राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

03 Jul 2021 12:49:18

uddhav thackre_1 &nb

...म्हणून अधिवेशन केवळ २ दिवसांचे


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि राज्यातील इतर मुद्द्यांकडे पत्र पाठवत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्राला मुख्यमंत्र्यांनी आता उत्तर दिले आहे.

राज्यपालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले की, दोन दिवसांच्या अधिवेशनाबाबत, केंद्र सरकारचे निर्देश, कोरोनाची परिस्थिती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही, तसेच तिसर्‍या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दि. ५ आणि ६ जुलै रोजी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात जास्त काळ अधिवेशन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक घेता आली नाही. संविधानात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी कोणताही निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीअभावी संविधानातील तरतुदीचा कोणताही भंग झालेला नाही, असे पत्रात म्हटले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. आम्हालाही इतर मागास वर्गाची काळजी आहे. त्यामुळेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी घटनात्मक मार्ग काढण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आपणही पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0