रा. स्व. संघाची शतकपूर्तीकडे वाटचाल होत असताना एखाद्या हिंदूनिष्ठ, संघनिष्ठ परिवाराने सुरू केलेल्या दुकानाची शंभरी पूर्ण होते ही आनंददायी गोष्ट आहे. कल्याणातील ‘सहस्रबुद्धे आणि मंडळी’ची कापड व औषधविक्रीची दुकाने या व्यवसायाला २० जुलै, २०२१, आषाढी एकादशी शके १९४३ला १०० वर्षे पूर्ण झाली. एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाने व्यवसायाची शंभरी गाठणे ही बाब प्रशंसनीय आहे.
कोकणातील रत्नागिरी जवळील कोतवडे गावातून या घराण्याचे पूर्वज रसायनी जवळील कराड येथे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आले व नंतर १९व्या शतकाच्या संधीला कल्याणला आले. उत्तम स्मरणशक्ती, तैल बुद्धी व सचोटीच्या बळावर विश्वनाथ सहस्रबुद्धे कल्याणातील तत्कालीन सावकार श्रीमंत लखू नाना फडके यांचे मुनीम म्हणून काम बघू लागले. त्यांचे सर्व व्यवहार, इस्टेटीची व्यवस्था अत्यंत प्रामाणिकपणे विश्वनाथजी बघत असत. त्यांचे सुपुत्र कृष्णाजी अत्यंत बुद्धिमान, प्रामाणिक व सोज्वळ होते. कृष्णाजी हिंदुत्ववादी देशाभिमानी होते, त्यामुळे पारतंत्र्याच्या काळात त्या वेळेच्या अभ्यासक्रमातील इंग्रज सरकारची मॅट्रिकची परीक्षा न देता टिळक विद्यापीठातर्फे परीक्षा देऊन मॅट्रिक झाले. ते राष्ट्रीय बाण्याने प्रेरित टिळक अनुयायी झाले. परकीय सरकारची नोकरी करायची नाही, हा विचार पक्का असल्याने स्वतंत्र व्यवसाय करणे पसंत करून आषाढी एकादशी शके १८४३ शुक्रवार, दिनांक १५ जुलै, १९२१ या दिवशी ‘सहस्रबुद्धे आणि मंडळी’ यांचे विविध वस्तू भांडार या अस्सल देशी नावाने कल्याण गावठाणात श्री महालक्ष्मी मंदिरासमोर दुकान सुरू केले. विशेष बाब म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर कल्याण भेटीवर आले असता, दुकानाची सदर पाटी वाचून या अस्सल मराठी नावाबद्दल स्वातंत्र्यवीरांनी कृष्णाजी तथा बाबुराव सहस्रबुद्धे यांचे मनापासून कौतुक केले.
सुरुवातीस आयुर्वेदिक औषधे, कार्यालयीन स्टेशनरी साहित्य, पुस्तके, खेळणी इत्यादी माल दुकानात विक्रीस ठेवला होता. पारंपरिक मराठमोळी वस्त्रे, लग्न, मुंजी, धार्मिक विधीसाठी लागणारी वस्त्रे, सुती कुर्ते, सदरे, पारंपरिक साड्या, धोतर, शेले, उपरणी, चादर, बेडशिट्स आदी कापड विक्रीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर बाबुराव तथा दादांनी सोलापुरी चादरी दुकानात विक्रीस ठेवल्या व घरोघरी फिरूनही विकल्या. हळूहळू कापड मालही विक्रीस ठेवण्यास सुरुवात केली. १९२१ ते १९४८ या काळात दुकानाचा चांगलाच जम बसला. पुस्तके विकत घेण्यासाठी रांगा लागत असत. त्यावेळी काही काळ कापडावर रेशनिंग होते. सदर वाटप पद्धतीचे अनुज्ञापन (रेशनिंग लायसन्स) सहस्रबुद्धे यांच्या दुकानाला मिळाले होते. अन्य दुकानातून काही प्रकाराचे कापड (विशेषतः मलमल) कोटा दोन-तीन दिवसातच ‘संपला’! असे सांगितले जाई. मात्र, या दुकानात सर्व ग्राहकांना अगदी महिन्याच्या अखेरीलादेखील त्यांच्या वाट्याचे कापड मिळत असे. कल्याणात वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्या नागरिकांचे त्यांच्या जवळपासच्या दुकानापैकी ‘सहस्रबुद्धे यांच्या दुकानातच माल मिळावा’ असे अर्ज ज्यावेळी सरकारी रेशनिंग कार्यालयात येऊ लागले. तेव्हा सरकारी निरीक्षक एक दिवस सहस्रबुद्धे यांच्या दुकानात संपूर्ण दिवस बसून राहिला होता आणि वाटपाची पद्धत व सचोटी पाहून याच दुकानातून माल मिळण्यासाठी अर्ज का येतात, हे समजून गेला व सचोटीने करीत असलेल्या व्यवसायाचे कौतुक करून गेला. अन्य दुकानात ‘मलमल’सारखे भारी कापड काळा बाजारात जास्त किमतीने विकले जाई. दोन-तीन दिवसांत ‘कोटा संपला’ असा फलक लागे. सहस्रबुद्धे यांच्या दुकानात मात्र असा व्यवहार कधी चालत नसे व त्यामुळेच सर्वांना त्यांच्या वाटणीच्या कोट्याचा माल कधीही मिळत असे. आजच्या भाषेत सचोटी, प्रामाणिकपणा व ग्राहकांचा संतोष ही त्यांची ‘टॅगलाईन’ होती.
नियती सत्त्वपरीक्षा घेणारी असते. १९४८च्या गांधीवधानंतरच्या दंगलीत मालक हिंदू महासभेचे संघनिष्ठ व ब्राह्मण असल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून दुकान फोडण्यात आले, माल लुटण्यात आला वा जाळण्यात आला. कपाटाच्या काचा फोडण्यात आल्या, जमा खर्चाच्या वह्या जाळण्यात आल्या, डोळ्यादेखत सर्व बेचिराख झाले. नियती क्रूर हसली. दुकानाचा विमा नसल्याने नुकसानभरपाई मिळण्याचा प्रश्नच नव्हता. या घटनेमुळे सहस्रबुद्धे कुटुंब शून्यापेक्षाही खालच्या अवस्थेत गेले. बाबुराव त्यावेळी संधीवाताने आजारी असल्याने पुढे सहा महिने फारसे काही करू शकले नाहीत. तरीही जिद्दीने दुकान सुरूच ठेवले होते. मात्र, १९४८ पासून पुढील २० वर्षांचा काळ अत्यंत वाईट अवस्थेत गेला. भांडवल नसल्यामुळे बहुतेक वेळी दुकानात माल नसायचा, विक्रीसाठी काहीही नाही, कशीबशी तजवीज करावी लागे. दुकान कसेबसे सुरू होते एवढेच.
या काळात बाबुरावांच्या पत्नी राधाबाई व मुलांनी कसलीही तक्रार न करता हालअपेष्टा सोसल्या. त्या परिस्थितीमध्येही बाबुराव व त्यांची तत्त्वनिष्ठा व वैचारिक बैठक भक्कम होती. कोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय? व कुणापुढेही हात पसरायचा नाही, दया नको, याचा अनुभव या कुटुंबाने घेतला. कौटुंबिक वीण घट्ट झाली.
‘समाज आहे म्हणून आपण आहोत, आपण समाजाचे देणे लागतो’ या विचारांची बाबुराव तथा दादांना पुरेशी जाण होती. या हलाखीच्या परिस्थितीतही ज्येष्ठ पुत्र केशव उर्फ नाना यांना संघबंदीविरुद्ध संघातर्फे केल्या जाणार्या सत्याग्रहात भाग घेण्यास आडकाठी न करता अनुमती दिली. दुकान फुटलेले, परिस्थितीत शून्यवत तरीदेखील समाजकार्याला प्राधान्य. बाबुराव सहस्रबुद्धे यांच्या स्वभावातच असलेल्या सामाजिक कामाच्या आवडीस सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने म्हणा, दुकान नीट चालत नसल्याने आलेल्या रिकामेपणाची जोड मिळाली व बाबुराव निरनिराळ्या संस्थेत काम करू लागले. ‘हिंदू महासभा’, ‘नमस्कार मंडळ’, ‘ब्राह्मण सभा’, ‘गायन समाज’, ‘फ्रेंड सर्कल’सारखी नाट्यसंस्था अशा विविध संस्थांत त्यांचा सहभाग होता. थोडा वेळ दुकानात लक्ष द्यायचे. पण, माल नाही म्हणून ग्राहक नाही, ही परिस्थिती असल्याने आता गप्पा मारण्याचे एक ठिकाण म्हणजे हे दुकान अशी स्थिती झाली. पण, वाईटातून चांगले घडते, त्याप्रमाणे जनसंपर्क व संग्रह वाढला.
गणपतराव फडके, डॉ. भा. का मोडक यांच्याशी तर त्यांचा रोजचा संबंध यायचा. पण, विशेष म्हणजे काँग्रेस विचाराचे डॉ. रायकर, समाजवादी विचारांचे बापट सर, साम्यवादी दत्ता केळकर, हिंदू महासभेचे भाऊसाहेब फडके, तर संघ विचारांचे दामुअण्णा टोकेकर या सर्वांशीच त्यांचे स्नेहसंबंध दृढ झाले. सर्व मंडळी या दुकानात गप्पा मारत बसत असत. त्या वेळच्या अत्यंत खालावलेल्या आर्थिक परिस्थितीत व यांच्या अनेक मित्रमंडळींनी व आप्तेष्टांनी दोघांच्या प्रामाणिकपणांवर विश्वास ठेवून या ना त्या स्वरूपात आर्थिक मदत केली. अगदी २५ रुपयांपासून दहा-दहा हजार रुपयांपर्यंत मदत या मंडळींनी केली. यादी खूप मोठी होईल, तरीही अरविंद सहस्रबुद्धे कृतज्ञतेने दादरचे बंधू नाना व भाऊ काका दाबके, कल्याणातील भाऊसाहेब फडके, भगवानराव जोशी कुटुंबीय, शिल्पकार भाऊराव साठे व कुटुंबीय यांचा उल्लेख करतात.
दुकान बंद न करता जिद्दीने उभे राहण्याची प्रेरणा देणार्या व स्त्री वर्गास प्रोत्साहित करणार्या मालती वहिनींचाही सहस्रबुद्धे बंधू अंतःकरणपूर्वक उल्लेख करतात. संस्थेच्या कामात थोडेसे रमलेले मन व मित्र आप्तेष्टांनी केलेले साहाय्य यामुळे हलाखीच्या परिस्थितीत मनात येऊ शकणार्या वैफल्याच्या वेडेवाकडे विचारांपासून बाबुराव दूरच राहिले व अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीने व हसतमुखाने सर्व परिस्थितीला तोंड दिले.
१९६० पर्यंत सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती होती. बाबुराव यांची ज्येष्ठ कन्या सुशीला दुकानाच्या आतील बाजूस वेताच्या खुर्च्या, परड्या, लेदर किंवा रेगजिनच्या बॅगा, अशा वस्तू स्वतः तयार करून विकत असे. १९६० साली पुत्र अरविंद मॅट्रिक झाल्यावर नोकरी न करता हे दुकानच चालवायचं या निर्धाराने दुकानाच्या व्यवसायात सक्रिय राहिला. पुढील १५-२० वर्षे स्टेशनरी, खाऊ, खेळणी, भेटवस्तू, रॉयल गोल्डचे दागिने, शाळांना लागणारे ड्रॉईंगचे सामान, स्टेशनरी पुरविणे, बाकांना रबरी बुच बसविणे, शाळा इमारतींना रंग लावणे, दूध, चहा, मीठ, कोळसा घरोघरी विकणे, शिलाई मशीन असे नानाविध उद्योग त्यांनी केले. म्हणजेच कोळशापासून रोल गोल्डच्या दागिन्यांपर्यंत अनेक विविध वस्तू विकून व्यवसाय स्थिरावण्यासाठी सहस्रबुद्धे बंधू धडपडत होते. दुकान जरी अरविंद बघत होते. तरी अन्य चारही भावंडे केशव, प्रभाकर, वसंता व विश्वास आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून सर्व प्रकारची मदत करीत होते.
बाबुरावांचे बंधू पुरुषोत्तम विश्वनाथ सहस्रबुद्धे उर्फ बाळू काका यांचे मार्गदर्शन व सक्रिय पाठिंबा होताच. घरातील महिलावर्ग सर्व भगिनी व सुनांची कोणतीही कुरकुर न करता सहकार्य होतेच. सर्वांच्या मदतीने कौटुंबिक सलोखा राखून अरविंद सहस्रबुद्धे यांनी निर्धाराने शतकपूर्ती करणारा हा व्यवसाय सांभाळला. आजही कुटुंबातील एखाद्या प्रश्नावर भरणारी सहस्रबुद्धे कुटुंबाची पार्लमेंट नात्यांची वीण घट्ट राखून आहे. समाजसेवेचा वसा जपणार्या या उद्योगाच्या दुकानात पेणचे वैद्य अरविंद गणेश साठे हे येऊन रुग्ण तपासणी व उपचार करीत असत. त्याचा धागा पकडून पुढे १९७५मध्ये ‘धूतपापेश्वर’ कंपनीची ठाणे जिल्ह्याची ‘डिस्ट्रिब्युटरशिप’ मिळाली व हा उद्योग सहस्रबुद्धे आणि मंडळी या नावाने घाऊक (होलसेल) व्यवसायातही सक्रिय झाला. त्यापाठोपाठ ‘व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स’ यांची लोणची, मसाले वगैरे उत्पादने, ‘योजक’ यांचे कोकणी पदार्थ याचे वितरक म्हणून व्यवसाय वृद्धी झाली. हा होलसेल व्यवसाय व आयुर्वेद औषधाचे रिटेल दुकान विकास गोखले हा अरविंद सहस्रबुद्धे यांचा भाचा व विकासाची पत्नी अनिता चालवितात. सर्व व्यापारी वर्ग व सामाजिक संस्था यांच्याशी त्यांचे संबंध सलोख्याचे आहेत. मूळ दुकानाची जागा रस्ता रुंदीत जाणार आहे, याची कल्पना आल्यामुळे पूर्व योजना करून समोरच्या लोभस बिल्डिंगमध्ये एक गाळा घेऊन ठेवला होता. तत्परतेने येथे दुकान स्थलांतरित केले. याकामी विकासक मयेकर यांचे ऋण सहस्रबुद्धे बंधू मानतात. आज शताब्दी साजरी करत असताना सहस्रबुद्धे मंडळींवर कर्जाचा बोजा नाही, अडचणीच्या काळात घरभाडे थकले म्हणून मालकांनी कोर्टात दावा केला असताना कोर्टाने भाडे भरण्यासाठी हप्ते बांधून दिले होते. हीच इष्टापत्ती वाटून या ऋणातून सहस्रबुद्धे मंडळी मोकळी झाली. या सर्व प्रवासातील कापड व्यवहारातील उल्लेखनीय बाब म्हणजे आजपर्यंत कोणीही केला नाही असा ‘वनडे फ्री सेल, लकी डे फ्री सेल’ १९७० ते २००९ अशी सलग ४० वर्षे हा सेल चालू होता. साधारणपणे नवरात्र ते दिवाळी या कालावधीतील एक दिवस ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने काढून त्या दिवसाच्या संपूर्ण विक्रीची रक्कम ग्राहकांना परत केली जाई. वर्षभर ग्राहक आपल्याकडून काही ना काही खरेदी करतात, त्यांना यानिमित्ताने काही मिळावे हा एक हेतू या योजनेमागे होता. या सेलची ग्राहक अजूनही आठवण काढतात.
२०१७ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा, कल्याण या टिळकांनी शुभारंभ केलेल्या शताब्दी संपन्न केलेल्या उत्सवाने सदर व्यवसाय ‘शताब्दी’ पुरस्काराने गौरविला. ज्योतिषाचार्य दाते यांनी व्यवसायाची कुंडली मांडून शतकोत्तर यशस्वी उद्योगाचे वर्तविलेले भविष्य व ‘शताब्दी’ पुरस्काराने सहस्रबुद्धे आणि मंडळींना उभारी आली. सर्व निराशा झटकून नव्या उमेदीने व्यवसायाकडे लक्ष देऊ लागले व शंभरी पार करू अशी उभारी आली. सहस्रबुद्धे भावंडातील ज्येष्ठ बंधू यशस्वी वास्तुरचनाकार प्रभाकर तथा तात्या यांच्या आकस्मित निधनाने त्यांचा मोठा आधारच गेला. परंतु, व्यवसायावर नितांत प्रेम करणार्या प्रभाकर यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांच्या स्मृतीला वंदन करून पुनश्च सहस्रबुद्धे आणि मंडळींनी व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.
या १०० वर्षांच्या प्रवासाच्या मागोवा घेताना सहस्रबुद्धे आणि मंडळी कृतज्ञतेने अनेकांचे स्मरण करतात. “वडिलांच्या व आईच्या शिकवणीने रुजलेले व संघ संस्कारातून पक्के झालेले सामाजिक जाणिवांचे भान जपण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे. वडील कृष्णाजी तथा दादा वडील बंधू केशवनाना संघसेवेत होतेच. आम्ही सर्व भावंडे व भाचा विकास आपापल्या परीने विविध सामाजिक संस्थांत व संघकामात आहोत. आर्थिक निकषावर विचार केल्यास १०० वर्षांच्या व्यवसायात स्वतःच्या मालकीचे तेव्हा दोन दुकाने व बंगला असणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही काही खूप कमावले, असे नाही तथापि, शून्यातूनच नव्हे तर ‘उणे’ परिस्थितीतूनही आम्ही एकजुटीने पुन्हा उभे राहिलो. वारकरी ज्या श्रद्धेने वारी करतात, त्याच श्रद्धेने आषाढी एकादशीला सुरू झालेला या व्यवसायाची वारी शंभरी पार करत आहे. वारकरी वारीत विठूमाऊलीसाठी देह दुःख विसरून रमून जातो, त्याचप्रमाणे आम्ही ग्राहक माऊलीकडे बघून पूर्ण सचोटी व प्रामाणिकपणा ठेवून एकजुटीने उभे राहून कार्यभार निभावला व व्यवसायात स्थिरावलो व सर्व क्लेश विसरून उभे राहिलो. आज कल्याण शहराच्या सर्व भागातून ग्राहक आमच्या दुकानात विश्वासाने येतात व आल्यावर ‘येथे आम्हाला फसविले जात नाही’ असे म्हणतात, त्यावेळी जे समाधान वाटते त्याचे मोल एवढ्या वर्षांत अनेक प्रॉपर्टी उभे केल्याने जे मिळाले असते, त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.”
व्यवसायातील सचोटी व विश्वास सांभाळत सहस्रबुद्धे मंडळींनी या शताब्दी वर्षात २०२० साली प्रवेश केला. कोरोना महामारीच्या या कसोटीच्या काळात या मंडळींच्या व्यवसायावरही सावट आले. ‘लॉकडाऊन’च्या काळातही कोरोनाचा प्रत्येक नियम पाळूनही या सहस्रबुद्धे मंडळीची आस्थापने त्यांच्या तरुण पिढीने ज्येष्ठांची काळजी घेऊन नेटाने सांभाळली. १०० वर्षांत तीच सेवा, सचोटी, आपुलकी, प्रामाणिकपणा यात किंचितही फरक पडला नाही. दुकानांचे बाह्यस्वरूप बदलले तरी गाभा तोच आहे. हा जुन्या पिढीतील ठेवा नवीन पिढीतील वारसांकडे मोठ्या आत्मीयतीने हस्तांतरित झाला, ज्याचा ग्राहकांनाही अनुभव येतो. आता नव्या शतकात पदार्पण करताना १०० वर्षे जोपासलेल्या चोख व्यवहार व विश्वास या बळावर नागरिकांची सेवा व सामाजिक संस्थांचे साहाय्यभूत होत हा वसा ही तरुण मंडळी ‘सहस्रबुद्धे आणि मंडळी’ हा ‘ब्रॅण्ड’ बनवून जपणार आहेत.
१०० वर्षांपूर्वी १५ जुलै, १९२१ आषाढी एकादशीला वाटचाल सुरू झालेली ही व्यवसाय वारी १०० वर्षे ग्राहक संतोष, सचोटी व विश्वास यांचा गजर करत अव्याहत चालू आहे. २० जुलै, २०२१ च्या आषाढी एकादशीला हे एक रिंगण पूर्ण झाले. ही शतकमहोत्सवी वारी जनताजनार्दनाच्या चरणी समर्पित आहे, अशी सहस्रबुद्धे मंडळींची श्रद्धा आहे.
- डॉ. रत्नाकर फाटक