लोकसभेत काँग्रेस आणि तृणमूलचा राडा

29 Jul 2021 11:44:55

lok sabha_1  H

वी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू न देण्याचा अजेंडा रेटणार्‍या काँग्रेसच्या सदस्यांनी बुधवार, दि. २८ जुलै रोजी लोकसभेत पुन्हा राडा घातला. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ घालून सभापती आणि अन्य सदस्यांच्या दिशेने कागदपत्रांची फेकाफेकी केली. त्यामुळे फेकाफेकी करणार्‍या दहा खासदारांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.
 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग सातव्या दिवशी विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला. कथित हेरगिरी प्रकरणासह अन्य विषयांवर विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. अखेरीस दुपारनंतर संसदेचे कामकाज गुरूवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली, तर राज्यसभेत किशोर न्याय हक्क (सुधारणा) विधेयक, २०२१ ला मंजुरी देण्यात आली.
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने संसदेची मर्यादा भंग केली : अनुराग ठाकूर
 
लोकसभेत कामकाजादरम्यान काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी आणि फलकबाजी केली. गदारोळातच सभापतींनी कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी कागदपत्रे सभापतींच्या दिशेने भिरकाविली. त्याविषयी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले, “काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी संसदेच्या मर्यादा भंग केल्या आहेत.
 अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकणे, मंत्र्यांच्या अंगावर कागद फेकणे, फलकबाजी करणे, सभागृहातील अन्य सदस्य आणि पत्रकार गॅलरीच्या दिशेने कागदत्रे फेकण्याचे प्रकार विरोधी पक्ष करीत आहेत. अधिकार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विरोधी पक्ष चर्चेला घाबरत असून भारताला जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी टीका ठाकूर यांनी यावेळी केली.दरम्यान, गुरजितसिंग औलजा, टीएन प्रथापन, मणिराम टागोर, रवनीतसिंग बिट्टू, हिबी एडेन, ज्योतिमणी सेन्नमलई, संप्तगिरी शंकर उल्का यांच्यासह सभापतींच्या दिशेने कागद फेकणार्‍या दहा सदस्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘आयटी समिती’वरून थरूर यांना हटवा : निशिकांत दुबेे
संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक समितीच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांना हटविण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र समितीचे सदस्य आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले आहे. समितीचे कामकाज आणि बैठका घेण्याविषयी थरूर हे मनमानी करीत असल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे बुधवारी समितीच्या बैठकीवर दुबे यांच्यासह अन्य सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने समितीची बैठक होऊ शकली नाही. कागदांची फेकाफेकी; पुन्हा निलंबनाच्या कारवाईची शक्यता






 
 
Powered By Sangraha 9.0