं!

05 Jul 2021 23:39:12

ipl 2022_1  H x
 
‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) ही क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाते. कोट्यवधींची उलाढाल, आठ संघ, जवळपास ६० सामने आणि तब्बल दोन महिन्यांपर्यंत चालणार्‍या या ‘आयपीएल’ स्पर्धेवर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या नजरा असतात. आगामी वर्षात म्हणजेच २०२२ साली ‘आयपीएल’ स्पर्धेची व्याप्ती आणखीन वाढणार असल्याची चर्चा आहे. कारण, या स्पर्धेत आणखीन दोन संघांचा समावेश करण्यासाठी ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ (बीसीसीआय)ला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या स्पर्धेत एकूण दहा संघ खेळताना दिसणार असून सामन्यांची संख्या, खेळाडू आणि स्पर्धेच्या कालावधीतही वाढ होणार, हे मात्र निश्चित. स्पर्धेचा कालावधी वाढणार म्हणजे हे मनोरंजन वाढणार, हे चांगलेच आहे. मात्र, दहा संघ खेळविण्याचा प्रयोग यशस्वी झाला म्हणजे मिळवले. कारण, दहा संघांसह स्पर्धा भरविण्याचा हा काही ‘बीसीसीआय’चा पहिला प्रयोग नाही. याआधीही २०१० साली ‘आयपीएल’ने दहा संघ खेळविण्याचा प्रयत्न केला होता. ‘कोची टस्कर्स केरळ’ आणि ‘पुणे वॉरिअर्स’ असे दोन्ही संघ २०१० साली ‘आयपीएल’मध्ये खेळविण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांतच या दोन्ही संघांनी ‘आयपीएल’मधून काढता पाय घेतला. ‘आयपीएल’मध्ये २०१३ साली ‘स्पॉट फिक्सिंग’चे प्रकरण बाहेर आल्यानंतर ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’ या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. यानंतर या दोन संघांऐवजी ‘गुजरात लायन्स’ आणि ‘राईझिंग पुणे सुपर जाईंट्स’ या दोन्ही संघांचा समावेश या दोन वर्षांसाठी करण्यात आला होता. हे दोन्ही संघ नंतर खेळू शकले नाहीत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘आयपीएल’मध्ये दहा संघांचा समावेश करण्याबाबत ‘बीसीसीआय’ परवानगी देण्यासाठी अनुकूल असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. ‘बीसीसीआय’च्या या प्रयोगाचे स्वागतच. मात्र, गेल्या काही प्रयोगांप्रमाणे हे प्रयोग फसले नाही म्हणजे मिळवले, अशी आशा तमाम क्रिकेटप्रेमींकडून करण्यात येत आहे.
 
 


२०२२मध्येही मेजवानी!

 
 
‘आयपीएल’मध्ये संघ बाद झाल्यानंतर अनेक खेळाडूंवरही याचा परिणाम होतो. सर्वच खेळाडूंना इतर संघांमध्ये संधी मिळते, असे नाही. पहिल्या फळीतील खेळाडूंना इतर संघांमध्ये संधी मिळते. मात्र, काही खेळाडू लिलावामध्ये विकलेच जात नाहीत. इतर संघांमध्ये संधी मिळण्यासाठी या खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वी अनेक खेळाडू लिलावामध्ये विकले गेल्यानंतरही प्रत्यक्ष संघामध्ये संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असतात. अनेक देशांच्या आजी-माजी खेळांडूची सध्या ‘आयपीएल’बाबत हीच कुरबुरी सुरू आहे. विविध देशांच्या बोर्डाकडून ‘आयपीएल’मध्ये आपल्या खेळाडूंसोबत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी आहेत. खेळाडू लिलावात कमी किमतीत विकले गेल्यास किंवा या खेळाडूंना न मिळाल्यानंतर ‘आयपीएल’मध्ये संघ वाढविण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागते. याच पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ पुन्हा एकदा ‘आयपीएल’च्या आगामी सत्रासाठी आणखी दोन संघांना परवानगी देण्याच्या तयारीत आहे. काही क्रिकेट समीक्षकांच्या म्हणण्यानुसार हे योग्यही आहे. आठऐवजी दहा संघांना खेळविल्यास निश्चितच अनेक खेळाडूंना संधी मिळणार आहे. केवळ खेळाडूच नव्हे, तर यामुळे ‘बीसीसीआय’लादेखील मोठा आर्थिक लाभ मिळणार असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे. कारण, दोन नव्या फे्ंरचाईजींच्या समावेशामुळे सामन्यांची संख्या वाढणार असून ‘आयपीएल’चा पसाराही वाढणार आहे. अदानी आणि गोयंका यांसारखे समूह नव्या संघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. पुढील महिन्यात नव्या संघांसाठी ‘बीसीसीआय’ने निविदा मागविल्यास या दोन्ही समूहांकडून निविदा भरली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अदानी समूहाकडून अहमदाबाद तर गोयंका समूहाकडून लखनऊ संघाचा विचार सुरू असल्याचे समजते. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलावही भरविण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये दहा संघ दिसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहा संघांमुळे ‘आयपीएल’ची स्पर्धाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्याऐवजी मार्च महिन्याच्या अखेरीस या स्पर्धेस सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२२ साली जगभरातील तमाम क्रिकेट रसिकांना क्रिकेटची मेजवानी मिळणार, यात काही शंकाच नाही.
 
- रामचंद्र नाईक
 
Powered By Sangraha 9.0